Goa Election: वेळ्ळी मतदारसंघात फिलीप नेरी गड राखणार का?

काँग्रेसमध्ये तिघेजण इच्छुक, ‘आप’ही सक्रिय: निवडणूक चुरशीची होणार
Goa Election: वेळ्ळी मतदारसंघात फिलीप नेरी गड राखणार का?
Goa Election: वेळ्ळी मतदारसंघात फिलीप नेरी गड राखणार का?Dainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: वेळ्ळी मतदारसंघात विद्यमान मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांची जादू पुन्हा चालणार की, त्यांना विरोधक रोखणार, याबाबत बरी चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये तिघे जण इच्छुक आहेत. त्यापैकी कोणी जरी बंडखोरी केली, तर मात्र काँग्रेसला आपली जागा राखणे कठीण जाऊ शकते. ‘आप’ही मतदारसंघात बराच सक्रिय झाला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

Dainik Gomantak

वेळ्ळी मतदारसंघ हा पूर्वी कुंकळ्ळी मतदारसंघाचा भाग होता. 1989 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत वेळ्ळी स्वतंत्र मतदारसंघ झाला. आंबेली, वेळ्ळी, असोळणा, चिंचोणे, सारजोरा, शिरली धर्मापुर, सांत जुझे दि एरियल या सहा पंचायतीचे क्षेत्र व दिकारपाली पंचायतीचे दोन प्रभाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात गेल्या 32 वर्षांत हवा तसा विकास झाला नाही. हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. विद्यमान आमदार व मंत्री फिलीप नेरी यांनी दोनदा मंत्रिपद भोगूनही मतदारसंघाचा विकास करण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप मतदार करतात.

असोळणा हा थोर समाजवादी नेते डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांचा गाव. या गावात राम मनोहर लोहिया व डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांच्या स्‍मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मतदारसंघात दक्षिण गोव्यातील महत्त्वाचे कुटबण मच्छीमार बंदर असून या बंदरावर योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. साळ नदीवर झालेले अतिक्रमण, साळ नदीत होत असलेले प्रदूषण व साळ नदीतील गाळ उपसणे या प्रमुख समस्या आहेत.

Goa Election: वेळ्ळी मतदारसंघात फिलीप नेरी गड राखणार का?
Goa Election: कुंकळ्ळी मतदारसंघात इच्छुकांची भावूगर्दी

‘आप’चेही कार्य जोरात

गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार असलेले क्रुझ सिल्वा हे यावेळी रिंगणात असतील. गेल्या निवडणुकीत त्यांनी चांगली मते मिळवली होती. सरपंच म्हणूनही ते कार्यरत होते. व्यवसायाने अभियंता असलेल्या क्रूझ यांचा मतदारांशी चागला संपर्क आहे. त्याचा फायदा क्रुझ यांना किती होतो ते पाहावे लागणार आहे.

अपक्ष ठरतात भारी

वेळ्ळी मतदारसंघातील मतदार पक्षापेक्षा व्यक्तीला प्रथम पसंती देतात हे सिद्ध झाले आहे. गेल्या सात निवडणुकांत या मतदारसंघात तीन वेळा अपक्ष आमदार निवडून आलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही अपक्ष भारी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपचे स्थान नगण्य

मतदारसंघात भाजपचे स्थान नगण्य असून या पक्षाचा प्रभाव मतदारसंघात दिसत नाही. भाजपला उमेदवारही मिळणे कठीण होते. नेरी हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी पुढील निवडणुकीत नेरी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार नाही, अशीच चिन्हे आहेत.

Dainik Gomantak

महिलांचे वर्चस्व

वेळ्ळी मतदारसंघावर महिला मतदारांचे वर्चस्व आहे. या मतदारसंघाच्या पहिल्या आमदार या महिला होत्या. 2012 च्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा तीन हजार जास्त महिला मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. 2017 च्या निवडणुकीत महिला मतदारांचाही वाटा मोठा होता. विधानसभेच्या निवडणुकीतही एकूण मतदारांपैकी साठ टक्के महिला मतदार आपला पुढील आमदार ठरविणार आहेत. येथील बहुतांश पुरुष मतदार विदेशात व जहाजावर काम करीत असून आमदार कोण हे ठरविण्याची जबाबदारी महिलांवर येते.

काँग्रेसची जय्यत तयारी

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, माजी आमदार बेंजामिन सिल्वा, वेळळीचे सरपंच व बोट मालक संघटनेचे सावियो डिसिल्वा हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी आमदार बेंजामिन यांनी हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. सावियो डिसिल्वा यांनी बेंजामिन यांच्या प्रवेशास विरोध करून आपल्या समर्थकासह काँग्रेस कार्यालयात गोंधळ घातला होता. सावियो यांचा लोकसंपर्क मोठा असून त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्या समर्थकाला निवडून आणून आपले वजन दाखवून दिले होते. त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. ज्यो डायस हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. गेली पंधरा वर्षे ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

Goa Election: वेळ्ळी मतदारसंघात फिलीप नेरी गड राखणार का?
Goa Election: सांगेत तिरंगी चुरशीची लढत शक्‍य

गड कोण सर करणार

फिलीप नेरी यांची मतदारसंघातील मक्तेदारी संपुष्टात येणार की दोघांचे भांडण आणि नेरींना लाभ, असे होणार हे निकालानंतर कळणार आहे. 2012 ची निवडणूक सोडल्यास 1999 पासून 2017 पर्यंत ते चार वेळा नेरी निवडून आले आहेत. ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असली, तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरू शकतात. फिलीप यांच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे तिघे इच्छुक पुढे आले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देतात, बंडखोरी झाल्‍यास पुढे काय? असा पेचप्रसंग आहे. तसे झाल्‍यास भाजप उमेदवाराला लाभ होऊ शकतो.

सरळ लढत झाली तर...

या मतदारसंघात सरळ लढत झाली तर मंत्री फिलीप यांना निवडणूक जड जाऊ शकते. काँग्रेसच्या इच्छुकांनी बंडखोरी करून निवडणूक लढवल्यास त्याचा लाभ फिलीप यांना होणार आहे. मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांचे वर्चस्व असून मच्छीमार समाज, ख्रिस्ती अनुसुचित जमातीचे मतदार व इतर मागासवर्गीय मतदारांचा ज्या उमेदवारास पाठिंबा लाभतो तो उमेदवार विजयी ठरतो.

- विजय देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com