Gomantak Editorial: ‘विशी’चे अर्थभान

सणासुदीच्या दिवसांत बँकांना रोकडटंचाई जाणवू नये म्हणून रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलामुळे सार्वजनिक बँकांच्या शेअरकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
Gomantak Editorial
Gomantak EditorialDainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Editorial गुंतवणुकीचे पर्याय काळानुसार झपाट्याने बदलत असल्याने मध्यमवर्गीयच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकही मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहेत. आजच्या गतिमान युगात गुंतवणुकीबाबत पारंपरिक पद्धतीचा साचेबद्ध विचार करून चालणार नाही, त्यामुळे हा बदल स्वागतार्हच आहे.

परंतु त्यामुळेच प्रत्येक टप्प्यावर जागरूकतेचीही गरज आहे, हे समजून घेतले पाहिजे. सध्याचा काळ नेमका तसा आहे. शेअर बाजार उंच झोके घेत असतानाच्या टप्प्यावर याविषयी लोकजागृती नितांत गरजेची आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (‘निफ्टी’) २० हजार अंशांची उच्चांकी पातळी ओलांडून स्थिरावला.

एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढ, वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वाढते संकलन, नियंत्रणात येऊ पाहणारी महागाई, उत्पादन क्षेत्राचे आशादायक आकडे असे अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचे निकष शेअर बाजारातील तेजीला पूरक ठरत आहेत.

त्यातच म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून बाजारात येणारा गुंतवणुकीचा प्रवाह वाढतोच आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) साह्याने सातत्यपूर्ण वाढती गुंतवणूक होत आहे आणि तिने आता १५,८०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या ऐतिहासिक सहमती व यशस्वी समाप्तीमुळे बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाले, हेही खरे. सध्या बाजारात येणाऱ्या नव्या कंपन्यांच्या प्राथमिक समभागविक्रीला (आयपीओ) मिळणारा तुफान प्रतिसाद, त्यांचे लक्षवेधी ‘लिस्टिंग’, लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमधून मिळू लागलेला घसघशीत परतावा हे सारेच आश्चर्यकारक; पण तितकेच विचार करण्यासारखे आहे.

तेजीच्या लाटेत ‘हात लावाल त्यातून पैसे’ अशी स्थिती होते. त्यावेळी कंपन्यांचे ‘फंडामेंटल’ किंवा ‘व्हॅल्यूएशन’ या गोष्टींकडे पाहण्याचे भान उरत नाही. मूल्यांकनापेक्षा जास्त भाव खाणाऱ्या आणि भक्कम पायाचा आधार नसलेल्या तेजीचा लाभ हुशार गुंतवणूकदार घेत असतात.

अशा वेळी या तेजीला भुलून बाजारात प्रवेश करणारे नवगुंतवणूकदार अडकण्याची किंवा अडचणीत येण्याची शक्यता असते. कारण बऱ्याचदा बाजार ‘फंडामेंटल’ ऐवजी ‘सेंटिमेंट’च्या जोरावर चालत असतो.

अशावेळी तेजीचा फुगा भावनेच्या भरात फुगवला जात नाही ना, हेही पाहायला हवे. कारण तेजीत अनेकांचे भान सुटण्याची शक्यता असते.

बहुचर्चित ‘निफ्टी’मध्ये देशातील ५० प्रमुख कंपन्यांचे शेअर आहेत. ते सारेच लार्ज कॅप आहेत. १९९६ मध्ये १००० अंशांपासून सुरू झालेल्या ‘निफ्टी’ला १० हजारांचा टप्पा ओलांडायला तब्बल २१ वर्षे लागली. त्यानंतरचा १० हजारांचा टप्पा मात्र अवघ्या सहा वर्षांत गाठला गेला. शेअर बाजाराला भारतीय अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचा एक निकष मानला जातो.

त्यामुळे सहा वर्षांतील ही झेप अर्थव्यवस्थेच्या सुदृढ होत चाललेल्या तब्येतीचे लक्षणच मानले पाहिजे. अर्थात भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीचा अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे शेअर बाजारातील सध्याची तेजी (विशेषतः मिड आणि स्मॉल कॅपमधील) सध्याच्या मूल्यांकनाशी सुसंगत आहे, की अवाजवी आहे, हे तपासायला हवे.

सणासुदीच्या दिवसांत बँकांना रोकडटंचाई जाणवू नये म्हणून रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलामुळे सार्वजनिक बँकांच्या शेअरकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे ‘बँक निफ्टी’ही तेजीच्या रंगात न्हाऊन निघाली.

मिड व स्मॉल कॅप निर्देशांक चढत गेले. सोबतीला क्षेत्रीय निर्देशांक त्यांच्याच पक्षात सामील झाले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक या वर्षांत २६-२७ टक्के वाढले आहेत. रेल्वे, संरक्षण, सार्वजनिक उद्योग या क्षेत्रांची चलती तर अचंबित करणारी आहे. आता नेमकी हीच वेळ सावध होण्याची आहे.

Gomantak Editorial
Digambar Kamat: मडगावात कामतांचे वजन घटले? भाजप प्रवेशानंतरही शहराची दुरवस्था कायम

तेजीचे वारू चौफेर उधळलेले असताना सारासार विचार आणि स्वअभ्यास करण्याची व त्यानुसारच पाऊल टाकण्याची गरज आहे. केवळ निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठले म्हणून किंवा तेजीला भुलून स्वैर खरेदी न करता, सावधपणे खरेदी करण्याची हीच ती वेळ असू शकते.

विशेषतः मिड आणि स्मॉल कॅपमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळालेला दिसत असेल, तर वेळीच नफा पदरात पाडून घेतला पाहिजे; अन्यथा दीर्घकाळ अडकण्याची शक्यता असते, असे जाणकार म्हणतात.

अतिलोभाला बळी पडून विक्रीचा निर्णय घेण्यात ‘तळ्यात-मळ्यात’ करत राहिल्यास नको तो शेअर ‘गळ्यात’ पडण्याची शक्यता असते आणि त्यातून आपण नकळतपणे नुसतेच ‘दीर्घकालीन गुंतवणूकदार’ होऊन बसतो.

यातून शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते आणि या बाजारात पश्चात्तापाला काहीही किंमत किंवा अर्थ नसतो. तेजीला लगाम लागतोय असे जाणवायला लागताच मिड कॅप व स्मॉल कॅप मधून बाहेर पडून आपला मोर्चा लार्ज कॅप कडे वळवायला हवा, असे तज्ज्ञ सांगतात. त्यांचा हा सल्ला सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अशावेळी लक्षात घेतला पाहिजे.

Gomantak Editorial
Vijai Sardesai: शॅक धोरण परवान्यासाठी वयोमर्यादेची अट अन्यायकारक

आपल्या पोर्टफोलिओत ‘ॲसेट ॲलोकेशन’ प्रमाणेच ‘इक्विटी ॲलोकेशन’सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे केवळ परतावा जास्त मिळतो म्हणून अतिधाडस करत, मिड किंवा स्मॉल कॅप शेअरच्या मागे न लागता, एका टप्प्यावर लार्ज कॅपसारखा ‘लंबी रेस का घोडा’ दुर्लक्षून चालणार नाही.

कारण नव्या दमाचा घोडा अचानक अडखळला, तर असा ‘लंबी रेस का घोडा’ आपली शर्यत यशस्वीपणे पूर्ण करून देऊ शकतो. सगळे ज्याच्या मागे लागले त्याच्याच मागे न धावता थोडा ‘काँट्रा कॉल’ घेऊन प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे पाऊलसुद्धा उचलावे लागते.

कदाचित आज तीच वेळ कशावरून आली नसेल? त्यामुळे केवळ परतावा जास्त मिळतो म्हणून अतिधाडस न करता दूरगामी विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com