गणपती बाप्पांचे मनोगत: ‘सी यू ऑल’ लगेच

पाश्‍चिमात्यांत मी ‘एलिफंट गॉड’ म्हणून ओळखला जातो
गणपती बाप्पांचे मनोगत
गणपती बाप्पांचे मनोगतDainik Goamantak
Published on
Updated on

हो, मी तुमच्या सर्वांचा लाडका गणपतीच. कुणी मला गणेश म्हणतात, तर कुणी बाप्पा. तशी माझी एकशेआठ नावे प्रचलीत आहेत. पण, मला आपले गणपतीच नाव आवडते. माझे आई - बाबा म्हणजे पार्वती आणि शंकर. माझे बाबा तसे पाहिले तर बरेच रागीट आहेत. त्यांच्या रागाचा पारा कधी चढेल, काही सांगता येत नाही आणि एकदां का तो चढला, तर त्यांचा तिसरा डोळा हळुहळु उघडूं लागतो. मला तर त्यांच्या रागाची भितीच वाटते. तसं त्यानी, त्यांच्या रागाचा प्रसाद मला फारसा कधी दिला नाही, पण फक्त एकदाच मला त्यांचा राग सोसावा लागला होता आणि त्यामुळेच मी हा असा एकदम वेगळा झालो.

पाश्‍चिमात्यांत मी ‘एलिफंट गॉड’ असा संबोधला जायला लागलो. काही का असेना, सगळ्या जगाचा मी लाडका झालोय, हे नक्की. माझं हे असं तुंदीलतनु, गजमुखी, वक्रतुंडी, चारहस्ती स्वरुप सगळ्यांनाच पसंत पडले. माझ्या ह्या तुंदीलामुळे होणाऱ्या दुडुदुडु चालीने मी तर लहान मुलांचा समवयस्क मित्रच बनलो. माझा भक्त कितीही लहान असला किंवा कुठल्याही वयाचा असला अगदी शंभरीचा असला तरी सगळे मला आपला समवयस्कच समजतात. आज हजारो वर्षे माझ्या ह्या भक्तांचे माझ्यावरचे प्रेम व श्रद्धा टिकून आहे. माझंही भक्तांवरचे प्रेम असेंच टिकून आहे. संधी मिळाली की मला त्यांच्यात जावून त्यांच्यात मिसळून जावेसे वाटते.

गणपती बाप्पांचे मनोगत
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पुजाऱ्यांची टंचाई

तसं पाहिलं, तर ह्या कैलासावर मला खूप ‘बोअर’ होतं. माझ्याबरोबर खेळायला, माझ्याशी बोलायला कुणीच नसतं. माझ्यातील ह्या अशा फरकामुळे माझं तसं कुणाशीच जमत नाही. कैलासावरील सगळे मला मान देतात व मानाने वागवतात. पण, माझ्या खांद्यावर हात टाकून माझ्या बरोबर कैलासभर भटकंती करायला, सुखदु:खाच्या गोष्टी करायला, दंगामस्ती करायला तसे कुणीच नसतं. एकटा उंदीर तेवढा तयार असतो. पण, शेवटी तोही उंदीरच पडला ना? त्याच्याशी काय आणि किती बोलणार? तशांत त्याची नजर नेहमी माझ्या हातातल्या मोदकांवर असते. लक्षच नसते मी काय बोलतो, करतो त्यावर. कार्तिकेयदादा नेहमी फिरतीवर असतो त्रिखंड भर. तो कैलासावर येतो तेव्हा वेळ मजेंत जातो.

नाहीतर मग असेच काहीच करायला नसते, काहीच शिकायला नसते. तशा ऋषिमुनींच्या खूप पाठशाळा इथे आहेत, पण मीच ज्ञानाची देवता असल्यामुळे तिथे जावून आणि काय वेगळे शिकणार ना? मला खरे तर चालायला फार आवडते. कैलासावर आमच्या घराबाहेर खूप मोकळी जागा आहे. तिथे चालायला मला फार आवडते. पण, माझ्या ह्या अशा अवतारामुळे आई-बाबांना नेहमी भितीच वाटते की हा कुठे पडेल, धडपडेल, इजा करून घेईल. त्यामुळे मी कुठेही जायचे आईच्या कानावर पडले की, ती लगेच उंदीरमामाला बोलावते व मला त्याच्यावर बसवते. मग निघते आमची स्वारी. कैलासावरचे सगळे वासी मग आमची ती सवारी टकमक पाहात राहतात. फार अवघडल्यासारखे होते त्यामुळे.

गणपती बाप्पांचे मनोगत
Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पांसोबत 'मोरया' हा शब्द का जोडला गेला...वाचा या शब्दाची कथा

माझ्या ह्या असल्या अवघडलेल्या अवस्थेमुळे मला माझ्या भक्तांची फार फार आठवण येते. तशी आठवण नेहमीच येत असते. कारण फक्त तुम्हीच माझें सगळे, माझा हा अवतार, माझें चालणे माझें बोलणे, माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीच्या कला म्हणजे गाणे बजावणे नृत्य गायन कला...माझ्यासाठी करता. तुमच्या घुमटाच्या साथींतल्या माझ्या आरती ऐकणे हा तर माझा छंदच होऊन बसला आहे. दरवर्षी दीड दिवस का होईना, मला तुमच्याकडे राहावयास येणे फार आवडते. दहा दिवस माझें राहणे तर तुम्ही एखाद्या उत्सवासारखे साजरे करता. माझे दर्शन घेण्यासाठी तुम्ही लांबच्या लांब रांगा लावता. माझ्या परत घरी जावयाच्या कार्यक्रमाला तुम्ही कमालच करता. इतके माझ्यावर प्रेम करता की माझ्या जावयाच्या क्षणी घरांतली मुलगी लग्न होउन सासरी जातेवेळी जसे घरांतली लहानथोर मंडळी रडारड करतात तशीच रडारड इथेही सुरू होते. लहानगी मंडळी तर विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळपासूनच चेहरा पाडून वावरत असते. ते बघून मलाही मग ते घर सोडणे अगदी जीवावर येते. माझ्या आगमनाच्या दीड दिवस आधी माझ्या आई-बाबांचे आगमन तुमच्या घरी होते.

आईला, माझ्या जन्मावेळचे दिवस भरले असल्यामुळे तुम्ही तिचे अत्यंत काळजीपूर्वक स्वागत करता. तिला काय हवे, नको ते पाहता. तिचे सगळे आस्थेने करता. बाबांचे सगळे ओवळे सोवळे अगत्यपूर्वक करता. इतकेच काय पण माझ्या उंदराचीही तुम्ही काळजी घेता. त्याला स्थापन करता, आणि हे सगळे करून तुम्हाला त्या काटे वा कुक्कुट विरहीत जेवणाशिवाय जगणे शक्य होत नाही? थोडासा संयम बाळगा ना, मलाही बरे वाटेल. पण, त्यामुळे मी तुमच्यावर रागावून जातोय असे अजिबात नव्हे बरं का! फक्त तुमच्यांत अजून थोडा संयम यावा, तुम्ही तुमच्या विकारांवर विजय मिळवावा असेच मला वाटते. नाहीतर मी इतक्यावेळां तुमच्या घरांत आलो असतो का? कमीतकमी दीड तरी दिवस तुमच्या घरांत मुक्काम ठोकतो. गावागावात तर दहा आणि क्वचित एकवीस दिवसदेखील राहतो आणि दर महिन्याला विनायकी किंवा संकष्टी म्हणून तर येतोच. काय मग, कराल ना माझ्यासाठी तेवढें? अजून बरंच काही सांगायचे आहे, पण ते पुढे केव्हातरी. बरंय मग. ‘सी यू ऑल’ लगेच.

-प्रदीप तळावलीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com