हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणात तर हा सर्वांत मोठा सण आहे (the biggest festival in Konkan). नोकरी-व्यवसायानिमित्त देशाच्या अन्य भागातच केवळ नव्हे तर विदेशांत (from abroad) असलेले लोकही घरी परततात. काही दिवस कुटुंबीयांसमवेत राहतात व नंतर परत कामावर रुजू होण्यासाठी निघून जातात. अशा या गणपतीची पूजाअर्चा नेमकी कधीपासून सुरू झाली ते कुणालाच माहीत नाही. पण परंपरागत ती सुरू आहे हे नक्की. आता विविध प्रकारांत गणपतीचे पूजन होते हे खरे. अधिकतम ठिकाणी मातीची गणपती मूर्ती स्थापन केली जाते, तर पत्री कागदी रूपातही तो पुजला जातो. दीड दिवसानंतर तिचे विसर्जन केले जाते, तर नवसाचे गणपती नवसाप्रमाणे पाच, सात, नऊ, अकरा वा २१ दिवसांनी विसर्जित केले जातात. क्वचित ठिकाणी ३६५ दिवसांचे (वर्षभराचे) गणपतीही असतात. माझ्या माहितीप्रमाणे बार्देशात पर्रा या ठिकाणी असा वर्षभर पुजला जाणारा गणपती होता. चतुर्थीच्या आदल्या दिवशी विसर्जन केले जायचे व दुसऱ्या दिवशी नवी मूर्ती आणली जायची. अजून ती प्रथा सुरू आहे की काय त्याची आता माहिती नाही.
सांगण्याचा मुद्दा म्हणजे घरगुती वा व्यक्तिगत नवसाचे गणपती हे पाच ते नऊ वा अकरा दिवसांचे असत, तर सार्वजनिक गणपती उत्सव हा सात ते अकरा व क्वचित २१ दिवसांचा असतो. सध्या कोविडमुळे त्यावर निर्बंध आलेले असले तरी कमी जास्त प्रमाणात ते सुरूच आहेत. माझे बालपण हे काणकोणमधील टोकावरील गावात गेले. त्या काळात म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात त्या भागात घरगुतीच चतुर्थी असायची, सार्वजनिक गणपती नव्हतेच. घरगुती गणपतीसुध्दा दीड दिवसाचे, अधिक दिवसांचे गणपती विरळाच होते. त्यामुळे दीड दिवसाच्या उत्सवात आमची काय ती हौसमौज चाले.
त्या काळात श्रावणी आयतार, सुतां पुनव, अष्टम व नंतर चवथ ही आम्हा मुलांसाठी पर्वणी असे. त्यामुळे या परबांच्या तयारीला आम्ही वाड्यावरील बालमंडळी मोठ्या उमेदीने लागत असू. त्या मागील एकमेव कारण हे गोडधोड खायला मिळे हे असे. माझ्या घरी अष्टमीला माझे चुलते व वडील हे ११०८ तुळशी देवाला अर्पण करत. चुलते आमच्या पुरुषाच्या देवळात प्रथम त्या घालत व नंतर घरी येऊन तोच कार्यक्रम करत. तो आटोपेपर्यंत मध्यानरात्र उलटे, पण आम्ही मुले डोळे चोळत जागरण करत असू, ते त्यानंतर मिळणारे अनेक प्रकारचे पोहे व उसळीसाठी. हे गोडधोड खाण्यात कधी श्रावण संपला तेच कळत नसे.
अष्टम उलटली की लगेच घरोघरी गणपतीची कूड (खोली) सारवणे, क्वचित ठिकाणी तेथे चुना काढणे, माटोळीसाठी दोऱ्या ताणणे हे काम सुरू होई. मग आमचे गुरांचे राखणे एक दिवस माटोळीचे साहित्य आणून टाकत. म्हणता म्हणता तयेचा दिवस उजाडे. त्या दिवशी गवर-महादेव व गणपतीच्या आसनाची तयारी केली जाई. एक बाक व त्यावर दोन लाकडी पेट्या ठेवायच्या. त्यावर चवाय ठेवली, की झाले आसन तयार. आताप्रमाणे मखर वा अन्य आरास कुठेच नसे. गवर महादेव हे सुध्दा कासाळी या अळू वर्गातील वनस्पतीपासून केले जायचे. एका मोठ्या खोक्यात एक मोठा नारळ सोलून तासून ठेवला, की झाला महादेव, तर दुसऱ्या लहान खोक्यात विविध जातींची पत्री व धान्याची पाने कापून भरायची. त्यावर आमच्या शेजारचे भीकूबाब कासाळेच्या मानावरच उलट्या बाजूने सुंदर मुखवटे करायचे. पांढऱ्या पत्रीची पाने त्याला आतून लावली की ते मुखवटे सजीव वाटायचे. त्या दिवशी गौरीचा सर्व नैवेद्य अळणी असायचा, पण तो आम्हा मुलांना आवडत नसे. आम्ही महादेवाच्या नैवेद्यावर ताव मारत असू. त्या दिवशीचे जेवण झाले की मग गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू व्हायची ती माटोळी बांधणीने.
गवर-महादेव यांच्या पूजेपूर्वी तसेच गणपतीची मूर्ती आणल्यानंतर माटोळी बांधायची नाही, असा जणू अलिखित नियमच त्यावेळी होता व कसोशीने तो पाळला जात होता. ताणलेल्या दोरीला आंब्याच्या लहान लहान डहाळ्या बांधून झाल्या की नंतर प्रथम बांधला जाई तो नारळ म्हणजेच श्रीफळ. माटोळीला आताप्रमाणे कृत्रिम सजावट नसे, तर घरोघरी तयार होणारी फळफळावळ वा अन्य वस्तूच बांधल्या जायच्या. केळी, सुपारी यांचा त्यात प्रामुख्याने अंतर्भाव असे. त्यावेळी वाड्यावाड्यावर गणपती तयार केले जात व त्यामुळे मुलांचा तेथे रोजचा राबता असे. तो आणताना मुलांचा उत्साह दुप्पट होई, तो विसर्जनापर्यंत राही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मात्र हुरहुर लागे ते सायंकाळी होणार असलेल्या विसर्जनाच्या आठवणीने. आमच्या वाड्यावर सात-आठ घरे व उत्तरपूजेला एकमेकांकडे जाण्याची प्रथा. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उत्तरपूजेच्या सांगणीनंतर होणाऱ्या ‘मोरया’च्या घोषणेवेळी आम्हा मुलांच्या डोळ्यात पाणी येई. नंतर देवळापर्यंत मूर्ती नेल्या जात व तेथे पुन्हा आरती होऊन तळीत विसर्जन होत असे. ते करून रिकामा चौरंग घेऊन घरी परतताना मन व्याकूळ झालेले असे.
त्या वयात त्या व्याकूळतेमागील कारण कळत नव्हते. आता ते कळते पण त्याला उपाय नसतो. घरी आल्यावर गवर- महादेव यांचे विसर्जन करायचे असे. त्यांचे ताट नेऊन फणसाच्या झाडाखाली ठेवले जायचे. ते तेथे का ठेवतात याचे उत्तर त्या वेळीही मिळत नव्हते व आताही नाही. त्या विधीने खरे तर चतुर्थी संपते, पण आम्ही मुले चुळबुळत झोपू ते दुसऱ्या दिवशी पहाटे जाऊन गौरीच्या हातातील बांगड्या आणण्यासाठी. त्यावेळी त्या बांगड्यांचे इतके आकर्षण का याचे कोडेही कधीच सुटले नाही.
आता बालपणातील चतुर्थी व आजची चतुर्थी यांची तुलना केली तर त्या वेळची सर आताच्या या उत्सवात नाही, असेच उत्तर मिळते. त्यावेळी चतुर्थीच्या दिवशी कधी जेवण होते व गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतो यासाठी आम्ही आतुर असू. माशेहून चक्क पेडे लोलयेपर्यंत (माझे आजोळ) मी व माझे वाड्यावरील सवंगडी जात. वाटेत सुट्या केलेल्या मारांदातील काड्या पेटविण्यात जो आनंद मिळे तो अवर्णनीय असे. आज तसे चित्र दिसत नाही. फार काय घराबाहेर पडण्याचीच तयारी दिसत नाही. त्यावेळी चतुर्थीची तयारी करताना एकेक वस्तू जमविताना, सजावट करताना जो जिव्हाळा-माया जाणवायची ती आता दिसत नाही. खरे तर आता त्या वेळच्या कितीतरी पट अधिक या उत्सवाच्या तयारीवर खर्च होतात. त्यावेळी वडील वा चुलते जी मूर्ती आणत त्याच्या विड्यावर सात ते आठ रुपये ठेवले जायचे, तर आज दीड-दोन हजार रुपये ठेवले जातात. आम्हांला त्यावेळी चार मारांद (फटाके) मिळत. चतुर्थीला एक, पंचमीला एक व उत्तर पूजेला दोन. बस्स एवढेच. त्यामुळे अन्य कोणी मारांद दिला तर त्याच्या काड्या वेगवेगळ्या करून त्या पेटवत. चंद्रज्योती आणल्या तर आम्हांला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद होई. पण आज गणपतीची मूर्ती आणतानाच सहजपणे एक बॉक्स पेटविला जातो. घरगुती नैवेद्यापेक्षा फरसाणवाल्याकडील विविध प्रकारचे मोदक ठेवण्यात धन्यता मानली जाते. फार दूर कशाला माटोळीला माडतीची करमले-कात्रे, कुड्याची फळे वा कांगोणा दिसत नाहीत. त्या ऐवजी सफरचंद, मोसंबी, डाळिंब व अन्य बाजारी फळे दिसतात, सुपाऱ्याही असतात, पण त्या स्वतःच्या बागेतील नव्हे तर बाजारातून विकत आणलेल्या.
हे एकंदरीत चित्र पाहिल्यावर केवळ एक सोपस्कार म्हणून तर आपण गणपतीचे पूजन तर करत नाही ना, असा प्रश्र्न पडल्याशिवाय राहत नाही. गजानन ही खरे तर निसर्गदेवता, पण आपण त्याला जणू काही ‘शोपीस’चेच रूप देऊ लागलो आहोत व त्याचे कारण आपली झपाट्याने बदलत गेलेली जीवनशैली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.