Goa Election: नाईक-आमोणकर यांच्यातच चुरस

काँग्रेस त्रुटींवर मात करण्‍याच्‍या प्रयत्‍नात, मतदारसंघात जय्‍यत तयारी
Goa Election: नाईक-आमोणकर यांच्यातच चुरस
Goa Election: नाईक-आमोणकर यांच्यातच चुरसDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव: मुरगाव मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे मिलिंद नाईक आणि काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्यात जोरदार टक्कर होणार, असे चित्र आहे. मगो, गोवा फॉरवर्ड, आप या पक्षांनीही येथे काम सुरू केले आहे. मुरगाव मतदारसंघाचा आढावा घेतला, तर सध्या तरी भाजपचे नेते नगरविकास मंत्री मिलिंद नाईक व काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर आणि माजी आमदार कार्ल वाझ हेच उमेदवार प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले आहेत.

Dainik Gomantak

मागच्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसला अल्प मताने गमवावा लागला होता. या पराजयाचा खेद संकल्प आमोणकर आणि त्याच्या नेत्यांना आहे. तसे पाहता हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. काँग्रेसचे शेख हसन हरूण यांनी या मतदारसंघात सलग चारवेळा विजय प्राप्त केला होता. मग, एका निवडणुकीत हार झाल्यानंतर पुन्हा पाचव्यांदा ते मुरगाव मतदारसंघातून जिंकले होते. शेख हसन यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर 2002 साली झालेल्या निवडणुकीत जिओनी कार्ल वाझ हे काँग्रेसचे आमदार बनले होते. 2007 च्या निवडणुकीपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे.

काँग्रेसचे संकल्‍प आमोणकर मागील निवडणुकीवेळी झालेल्‍या चुका व त्‍यातून काय बोध घेतात व रणनीती आखतात, हेही महत्त्‍वाचे आहे. तसेच मंत्री मिलिंद नाईक विरोधकांच्‍या टीकास्रावर कसे पुरून उतरतात, लोकांची मने कसे वळविणार, हेसुद्धा त्‍यांच्‍यासमोर आव्‍हान आहे. भाजपची रणनीती त्‍यात यशस्‍वी होणार का?

राजकीय शीतयुद्ध

विकासाच्या बाबतीत चारही मतदारसंघांपैकी मुरगाव मतदारसंघ अग्रेसर आहे. तरीही राजकारणात येथे नेहमीच चुरस असते. मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा मुद्दा यापूर्वी अनेकदा गाजला आहे. तर मंत्री नाईक हे आपल्या सोयीप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना वापरून घेतात, असा आरोपही संकल्प आमोणकर यांनी अनेकदा केला आहे. शिवाय अशी प्रकरणे निम्न न्यायिक अधिकारिणीकडेही पोहोचली आहेत. मतदारसंघात प्रत्येकवेळी भाजप आणि काँग्रेस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने शीतयुद्ध सुरू असते. आता प्रचारावेळी त्‍यात ठिणगी पडण्‍याची शक्‍यता आहे.

संकल्प एकनिष्ठ कार्यकर्ता

संकल्प आमोणकर हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. अगदी युवा काँग्रेसपासून ते आजवर पक्षाच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत. भाजपला त्यांनी नेहमीच जोरदार विरोध केला आहे. मंत्री नाईक यांच्या अनेक धोरणांवर ते सतत टीका करीत असतात. पक्षसंघटनेचे कार्यही आमोणकर यांनी सुरू ठेवले आहे. आपल्या समर्थकांना संघटित ठेवण्यात त्यांना यश आले आहे. मध्यंतरी ते पक्षातील काही नेत्यांवर नाराज होते अशी चर्चा होती. परंतु त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले होते. यावेळी तर त्यांनी मिलिंद नाईक यांना पराभूत करून मागील दोन पराभवांचे उट्टे काढायचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी काम करताना कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन रणनीती आखली आहे.

Dainik Gomantak

नशिबाची साथ!

2017 सालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर नाईक यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर काही काळ ते बाजूला पडल्यासारखे होते. परंतु मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर नाईक यांना सावंत मंत्रिमंडळात स्थान मिळाले आणि पुन्हा एकदा त्यांना मतदारसंघात आपले स्थान बळकट करण्यासाठी लाभ झाला. भंडारी समाजातील कोणी मंत्री मंत्रिमंडळात नसल्याने त्यांना भाजपने पुढे केले होते. 2017 साली मंत्रिमंडळातील बरेचसे मंत्री पराभूत झाले. पण, नाईक हे थोडक्यात बचावले. त्या निवडणुकीत नाईक यांच्या विरोधात त्यांचेच काही सहकारी गेले होते. तसेच काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांनी प्रचाराच्‍या बळावर नाईक यांना अडचणीत आणले, तरीही नशिबाने नाईक यांनाच साथ दिली.

मिलिंद नाईक सलग तीन वेळा विजयी

नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सलग तीन वेळा मुरगावचे आमदार म्हणून निवडून आले. येत्या निवडणुकीतही मिलिंद नाईक व संकल्प आमोणकर यांच्यात कांटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. मुरगाव मतदारसंघ एकेकाळी संपूर्ण तालुक्यात सामावलेला होता. हळूहळू हा मतदारसंघ छोटा होत गेला. 2012 साली झालेल्या मतदारसंघ फेररचनेमुळे हा मतदारसंघ भाजपला अधिकच अनुकूल ठरला. लोकसभा आणि पालिका निवडणुकीतही मतदारसंघाने भाजपलाच साथ दिली होती.

Goa Election: नाईक-आमोणकर यांच्यातच चुरस
Goa Election: सांगेत तिरंगी चुरशीची लढत शक्‍य

भाजपचे मतदारसंघावर वर्चस्‍व

सध्या पालिकेतील काही भाजप नगरसेवकांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असली, तरी ते उघडपणे पुढे येत नाहीत. स्थानिक आमदार मंत्री असल्याने त्याला भाजप डावलणार कसा, असा प्रश्‍न असल्याने अजून तरी कोणी उमेदवारीवर दावा केलेला दिसून येत नाही. मंत्री असल्याने नाईक यांचा या मतदारसंघावर वरचष्मा आहे. पण गेल्या दोन निवडणुकांचे निकाल पाहता ते विरोधकांवर मोठी आघाडी घेऊ शकलेले नाही, हे स्पष्टपणे जाणवते.

चुरस वाढणार

गोवा फॉरवर्ड, मगो, आप तसेच अन्य पक्षही या मतदारसंघात चाचपणी करीत आहेत. परंतु सध्या भाजप आणि काँग्रेसमध्येच चुरस दिसून येते. लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस सोडल्‍यानंतर त्यांचे समर्थक काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना मानणाराही एक गट आहे. त्यांची भूमिकाही महत्त्‍वाची ठरेल.

प्रदीप नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com