गोव्यातले काजूचे प्रस्थ

Goa Cashew : सोळाव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधीशांबरोबर धर्म प्रचारासाठी आलेल्या मिशनऱ्यांनी गोव्याची जैविक संपदा वैविध्यपूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
Goa Cashew
Goa CashewDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र केरकर

सोळाव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधीशांबरोबर धर्म प्रचारासाठी आलेल्या मिशनऱ्यांनी गोव्याची जैविक संपदा वैविध्यपूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गोमंतकीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्याबरोबर इथल्या लोकजीवनात उल्लेखनीय स्थान प्राप्त केलेल्या काजूचे प्रस्थ खरंतर एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‌निर्माण झाले.

पोर्तुगीज अमदानीत वास्तव्यास असणाऱ्या डॉ. गार्सिया दी ओ‌योनी 1563 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात गोव्यातल्या वनस्पती वैभवाविषयी नोंदणी करताना काजूचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यानंतरच पोर्तुगीज मिशनरींनी मृदा संवर्धन करण्याच्या हेतूने द‌क्षिण अमेरिका खंडातल्या ब्राझिल देशातून गोव्यात काजूचे झाड आणले असावे.

दक्षिण अमेरिकेत जेव्हा युरोपियन लोकांनी भ्रमंती आरंभली तेव्हा 1558 मध्ये त्यांच्या दृष्टीस काजूचे झाड पडले. कापूचिन माकडे काजूचा बोंडू आवडीने खात असल्याने हे फळ खाण्यायोग्य असल्याची जाणिव त्यांना झाली. ब्राझिल आणि वेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतल्या देशातून युरोपियनांनी काजूची रोपे पूर्व आफ्रिकेत आणि आशियाई राष्ट्रांत आणली.

Goa Cashew
फोंड्यात पाईप्सना आग लागल्याने लाखोंची हानी

गोव्यात काजू सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोहोचला. परंतु काजू आणि गर खाण्यायोग्य असल्याचे ज्ञान अठराव्या शतकाच्या सुमारास आफ्रिकेतल्या मोझांबिकच्या तुरुंगात असणाऱ्या गोमंतकीयांना झाले असल्याचे मानले जाते.

आज गोव्यातल्या मराठी आणि कोकणात लोकप्रिय असलेला काजू हा शब्द भारतीय नसून तो पोर्तुगीजांच्या भाषेतून इथे प्रचलित आलेला आहे. दक्षिण अमेरिकेतल्या तूपीयन भाषेतल्या मूळ शब्दातून पोर्तुगीज भाषेत काजू शब्द रूढ झाला.

वनस्पतीशास्त्रात काजूला ॲनाकार्डियम असे जे नाव मिळालेले आहे, त्याचे मूळ ग्रीक भाषेत असून त्याचा अर्थ ‘ज्याची बी फळाबाहेर असते’, असा होतो. काजूचे रोप सोळाव्या शतकात गोव्यात आले आणि इथून ते देशाच्या विविध प्रांतांत गेलेले असले तरी काजूच्या फळांचे आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या गराचे महत्त्व मात्र बऱ्याच उशिरा म्हणजे 1920 नंतरच उमजले.

1941 साली भारतातून वीस हजार टन काजू बिया निर्यात करण्यात आल्या आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या विविध राज्यांत काजू नगदी पीक म्हणून नावारूपास येऊ लागले. काजूचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका असले तरी आशियाई देशातली भूमी आणि हवामान काजू लागवडीला पोषक ठरले आणि त्यामुळे व्हिएतनाम हे काजू उत्पाद‌नात अग्रेसर ठरलेले असून त्याच्यानंतर भारताने बाजी मारली आहे आजमितीस महाराष्ट्रात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी काजुगरांचा दर्जा आणि काजू बोंडाच्या रसापासून केले जाणारे मादक मद्य यामुळे गोवा राज्याने जगभर विशेष लौकिक प्रस्थापित केलेला आहे.

गोव्यात काजूच्या रोपांचे आगमन होण्यापूर्वी हजारो वर्षे माड आहेत, त्या माडाची सूर काढून इथे दारू निर्माण केली जायची आणि सूरीपासून तयार केल्या जाणाऱ्या दारूला त्यामुळे ‘सोरो’ हे नाव प्राप्त झाले.

आंबवलेल्या सूरीसारखा वास काजूच्या 2 ते 3 दिवस पडून असलेल्या बोंडूला येत असल्याने गोमंतकीयांनी त्या रसापासून हुर्राक आणि फेणीची निर्मिती केली. या दोन्ही मद्यांत झिंग आणण्याची तसेच जीभेवर पकड निर्माण करण्याची सूरीपेक्षा अधिक क्षमता असल्याने गावोगावी काजूच्या बोंडूपासून दारू निर्माण करण्याच्या व्यवसायाला राजाश्रय लाभलेला आहे.

हुर्राकपेक्षा फेणी मद्यपीला अधिक बेहोषी आणत असल्याने बिगर गोमंतकीयांनाही लोटांगण घालण्यास ती प्रवृत्त करते, असेही दिसून येते. उत्तर गोव्यातल्या सत्तरीत झरमे, डिचोलीत शिरगाव आणि मेणकुरे तर दक्षिण गोव्यात केपेतले मोरपिर्ला वगळता सर्व राज्यांत काजू बोंडूच्या रसापासून हुर्राक आणि फेणी निर्माण करण्याचा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन बनलेले आहे.

बोंडूशी संलग्न असणारी काजूची बी खरंतर फळाचा अविभाज्य घटक असून, या गराला खाद्यान्न म्हणून बियां भाजी, ‘काजू लाडू’ करण्यासाठी वापरण्यात येते. पौष्टिक गुणधर्म असणाऱ्या काजूच्या व्यवसायात गणेश महादेव प्रभु झांट्ये यांनी आपले बस्तान गोवा मुक्तीपूर्वी बसवले आणि मुंबई-कराचीसारख्या बंदरातून आपल्या मालाची यशस्वीपणे निर्यात केली. 1928 साली भारतातून काजूची निर्यात अमेरिकेसारख्या राष्ट्रात झाली आणि आता काजू हे पीक बऱ्याच कुटुंबांसाठी उपजीविकेचा स्रोत ठरलेले आहे.

गोमंतकीय लोकजीवनात काजूच्या बोंडूपासून तयार केल्या जाणाऱ्या हुर्राक आणि फेणीला उल्लेखनीय असे स्थान लाभलेले असून केवळ माणसालाच नव्हे तर अतिमानवी समजल्या जाणाऱ्या देवचाराला तांदळाच्या भाकरीबरोबर (रोट) करवंटीतून सोरो (दारू) अर्पण करण्याची परंपरा पहायला मिळते.

गोव्यातल्या लोकगीतातही काजू बागायतीचा उल्लेख मिळतो. ‘बेबे रडटात काजींनी’ असो अथवा ‘सोरो दी माका पयलो’ सारखे कातार असो त्यात काजूचा संदर्भ मिळतो. गोव्यात नवाश्म युगापासून डोंगराच्या उतारावर कुमेरी शेती केली जायची.

वृक्षवनस्पतीचा संहार कुमेरी शेतीपायीं झाल्याने पोर्तुगीज सरकारने आणि गोवा मुक्तीनंतर सरकारी यंत्रणेने जेव्हा कुमेरी शेतीवर बंदी घातली तेव्हा त्या जागी काजूची लागवड करण्यात आली आणि त्यामुळे सत्तरी, सांगे, काणकोण, पेडणेसारख्या भागांत डोंगर उतार, माळरानात काजूच्या बागायती पहायला मिळतात.

सत्तरी तालुक्यात रासायनिक खते, जंतुनाशके, कीटक‌नाशके यांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने काजूचे उत्पादन घेतले जात असल्याने, इथल्या काजू बियांना एके काळी बाजारात विशेष मागणी होती. धारबांदोड्यात साकोर्डेजवळ त्याचप्रमाणे काणकोणात खोलात साळेरीला काजुमळ अशी स्थळनावे आहेत. कारवारात सदाशिवगड आणि सुप्याजवळ तसेच केपेतल्या मोरपिर्ला, बाळ्ळीत काजुबागा आहेत, यावरून त्या परिसरातल्या काजू बागायतीचे महत्त्व स्पष्ट होते.

काजू बोंडू आणि काजुगराला बाजारपेठेत मागणी असून, काजू बोंडूच्या रसापासून दारू तर करतातच, शिवाय त्याचा वापर जेवणातही केला जातो. काजूचे गर जेव्हा कोवळे असतात तेव्हा त्यांची चव आगळी असल्याने, त्यांचा वापर खाण्याशिवाय खुब्या, तिसऱ्यांच्या मसालेदार ‘सुक्या’ची लज्जत वृद्धिंगत करण्यासाठी केला जातो.

पिकलेल्या बोंडूचे तुकडे करून, त्यात हिरवी मिरची चिरून ‌टाकून ‘कोतकय’चा आस्वाद घेतला जायचा. दरवर्षी जीर्ण झालेल्या काजूच्या झाडाच्या लाकडाचा वापर होड्या करण्यासाठी तसेच सामान ठेवण्याच्या पेट्या तयार करण्यासाठी व्हायचा. चुलीवर अन्न शिजवताना इंधन म्हणूनही काजूची लाकडे वापरली जायची. कोळश्यांच्या निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो.

काजुबिया फोडून गर काढल्यावर जो डिंक मिळतो, तो घराच्या छप्पराला शाकारणी करताना वापरात येणाऱ्या तुळया, पट्ट्या यांना लावला जायचा आणि त्यामुळे अशा तुळया, लाकडाच्या पट्ट्यांना वाळवी किंवा अन्य कीटकांचा त्रास होत नसे. काजूच्या झाडावरला डिंकदेखील उपयुक्त मानला जायचा.

काजूच्या झाडात ॲनाकार्डिक आम्ल असून त्याचा वापर औषधशास्त्रात मानवी शरीरातला कर्करोग पसरवण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी केला जातो. काजुगरात असलेले तंतू पचन व्यवस्थित ठेवून बद्धकोष्ठता आणि अल्सरसारख्या समस्यांपासून मुक्ती देण्यास मदत करतात, परंतु त्यांचे सेवन मर्यादित असले पाहिजे.

काजुगरातली मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची मात्रा माणसाची हाडे मजबूत ठेवण्यात साहाय्य करत असते. त्याचप्रमाणे मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मधुमेही रुग्णास मर्यादित प्रमाणात काजूगर सेवन लाभदायक ठरलेले आहे. काजू हे गोमंतकातल्या जनतेसाठी नगदी पीक असल्याने त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com