वृद्धाश्रम : अयोग्य की अपरिहार्य?

धर्माच्या दृष्टिकोनातून अयोग्य असलेला वृद्धाश्रम अपरिहार्य आहे का, याचा विचार वृद्ध, तरुण असलेल्या प्रत्येकाने करावा.
Old Age
Old Age Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

आश्रम चतुष्टयातील गृहस्थाश्रम हे मूल्य अतिशय महत्त्वाचे आहे. गृहस्थाश्रमी, संसारी माणसावर पुढील पिढी, मागील पिढी आणि समाजाशी, निसर्गाशी असलेला व्यवहार सांभाळण्याची तिहेरी जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडताना आपल्या सर्व कौशल्याचा कस लागतो.

वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली यामुळे अनेक स्थित्यंतरे गृहस्थाश्रमातही झाली. विवाहसंस्था व कुटुंबव्यवस्था नाहीशा करण्याचे प्रयत्न पूर्वीपासून सुरू आहेत आणि त्या पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.

नवीन सक्षम पर्याय उभा न करता हजारो वर्षांची परंपरा, इतिहास असलेली व्यवस्था नाहीशी करणे हे आत्मघातकी ठरेल. या व्यवस्थेतील अपवादांना मोठे करून ते नियम, प्रथा म्हणून बिंबवले जातात. ज्याला ‘प्रथा’ म्हणायचे ती अनिवार्य असते.

ती पाळणे हा नियम व न पाळणे हा अपवाद असतो. ‘सती जाणे’ ही प्रथा असती तर भारतभर प्रत्येक कुटुंबात हे घडायला हवे होते. असे झाले नाही तरी सती जाण्याला ‘प्रथा’ म्हणून बिंबवले गेले; केवळ संस्कृतीविषयी नकारात्मक भावना पसरवून तिला हीन ठरवण्यासाठी.

त्याच रांगेत आता ‘विधवा प्रथा’ नावाचे खूळ माजत आहे. विधवा होणे ही प्रथा कशी असू शकते, हा प्रश्‍नही पडत नाही. एकदा प्रथा म्हटले की, तिला वाईट ठरवायचे, वाईट ठरवले की, संस्कृती कशी हीन आहे, हे त्या संस्कृतीत वाढलेले विचारवंतच पुढे सांगू लागतात.

Old Age
अवकाशाचा वेध घेणारा अवलिया!

सांस्कृतिक मूल्य म्हणा किंवा संस्कार म्हणा, गृहस्थाश्रमा असलेल्या व्यक्तींवर आधीच्या व पुढील पिढीला सांभाळण्याची जबाबदारी असते. एकत्र कुटुंबपद्धतीतले दोष मोठे करून एकल कुटुंबपद्धतीपर्यंत आपला प्रवास झालेला आहे.

या एकल कुटुंबात (पती, पत्नी व मूल) यात आईवडील का नकोसे होतात? लग्नाआधीच मुली विचारतात, घरात डस्टबीन (कचरापेट्या) किती आहेत? प्रश्‍नातील ‘डस्टबीन’ म्हणजे आईवडील हे पहिल्यांदाच समजले तेव्हा डोके सुन्न होऊन गेले.

नवऱ्याच्या आईवडिलांना सांभाळणे हे बायकोचे (नवऱ्याचेही) कर्तव्यच आहे. जर बायकोला भाऊ नसेल तर, बायकोच्या आईवडिलांना सांभाळणे हे नवऱ्याचे (बायकोचेही) कर्तव्यच आहे. तो धर्म आहे आणि त्यापासून विन्मुख होता येणार नाही.

Old Age
Gomantak Editorial: एकजुटीतल्या सांदीफटी!

आपण आपल्या आईवडिलांशी घरात कसे वागतो, याचा कळत नकळत संस्कार मुलांवर होतो. त्याचे परिणाम आपल्याला म्हातारपणी भोगावे लागतात.

आपण घरी आल्यावर मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही यात गुरफटून जात असू व मुलांना त्यांच्या कोवळ्या हातांनी आपले खुपसलेले तोंड वळवून, ‘बाबा, बघा ना हो माझ्याकडे’ असे म्हणावे लागत असेल आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असू;

तर म्हातारपणी तीच मुले आपल्याशी धड बोलतही नाहीत, ही तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार उरत नाही. आपल्या मुलांचे बालपण पाळणाघरात जात असेल, तर आपले म्हातारपण वृद्धाश्रमात जाणे चुकीचे कसे म्हणता येईल?

Old Age
ISRO: इस्रोचे आता ‘आदित्याय नमः’

वास्तविक, बालपण आणि म्हातारपण या दोनही परावलंबी अवस्था आहेत. बालपणाला कौतुक व वात्सल्य लाभते, तसेच ते म्हातारपणालाही लाभायला हवे. आपल्याच आईवडिलांचे त्यांच्या म्हातारपणी आईवडील होण्यासारखे सुख नाही.

आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी कुणी दखलही घेणार नाही, असे असंख्य लहानसहान त्याग केलेले असतात. सुखाच्या क्षणांना मुलांसाठी अव्हेरलेले असते, अभ्यासास्तव पाच वाजता उठवण्यासाठी ते साडेचार वाजता जागे होतात, दुसऱ्या दिवशी कामावर जायचे आहे, हे माहीत असूनही मुलांच्या लहानसहान आजारांमध्ये रात्र रात्र जागतात; कधीच त्याचा साधा उल्लेखही करत नाहीत.

या सर्वांची अंशत: परतफेड करण्याची संधी आपल्याजवळ असते. ती आपण घालवून देतो. ज्यांना सततच्या वैद्यकीय निगराणीची गरज आहे, अशांना वृद्धाश्रमाऐवजी आपण रुग्णाश्रयात ठेवू शकतो;

तेही दररोज किंवा किमान एक दिवसाआड त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलण्यासाठी तिथे जाऊन. पण, वृद्धाश्रमात टाकून (हा शब्द योजतानाही त्रास होतो), मासिक किंवा वार्षिक शुल्क भरून, आईवडिलांना वर्षोनुवर्षे साधा फोनही न करणे अजिबात पटत नाही. तो अधर्मच आहे.

Old Age
Goa Scandal: प्रश्‍न सरकारच्या चारित्र्याचा...

आईवडिलांशी पटत नसल्यामुळे कुटुंबात होणारी रोजची भांडणे ही सामान्यत: प्रत्येक कुटुंबातली समस्या आहे. या समस्येला अनेक कारणे आहेत. मागे एकदा, ‘अविवाहित तरुण आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत’, असे सांगणारा एक मेसेज वाचला होता.

घरात आलेली सून हे आईवडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करण्याचे महत्त्वाचे कारण आहे, असे त्या मेसेज पाठवणाऱ्याला म्हणायचे असावे. पण, केवळ सून जबाबदार असते, असे म्हणणे एकांगी व अयोग्य ठरेल.

बहुतांश भांडणांचे मूळ कारण ‘अधिकार’ असते. स्वयंपाकघरावर, मुलावर, घरावर, संपत्तीवर अधिकार गाजवला आणि वाजवला जातो. याचाच आधार घेऊन अगदी आपल्या दर्शनांमध्येही ‘तक्र-स्नुषा न्याय’ नावाचा एक न्याय आहे.

या अधिकारावरून असलेल्या भांडणांव्यतिरिक्त, बदलत्या परिस्थितीनुसार बदलांचा स्वीकार न करणे, उशिरा होणारी लग्ने - उशिरा होणारी संतती, जनरेशन गॅप, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अचाट कल्पना, तडजोड स्वीकारण्याची तयारी नसणे, अहंकार, सूड या व अशा अनेक कारणांसह, वानप्रस्थ मूल्याचे झालेले उच्चाटन हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.

वानप्रस्थाची जागा वृद्धाश्रमाने घेतली आहे. आपल्या आश्रम चतुष्टयामध्ये ‘वृद्धाश्रम’ नावाचे मूल्य नाही. त्यामुळे, धर्माची चिकित्सा, जिज्ञासा करताना वृद्धाश्रम अयोग्यच ठरतो. आता धर्माच्या दृष्टिकोनातून अयोग्य असलेला वृद्धाश्रम अपरिहार्य आहे का, याचा विचार वृद्ध, तरुण असलेल्या प्रत्येकाने करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com