श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सर्वांना गणेश चतुर्थीचे वेध लागतात. भाद्रपदातील चतुर्थी म्हणजे एखाद्या कुंभमेळ्याची पर्वणी होय. गावाकडून शहरात कामधंद्यासाठी गेलेली कुटुंबे चतुर्थीला न चुकता आपल्या जन्मगावी घराकडे येतात. एक वर्षानंतर आपले मातीचे घर अगर राजांगणाला आपल्या कुटुंबासह पाय लावतात. चतुर्थी म्हटली की घरादाराची साफसफाई आणि रंगरंगोटी आलीच. आज जरी सिमेंट-काँक्रिटची घरे अगर बंगले निर्माण झाले, त्यावर रासायनिक रंगसफेदी केली, तरी पूर्वी मातीची सफेद शेड, अगर तांबड्या दगडाचा रंग बनवून घरातील भिंती रंगवीत होते. घरातील जमीन मातीची असल्याने चुलीतील काळ्या कोळशांची पावडर करून ती शेणात मिसळून जमीन सारवायचे. त्याने घरातील जमीन काळी दिसायची, घराच्या सजावटीकरिता रंगीबेरंगी कागदी पेपराच्या पताका करून गणपती पूजनाची खोली सजवायचे, माटोळीसाठी रानातील वेगवेगळी फळे गोळा करायचे, केवणीच्या झाडाचे दोर जमा करायचे. अशाने गोकुळाष्टमीचा सण कधी साजरा झाला हे कळायचे नाही. वर्षाकाठी येणारा श्रावण म्हणजे सोवळा महिना. सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे दिवस देवाच्या नावे उपवास करायचे, रविवार हा घराघरांत एकवीस वनस्पतीची पाने-फुले पुजण्याचा दिवस. त्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी हे सण साजरे करायचे आलेच, त्याने संपूर्ण महिना मांसाहारविरहित पालन करण्याचा म्हटल्याने, ताळखीळा, कुर्डुक, शेवगा, सुरण, शिरमंडोळ, सूळ आणि इतर भाज्यांचे सेवन, जन्माष्टमी झाली म्हणजे गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली असे मानले जात होते.
अष्टमीच्या दहा दिवसांनंतर येणारी चतुर्थी म्हणजे महाकुंभमेळ्याची तयारी. परराज्यात अगर शहरात राहणारा माणूस आपल्या कुटुंबासह जन्मस्थान घराकडे येण्याच्या धावपळीत असतो. चतुर्थीला तो आपल्या खिशाला पाहत नाही, सर्वांना नवीन कपडे, घरच्या मंडळींना वस्तू घेऊन तो गाडी, बस, रेल्वे पकडून चतुर्थीपूर्वी घर गाठतो आणि चतुर्थी दोन दिवसांवर असताना विभक्त झालेली कुटुंबे एकत्र कुटुंबपद्धती बनते हा नैसर्गिकपणा कोणाच्या लक्षात येत नाही, घर गाठल्यानंतर तो शेजाऱ्यांची विचारपूस करतो. आपल्या शेतीवर जातो, रानात जाऊन माटोळीची रानफळे आणतो, बाजारातून भाजी, फळफळावळ, जेवणाचे साहित्य आणतो, गणपती पूजनाचे साहित्य, आरती संग्रह घेतो, फटाकडे साहित्यावर बंदी असली तरी खरीदतो. कारण चतुर्थीला दारूकामाची आतषबाजी झाल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही, कारण आमची संस्कृती भोळ्या मनावर उभी आहे. चतुर्थी म्हटली की हार्मोनियम, पखवाज, मृदंग, टाळ, भजनासाठी आलेच, पण हल्लीच्या काळात चतुर्थीला गावागावांत घुमट, समेळ आणि कासाळ्याच्या वाद्याने श्री गणेशाच्या आरती गातात. मात्र एक खरे अशाने एकोप्याचे एकत्र कुटुंब दिसून येते.
हे सारे डोळ्यांसमोर येताना कधी गौरी पूजनोत्सव येतो हे आपल्याला कळत नाही. गृहिणी गौरीपूजनासाठी एकवीस वनस्पती झाडांची पत्री एकत्र करून ती हळदीच्या पानात बांधतात आणि नऊवारी लुगडे नेसून गौरी महादेवाची पूजा करतात. त्याच दिवशी गणपतीची माटोळी बांधतात, सुवासिनी बाया गौरीला नारळ, विड्याचे वाईन वाहतात आणि चतुर्थीला सुरुवात होते. जेवणासाठी केळीची पाने, पातोळ्यासाठी हळदीची पाने, माटोळीचे सामान आणून गणपतीची आरास करतात.
रात्री बाया गौरीची लोकगीते म्हणत फुगडी घालतात. चतुर्थीचा दिवस म्हणजे कुंभमेळ्यातील एखाद्या पवित्र नदीत स्नान करणे, प्रत्येक माणूस सकाळी साफसफाई करून आंघोळीने सोवळा होतो, गणपती आराधनेच्या कॅसेटवरील गाणी वाजवतो. नंतर धूप, कापूर, उदबत्ती पेटवून सुगंध पसरवतो आणि गणपतीची मूर्ती आणण्यासाठी नारळ, तांदळाची ओटी घेऊन चित्रशाळेतून श्रीगणेशराजाला घरी आणतो. सौभाग्यवती दारात त्याची ओवाळणीने दृष्ट काढते आणि श्रींस आसनस्थ करतात आणि सर्वजण एकत्र होऊन आनंद व्यक्त करतात. श्रींच्या शास्त्रोक्त पूजनासाठी भटजीची वाट पाहतात. आपले पुरोहित बिचारे एकाच्या घराकडून दुसऱ्याच्या घराकडे धावत असतात, मात्र ज्यावेळी पूजनासाठी भटजी घरी येतात. त्यावेळी त्यांना देवपण देतात.
दुपारी गणपती पूजनानंतर घुमट समेळाच्या आरती करून घरातील सर्वांना पंचपक्वान्नाचे जेवण वाढतात. आणि विभक्त असणारी सारी मंडळी पाटावर बसून मांडीला मांडी लावून भोजन करतात. त्यावेळी आमच्या पूर्वजांची एकत्र कुटुंबपद्धती आठवते. आपले एक बोट कापले तरी बाकी बोटांना दुखते याचा प्रत्यय इथे दिसून येतो.
चतुर्थीच्या संध्याकाळी पुरुष भजनाचा कार्यक्रम, गृहिणी फुगड्यांचा कार्यक्रम करतात,. सासु-सूना नऊवारी लुगडी नेसून, दागदागिने परिधान करून, केसात फुलांची वेणी माळून लक्ष्मीच्या वेषात वावरतात. पुरुषमंडळी शेजारी-पाजाऱ्यांची चौकशी करण्यास जातात. काही मंडळी मजा म्हणून वर्षातून एकदा गुलाम, राणी, राजाचा खेळ खेळतात. काही गावांत पुरुष मंडळी कळशी फुगडी घालतात. मात्र रात्र होण्याच्या अगोदर सर्वजण आपआपल्या घरी येतात, कारण चतुर्थीचा चंद्रोदय पाहायचा नसतो, ही भाबडी समजूत अजूनपर्यंत गावात टिकून आहे. चंद्र मावळल्यानंतर सर्वजण प्रत्येकाच्या घरी घुमट- समेळवाद्ये वाजवून आरती करतात.
पंचमीचा दिवस हा गणेशाचे वाहन म्हणजे उंदराचा दिवस मानतात. त्या दिवशी घरातील माणसे शेतात अगर बागायतीत त्याला नैवेद्य वाहतात आणि नवे म्हणून शेतातील भाताची कणसे आणून त्या धान्याची पूजा करतात. दुपारी आरती करून नैवेद्य दाखवून जेवण करतात, संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम उरकतात आणि संध्याकाळ होत आली म्हणजे रानात सोडलेली गुरे वासरे घराकडे येतात. त्या वेळेसच गणपती विसर्जन पूजेस भटजी घरी येतो आणि घरात शांतता पसरते. कारण चतुर्थीला आलेले आपले गणपती देवबाप्पा आपल्या घरी जाण्याचा सर्वांना इशारा देतात.
संध्याकाळच्या विसर्जन आरती ह्या भैरवी राग गायल्याप्रमाणे नैसर्गिकपणे होतात. नंतर घरातील मंडळीचे सामूहिक गाऱ्हाणे होते, काहीजण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भटजीद्वारे सांगणे घालतात. दीड दिवसाचा गणपती विसर्जन केला तरी गावातील काही मंडळी, पाच, सात, नऊ, अकरा ते एकवीस दिवस बाप्पाची पूजनाने आराधना करतात, गणपती विसर्जनास नेतात. आजारी माणूस, नवस मागणारी गृहिणी आपला आजार अगर इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती परत जाणाऱ्या वाटेवर झोपतात. गणपती विसर्जनास जाताना कैकप्रकारचे फटाके फोडून त्यांना सलामी देतात. ओहोळात, नदीत अगर समुद्रात विसर्जन करून पुढच्या वर्षी येण्याची वाट बघतात. असा आपण एकोपा ठेवला, तर समाज बदलून लोकशाही परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
मधू य. ना. गावकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.