Calangute Statue Dispute कळंगुटमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद शमायला तयार नाही.
तेथील सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी हिंदुत्ववाद्यांच्या दडपशाहीला घाबरून सुरुवातीला माफी मागितली खरी, परंतु त्यानंतर या प्रश्नावर आपल्याला ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, हे दिसून आल्यावर त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलून पंचायतीने घेतलेला ठराव मागे घेता येत नाही, अशी भूमिका घेतली आहे.
दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास धार्मिक आडकाठी केली जाते व या पर्यटनाच्या राजधानीत तो पुतळा उभारला जाणारच, अशी हेकेखोर भूमिका पुतळ्याच्या समर्थकांनी घेतली आहे.
गोव्यात सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा नको, परंतु आम्हांला जॅक सिकेरा हवेत, अशी काहीशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरंजामशाहीचे प्रतीक व पोर्तुगीजधार्जिणे जॅक सिकेरा चालतात, मग जाज्वल्य शिवशाहीचे प्रतीक शिवाजी महाराजांचा पुतळा का नको? अशी बहुसंख्य हिंदू भावना आहे. त्यामुळे हिंदू-ख्रिश्चन असे स्पष्ट विभाजन गोव्यात वैचारिक पातळीवर तरी घडताना दिसते.
वास्तविक जॅक सिकेरा आणि शिवाजी महाराज यांची दुरान्वयाने तरी तुलना होऊ शकते का?
गोव्यातील भाजपच्या राजवटीत हिंदुत्वाची ध्वजा उंचावून अल्पसंख्याकांना नामोहरम करण्याचा एक बेत शिजत असल्याचा संशय ख्रिश्चनांना आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षांत गोव्यात मराठेशाहीची द्वाही फिरवल्याचाही भास काहीजणांना होतो.
त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांचे पुतळे ठिकठिकाणी उभे करण्याचे प्रयत्न येथील काही शक्ती करू लागल्या आहेत. त्यांच्या मागे प्रत्यक्षात भाजप नसेलही, परंतु हिंदूधार्जिण्या संघटना मात्र त्यामागे जरूर आहेत आणि या सर्वांचे एकमेकांशी पटतही नाही.
भाजप कारकिर्दीत अशा शक्ती वेळीच रोखल्या गेल्या नाहीत, तर त्यांचा पुढे ताप होतो, हे सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने गोव्यात अलीकडच्या वर्षांत अशा अनेक प्रवृत्तींनी डोके वर काढले, त्यांच्याकडे कॉंग्रेसनेही दुर्लक्ष केले. प्रगतिशील चळवळींचाही काणाडोळा झाला.
त्यामुळे त्यांनी देशभर हिंसेचा भडका उडवलेला आपण पाहिला आहे. या संघटना गोव्यातून कार्यरत असल्यामुळे शांतताप्रिय गोव्यालाही काळिमा लागला.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा प्रशासनाने गोव्यातील शांतता भंग झाल्यास येथील जनजीवनाबरोबर अर्थव्यवस्थेलाही गालबोट लागेल, याचा वेळीच विचार करायचा आहे.
याच संदर्भात आपल्याला आज जॅक सिकेरा यांची प्रतीके ख्रिस्ती समाजाला का उभी करावीशी वाटतात? या प्रश्नाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतीक म्हणून वापर करण्याचा हिंदुत्ववाद्यांना किती अधिकार आहे, याचा विचार करायचा आहे.
अलीकडच्या काळात ख्रिस्ती समाज गोव्यात सतत अस्वस्थ बनला आहे, त्यात तथ्य आहे. चिमुकल्या गोव्यावर टोळधाड यावी, तशा बाहेरच्यांच्या फौजा घुसत चालल्या आहेत, त्यामुळे ख्रिस्ती जनमानसाला असुरक्षित वाटते. गोव्यात ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था उभी राहिली त्याला अनुरूप असे स्वतःचे वर्तन ख्रिस्ती समाज स्वीकारू शकला नाही.
परिणामी गोव्यात संधीचा अभाव असल्याचे कारण देत हा समाज गोव्याबाहेर विशेषतः पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असून, गेल्या दहा वर्षांत दोन लाख गोवेकर, बहुसंख्येने ख्रिस्ती समाज गोव्यातून स्थलांतरित झाला. जे गोव्यात ‘वाचून’ राहिले आहेत, ते हतबल झाले व त्यातून ते स्वतःची ओळख अधिकच तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
एकेकाळी- जनमत कौलाच्यावेळी गोवा वेगळा ठेवताना त्यांनी कोकणी अस्मितेचा आधार घेतला होता. ६० वर्षांनंतर मांडवी-जुवारीतून भरपूर पाणी वाहून गेले. आज गोव्यातील बहुसंख्यांनी त्यात ख्रिस्ती समाजाचा प्रामुख्याने समावेश आहे, कोकणी सोडून दिली आहे, त्यांना इंग्रजी माध्यम स्वीकारावेसे वाटते.
दुसऱ्या बाजूला गोवा मुक्तीच्या बऱ्याच काळानंतर ते स्वतःला पोर्तुगीजही मानताना शरम बाळगत नाहीत. या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अस्मितेची प्रतीके शोधताना ते गोंधळल्यासारखे वागतात आणि त्यांनी आपले प्रतीक म्हणून जॅक सिकेरांना स्वीकारलेले आहे. वास्तविक- सिकेरा हे गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे प्रतीक कधीही बनू शकणार नाहीत.
जॅक सिकेरांवर खूप कमी अभ्यास झाला आहे. बांदोडकरांवर जसा अभ्यास झाला, तसे तौलनिक संशोधन सिकेरांवर झालेले नाही. बांदोडकरांच्या अभ्यासकांनी त्यांना जरूर भांडवलशहा संबोधले असले तरी देशातील बहुजन समाजाच्या पहिल्या राजकीय, सामाजिक चळवळीचे ते अध्वर्यू होते, असा निष्कर्ष निघाला आहे.
दुसऱ्या बाजूने जॅक सिकेरा यांच्या कुटुंबीयांशी व तत्कालीन जनमत कौलाचे नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर सिकेरांची जी प्रतिमा सामोरे येते, ती काहीशी सरंजामी, आत्मकेंद्रित अशीच आहे. ती प्रतिमा ख्रिस्ती बहुजन समाजाला कशी काय मान्य होऊ शकते, हा प्रश्नच आहे.
स्वभावतः वर्तनामध्ये आणि प्रवृत्तीने पोर्तुगीज काळात ज्या प्रमाणे उच्चवर्णीयांनी राजसत्तेवर प्रभाव टाकला, त्या गटाचे नेतृत्व सिकेरांनी केले. ते आंतरबाह्य पोर्तुगीज बनले होते. तरी देवाधर्माबद्दल फारसे ते आग्रही नव्हते. चर्चमध्ये क्वचितच जात. शिवाय राजकारण हे स्वतःचे किंवा कुटुंबाचे अस्तित्व सांभाळण्यापुरते त्यांनी चालविले.
त्यांच्या नेतृत्वाखाली ‘युनायटेड गोवन्स’ पक्ष सत्तेवर येण्याचे सोडा, परंतु बहुव्यापी न होऊ शकल्याने गोव्याचे अस्तित्वाचे प्रश्न सोडवू शकला नाही. किंबहुना सिकेरांच्या आडमुठ्या धोरणांमुळे गोवा मुक्तीनंतर ‘युनायटेड गोवन्स’ला गोव्याला नवी राजकीय दिशा देता आली नाही.
जनमत कौलामध्येही सिकेरांचा मर्यादित वावर होता. काही ख्रिस्ती प्राबल्याच्या भागात- जे महाराष्ट्रात विलीन होण्याविरोधात मत देणारच होते, तेथे त्यांनी मर्दुमकी गाजविली असेल, परंतु हिंदू बहुसंख्य भागांत लोकांची मने वळविण्याचे काम त्यांच्याकडून झाले नाही.
किंबहुना भाऊसाहेबांच्या करिष्म्यासमोर त्यांचा निभाव लागणे शक्य नव्हते. हिंदू भागांमध्ये प्रचाराची धुरा वाहणारे शंकर रामाणी, उदय भेंब्रे, उल्हास बुयांव अशा अनेक तडफदार युवकांचे कार्य मात्र प्रेरणादायी आहे. ख्रिस्ती समाजाला या इतिहासाची जाणीव नाही, असे म्हणता येणार नाही.
किंबहुना सिकेरांपेक्षाही जर कोणी महाराष्ट्रविरोधी पोटतिडकीने वावरले असेल, तर ती आहे, ख्रिस्ती चर्च. शेकडो वर्षांच्या चर्चच्या प्रभावाखाली असलेल्या ख्रिस्ती समाजातील प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीने सिकेरांच्या सभा ऐकल्या असतील, पण त्यांनी दोन पानांना मत दिले ते चर्चच्या शिकवणीतून.
कोकणी आणि गोव्याचे संरक्षण, हाच मुद्दा लोकांना पटला. अर्धवट कोकणी बोलणाऱ्या, सिकेरांच्या सांगण्यातून नव्हे. दुर्दैवाने अस्तित्वाच्या काळोखात चाचपडणाऱ्या ख्रिस्ती समाजाला याच सिकेरांचे प्रतीक बनवावेसे वाटते, याच्याएवढे दुर्दैव ते काय?
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातील हिंदू समाजालाही शिवाजी महाराजांबद्दल ओढ असली तरी मराठा समाजाला ती अधिक आहे, हे वास्तव आहे. मराठा समाजाने शिवाजी महाराजांना आपले प्रतीक मानले आहे.
महाराष्ट्रात शिवाजी महाराज हे सर्व समाजासाठी स्वाभिमानाचे प्रतीक असले तरी मराठेशाहीने या प्रतिकाचा राजकारणासाठी वापर चालविला असल्याचे कोणी नाकारत नाही. परंतु शिवाजी महाराज गोव्यात घुसले ते पोर्तुगिजांपेक्षा त्यांना अडचणीत आणणाऱ्या आणि स्वराज्याला धोका निर्माण करणाऱ्या काही लुटारू व शिवशाहीला निषिध्द प्रवृतींना धडा शिकविण्यासाठी. त्यांच्यासाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढाया त्या नंतरचा भाग बनल्या.
परंतु शिवशाहीत अनेक मराठ्यांनीच परकीयांशी संगनमत करून स्वराज्याशी दगाफटका केला होता. दुसरे, हिंदुत्ववाद्यांना शिवाजी महारांजांच्या प्रतिकाचा वापर करण्याचा अधिकार आहे काय?
शिवाजी महाराज यांचा काही गोव्याशी संबंध नाही, उलट त्यांनी पोर्तुगिजांशी तह करून गोव्यावर आपण स्वारी करणार नाही, अशी ग्वाही देत परकीय शक्तींकडून तोफा मिळविल्या होत्या, असे ख्रिस्ती विचारवंत सांगतात, त्यात बरेच मतभेद आहेत. परंतु शिवाजी महाराज हे हिंदूंच्या रक्षणासाठी गोव्यात आले होते काय?
शिवाजी महाराजांनी आदिलशहांच्या सुभेदारांकडून १६६३मध्ये कुडाळ घेतले. त्यानंतर काही काळाने १६६७मध्ये पोर्तुगिजांनी ख्रिस्तीकरणाची मोहीम सुरू करण्याचे फर्मान काढले. परंतु, ‘त्याचा प्रतिकार करण्यासाठीच शिवाजी महाराज गोव्यात आले’ असे नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
त्यावेळी पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांमध्ये बेबनाव होता. दोघांमध्ये अनेक कुरबुरीही चालत. त्याचा फायदा घेऊन पोर्तुगीज हद्दीतील अनेकजण विशेषतः कुडाळ व डिचोलीतील सावंत व देसाई डच वखारींवर हल्ला करून लुटालूट करीत.
ते या लुटालुटीसाठी पोर्तुगिजांकडून मिळालेली शस्त्रे वापरत असल्याचा दाखला सापडतो. वेंगुर्ल्यातील वखारींचे मालक डचांनी तक्रार केल्यामुळेच शिवाजी महाराजांनी देसाई व सावंत यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलली.
वास्तविक शिवाजी महाराज गोव्यात घुसले ते प्रामुख्याने सावंत व देसाई यांचा उपद्रव मोडून काढण्यासाठीच. त्यानंतर नानोडे व रेवोडे येथील राणे यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. बार्देशमध्ये त्याचे पडसाद उमटून सात हजार हिंदूंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. बळजबरीने होत असलेली धर्मांतरे शिवाजी महाराजांना आवडणे शक्य नव्हते.
यावेळी कुडाळमधून आपले पाच हजार घोडेस्वार व दोन हजार सैन्य घेऊन शिवाजी महाराज डिचोलीत उतरले. त्यांनी पोर्तुगीज गव्हर्नरना सक्तीच्या धर्मांतराचे फर्मान मागे घेण्यास बजावले. ते गव्हर्नरनी साहजिकच जुमानले नाही. परंतु वेंगुर्ले येथे वखार लुटणाऱ्या केशव नाईक यांना आपल्या स्वाधीन करण्याची महत्त्वाची अट पुढे केली होती.
ती मान्य झाली नाही, त्यावेळी बरेचसे सावंत व देसाई यांनी पळून येऊन आसपासच्या पोर्तुगिजांच्या किल्ल्यात आश्रय घेतला होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी त्यावेळी कोलवाळ किल्ल्यावर हल्ला केला. तेथे त्यांनी चार पाद्रींना ते हिंदू धर्म स्वीकारण्यास तयार नाहीत अशा सबबीखाली कंठस्नान घातले, अशी कथा सांगितली जाते.
त्याबद्दलही इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी किल्ल्यावर हल्ला केला असता, चार पाद्री त्यात मारले गेले असल्याचा दाखला सापडतो. या सैन्यांनी कोलवाळबरोबर शापोरा किल्ल्यावरही हल्ला केला.
इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकर सांगतात, १६६८मध्ये महाराजांनी सासष्टी व बार्देशवर हल्ला करण्यासाठी सैन्याची जमवाजमव केली होती. परंतु पोर्तुगिजांचीही तेवढीच तयारी असल्याने त्यांनी हा बेत रहित केला. नंतर चार-पाचशे लोक गोव्यात घुसवले असता हे लोक पकडले गेले व त्यांचा तोही बेत फसला.
१६६८च्या नोव्हेंबरमध्ये महाराजांनी नार्वे येथील श्रीसप्तकोटीश्वराच्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. सन १५४०मध्ये हे मंदिर पोर्तुगीज धर्माधिकाऱ्याने इतर देवालयांबरोबर मोडून टाकले होते. आपल्या राज्याभिषेकाच्या पुढच्या वर्षी १६७५मध्ये शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला.
पुष्कळ दिवस हा किल्ला लढत होता, त्यात महाराजांचे दोन हजार घोडदळ व ७ हजार पायदळ गुंतले होते. हा वेढा चालू असतानाच शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी पोर्तुगीज अमलातील चांदरवर हल्ला केला. त्यामागेही तेथील लपून बसलेल्या देसाईंचा ठावठिकाणा शोधण्याचे कारण झाले,असे पिसुर्लेकरांनी नोंदविले आहे.
याच काळात महाराजांनी फोंडा किल्ला जिंकून घेतला त्यामुळे फोंडा, सांगे, केपे व काणकोण हे महाल त्यांच्या अमलाखाली आले. याच एप्रिल मे १६७६ महिन्यात त्यांनी शिवेश्वर, अंकोला व कारवार किल्लेही ताब्यात घेतले. महाराजांचा अंमल कोकणावर अशा पद्धतीने सुरू झाला.
शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी गोव्यात शौर्य गाजविले त्याबद्दलही इतिहासकारांमध्ये एकमत आहे. पिसुर्लेकर यांच्या मते जुवे बेट व कुंभारजुवे संभाजी महाराजांनी घेतल्याचा पुरावा मात्र उपलब्ध नाही.
११ डिसेंबर १६८३ रोजी संभाजी महाराजांच्या सैन्याने सासष्टी व बार्देश या पोर्तुगिजांच्या मुलखावर हल्ला केला. या दोन्ही प्रदेशांत मराठ्यांचे एकंदर ६ हजार घोडेस्वार व १० हजार शिपाई होते. त्यांनी तेथे लूट व जाळपोळ केली, चर्चेस व तेथील मूर्ती तोडून टाकल्या. या सैन्याबरोबर खात्रीने संभाजी महाराज नव्हते. या सैन्याने सासष्टीतील स्त्रियांवर अत्याचार केले.
अनेक स्त्री-पुरुष, मुलांना पकडून नेले व काही गुलाम म्हणून आपल्या शिपायांना दिले. काही वेंगुर्ल्यातील अरबांना व वखारकारांना विकले, याबाबत पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांकडे तक्रारही दाखल केली होती. पिसुर्लेकरांनी याचा उल्लेख केला असला तरी ती पोर्तुगिजांची रचलेली कथा होती, असे काही इतिहासकार मानतात.
महाराजांच्या कारकिर्दीत स्त्री व मुलांचा मान राखला जाईल, याची शत्रू पक्षालाही जाणीव होती. सासष्टी व बार्देश ताब्यात घेतल्यानंतर गोव्याचे राज्य संभाजी महाराजांच्या हाती जाण्याची वेळ आल्याची बातमी समजल्यानंतर पोर्तुगीज गव्हर्नर सेंट फ्रान्सिस झेव्हियरची करुणा भाकली, असा उल्लेख सापडतो. त्याचवेळी मोघल बादशहाच्या सैन्याची त्यांना मदत आली व मराठ्यांना गोव्यातील वेढा उठवावा लागला.
शिवाजी महाराजांशी पोर्तुगिजांनी गोव्यावर स्वारी न करण्याचा कोणताही तह केला नाही. परंतु मुत्सद्दीपणे पोर्तुगिजांच्या दूतांना फोंडा किल्ल्यात आणून बसविले आणि आपला डाव साध्य करून घेतला.
गोव्यात याकाळात साखळी, डिचोली, पेडणे व फोंडा येथील कित्येक संभाजीद्रोही राहत असत, ही माहिती देऊन पिसुर्लेकर म्हणतात. कुडाळचे खेम सावंत, राम दळवी, तान सावंत वगैरे देसाई तसेच साखळीचे रुद्राजी राणे व येसोबा राणे यांनीही संभाजी महाराजांविरुद्ध बंड पुकारून १६८५च्या सुमारास आपली कुटुंबे पोर्तुगीज सरकारच्या आश्रयास गोव्यात पाठविली होती.
कोकणच्या देसाईंप्रमाणेच कारवारच्या देसाईंनीही संभाजी महाराजांविरुद्ध बंड पुकारून पोर्तुगिजांच्या अंजदीव बेटात आपले कबिले ठेवले व मराठ्यांचा कारवारचा किल्ला ताब्यात घेतला.
कारवारच्या देसाईंनी मग हा किल्ला व त्यांच्या परिसरातील भटकळपासून अवरसा नदीपर्यंतचा प्रदेश सौंदेकरांच्या स्वाधीन केला. सौंदेकरांनी ७०० शिपाई पाठवून अंकोलेपर्यंतचा सर्व प्रदेश बिनविरोध हस्तगत केला.
त्याच काळात सौंदेकरांनी देसाईंच्या साह्याने संभाजी महाराजांचे कारवार येथे येऊन राहिलेले आरमारही ताब्यात घेतले. त्यात अनेक जहाजे व ३००पेक्षा अधिक तोफा होत्या.
लक्षात घेतले पाहिजे नव्या काबिजादींमध्ये मधल्या काळात मराठ्यांचेच राज्य होते. परंतु शिवाजी किंवा संभाजी महाराजांशी येथील सावंत व देसाई यांचे पटले नाही. विशेषतः आजच्या गोव्यातील मराठ्यांना ही परंपरा अभिमानाने सांगता येईल काय? हा प्रश्नच आहे.
दुसरी बाब म्हणजे मराठेशाहीने जेव्हा पोर्तुगीज प्रांतावर हल्ला केला, तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी पोर्तुगिजांनी मोठ्या प्रमाणावर कर लागू केले होते. त्यावेळी ग्रामसंस्थांना कराखाली भरडले जात असे. या ग्रामसंस्था उच्चवर्णीय ख्रिश्चनांच्याच ताब्यात होत्या, त्यामुळे हे सारे मराठ्यांच्या उपद्व्यापामुळे आम्हाला भोगावे लागते, असे नॅरेटिव्ह गोव्यात तयार झाले.
वास्तविक त्याकाळात धर्मावर सत्ता चालत नव्हत्या. शिवाजी महाराजांच्या सैन्यातही अनेक धर्मीय सरदार होते. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लीम सरदार, चाकर व सैन्य होते. मुस्लीम राजांच्या पदरी हिंदू सरदार, चाकर व सैन्य होते. जाट, रजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता.
प्रामुख्याने ते लुटालूट विरोधात व केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणाविरुद्ध उठाव होते. तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला, याची पाहणी केली तर हिंदू विरुद्ध मुसलमान व हिंदू विरुद्ध ख्रिश्चन अशा झाल्या असे दिसत नाही.
डच आणि पोर्तुगीज लढत होते, मराठा आणि मराठा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते व शिवशाहीस मराठ्यांनीच अपशकून केला होता, असे इतिहास सांगतो. गोविंद पानसरे म्हणतात, हिंदू मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध होते.
मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमीजास्त प्रमाणात शिवाजींच्या विरुद्ध होते. व्यंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंदही विरोधी होते.
शिवाजींचे कार्य ‘धर्मकार्य’ होते, तर मग या कार्याला परम धर्मप्रिय मराठे सरदारांनी विरोध का केला? कारण त्यांना आपल्या हातातील सत्ता आणि मक्तेदारी सोडायची नव्हती. शिवाय त्यांची निष्ठा वतनावर होती.
इतिहास हा खूप गुंतागुतीचा असतो. घटनांचा अर्थ लावताना बरीच खबरदारीही घ्यायची असते. वास्तविक शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजी यांनीही पोर्तुगिजांकडून सासष्टी व बार्देश आदिलशहांना परत मिळवून देण्यासाठी ११ ऑगस्ट १६५४ मध्ये गोव्याच्या लढाईत सहभाग घेतला, परंतु तो अादिलशहांचे सरदार म्हणून!
त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामींची सेवा करीत, अशी माहिती गोविंद पानसरे यांनी आपल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात दिली आहे.
सरंजामी युगातल्या खड्या सैन्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो, तोवर इमानेइतबारे त्याची चाकरी करायची ही त्याकाळात सर्वमान्य नीती होती.
पानसरे म्हणतात: मुसलमान राजे क्रूर होते, त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली, धर्म बुडवला म्हणून सर्व मुसलमान हिंदूंविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेतच आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत, त्याअर्थी हिंदूंनी त्यांच्या विरोधात असले पाहिजे, हा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो...
आक्रमक मुस्लीम सैन्याने सत्ता काबीज करताना देवळे फोडली, लुटली हे सत्य आहे. परंतु ते पूर्ण सत्य नाही. अरब तुर्क अफगाणी आदी आक्रमक टोळी वजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी व त्या हिश्शातून पगार घ्यावा, अशी रीत असे.
हिंदू देवळामध्ये त्या काळी खूप संपत्ती असे. हिंदू राजांनी परकीय मुलखात स्वाऱ्या केल्या, तेव्हा तेथील बाजारपेठा लुटल्याच होत्या. त्याकाळात राज्य हे मुख्य होते आणि धर्म हा दुय्यम.
गोविंद पानसरे म्हणतात, शिवाजी महाराज निश्चित हिंदू होते, त्यांची धर्मावर श्रद्धा होती. धर्मासाठी व देवळांसाठी ते दान देत होते. तरीही त्यांनी मुस्लीम धर्माचा द्वेष केला नाही. मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयीकरण केले नाही.
त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यांकडून नेकीचा व्यवहार करून घेतला. सैन्य ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील, तेथील मशिदी, कुराण किंवा स्त्रीस त्रास देता कामा नये, उलट त्यांचे रक्षण करावे...
पानसरे यांनी स्पष्टच म्हटलेले आहे, जे कोण आपली मते पुढे आणण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर करीत असतील, त्यातून धर्मद्वेष निर्माण करीत असेल, तो माल शिवाजी महाराजांचा म्हणून खपवू नये. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुसलमानांना पक्षपातीप्रमाणे वागविले नाही.
हिंदुत्ववाद्यांना कळंगुटमध्येच शिवाजी महाराजांचा पुतळा व्यवस्थित परवानगी न घेता का उभारावासा वाटतो? वास्तविक शिवाजी महाराज आग्वाद किल्ला घेतल्यानंतर कळंगुटमध्येच मुक्कामाला होते, असा लोकवेदातील उल्लेख सांगतो.
सध्या जेथे डॉ. प्रोएस यांचे कुटुंब राहते, तेथे शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता. स्वतः ते कुटुंब त्याची माहिती अभिमानाने सांगत असते. ज्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे, ते ख्रिस्ती देशभक्त महाराजांचा गुणगौरवच गातील.
परंतु राजकारण करणाऱ्यांना मात्र आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची असते. वास्तविक कळंगुट, कांदोळी, नेरूल येथे हिंदूंना स्मशानभूमीचाही लाभ मिळत नाही, या अन्यायाविरुद्ध हिंदू संघटना कधी आवाज उठवताना दिसत नाहीत. गोव्यात अनेक ठिकाणी हिंदूंना स्मशानभूमीची सोय नाही, जातीय संघर्ष आहे, हे साऱ्यांनाच नामुष्कीप्रत वाटत नाही काय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.