सर्वेश बोरकर
शिवाजी महाराजांनी जून 1674 मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि सामान्य मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष करून छत्रपती हे पद धारण केले .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या माणसाला चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधीश होते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती व न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते.
राज्याभिषेकप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधानमंडळ पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना उत्तर देण्यास बांधील असत.
राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे.
स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार): मंत्रिमंडळातील हे महत्त्वाचा मंत्रिपद रामचंद्र नीलकंठ यांच्याकडे होते. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस): सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे या पदावर असलेल्या अण्णाजीपंत दत्तो यांचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात.
प्रत्येक आज्ञापत्र, खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस): दत्ताजीपंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
सेनापती (सरनौबत): छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते, या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती; हे पद हंबीरराव मोहिते यांच्याकडे होते.
घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डबीर): रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश : निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव): रघुनाथराव पंडित हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
संदर्भ: राजा शिवछत्रपती
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.