कासावलीचे रेमेंत सायबिणीचे फेस्त

गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवणारे कासावलीच्या रेमेंत सायबिणीचे फेस्त समाजशास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे.
Feast
FeastDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातले लोक इथला सदाप्रसन्न निसर्ग आणि पर्यावरणामुळे उपजतच उत्सवप्रेमी. वर्षाचे बारा महिने गोव्यात कालगणनेनुसार विविध उत्सवांचे सत्र सातत्याने चालू असते. त्याला धर्म- जातीजमातीची बंधने रोखू शकलेली नाहीत. दक्षिण गोव्यात ख्रिस्ती समाजाचे प्राबल्य असलेली गावे सालसेत, मुरगाव सारख्या तालुक्यात असून, त्यांच्यात गोव्यातल्या जत्रेला पर्याय म्हणून फेस्त (Feast) निर्माण झालेले आहे. ख्रिस्ती धर्मियांत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या फेस्तांत गोव्यातल्या पारंपारिक जत्रोत्सवातल्या कित्येक परंपरांचे अनुकरण आजसुद्धा अनुभवायला मिळते.

Feast
पद्मपुरस्कार प्रेरणादायी ठरोत!

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात सालसेत-मुरगावात ख्रिस्तीकरणाचा वरवंटा लोकमानसावर फिरवला गेला. परंतु त्यामुळे धर्मांतर यशस्वी झाले तरी नवख्रिस्त्यांचे मूळ मातीशी आणि संस्कृतीशी असलेले ऋणानुबंध नष्ट करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जुन्या काबिजादीतल्या तिसवाडी, सालसेत आणि बार्देसातल्या कित्येक फेस्तांत जत्रोत्सवाच्या उत्साहाचे प्रदर्शन अनुभवायला मिळते. वार्षिक जत्रोत्सवात काला, नाटक भजन यांचे सादरीकरण सर फेस्तात तियात्र, कातारां, प्रार्थना यांचे सादरीकरण केले जाते.

मुरगाव तालुक्यातल्या कासावलीत 6 जानेवारी रोजी दरवर्षी जे रेमेंत सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते त्याचे काही अंशी साम्य नार्वेच्या अष्टमीच्या जत्रेशी आढळते. डिचोली तालुक्यातला मांडवीच्या उजव्या किनारी असलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदोळे म्हणजे आजच्या नार्वे गावाच्या एका टोकाला जी गोकुळाष्टमीच्या दिवशी जत्रा भरते ती विशिष्ट काळापुरती मर्यादित असून, सूर्यास्त होण्यापूर्वी भाविकच नव्हेतर जत्रेसाठी येणारे दुकानदार आपला गाशा गुंडाळून जाणे पसंत करतात. रात्रीच्या अंधारात इथे भूतांची जत्रा साजरी होते, असा समज लोकमानसात रूढ आहे.

Feast
पर्येत राण्यांचे बंड की गृहकलह?

गोकुळाष्टमीला या ठिकाणी श्रीकृष्णाचे पूजन होत नसून, स्मशानासाठी निगडित शिवशंभोची प्रतिकात्मकरित्या पूजा केली जाते. पंचगंगेच्या पवित्र संगमावर आपल्या मृतात्म्यांच्या स्मरणार्थ विधी पहाटेपासून सायंकाळपर्यंत चालतात आणि सूर्यास्त होण्यापूर्वी भाविक इथून काढता पाय घेतात. रात्री अंधारात इथे मृतात्मे मस्णादेवीच्या सान्निध्यात आपली जत्रा साजरी करतात, असे या परिसरातले लोक पूर्वापार मानत आलेले आहेत. रेमेत सायबिणीचे फेस्त दरवर्षी विशिष्ट काळापुरते साजरे होते आणि त्यानंतर डोंगर टेकडीवरचा आपला सारा व्यवहार गुंडाळून भाविक इथून काढता पाय घेतात, कारण रात्रीच्या वेळी इथे भूतांची जत्रा भरते, असा समज या परिसरातल्या लोकांत रूढ आहे.

मुरगाव तालुक्यातला कासावली गाव सागरकिनाऱ्यावर बसलेला असून, नार्वेसारखे टेकडीवर जसे मसणदेवीचे मंदिर आहे तशीच वेळसाव, पाळी, कुवेली, आरशी या चार गावांच्या सीमेवर रेमेंती टेकडीवर रेमेत सायबिणीचे प्रार्थना मंदिर आहे. या टेकडीवरून एका बाजूला अरबी सागर आणि दुसन्या बाजूला चारही गावांतील माडांच्या हिरव्यागार बागा आणि भातशेती तसेच वृक्षवेलींनी नटलेल्या प्रदेशाचे दर्शन घडते. धर्मसमीक्षण संस्थेद्वारे कासावलीतील धर्मांतराची प्रक्रिया कार्यान्वित होण्याअगोदर इथे नागनाथ सातेरी आणि पुरुष यांची मंदिरे असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दफ्तरात आढळतात.

Feast
आचारसंहिता आणि वारंवार होणारे उल्लंघन

1882 सालातल्या दस्तऐवजात सालसेत तालुक्यात ज्या 53 ग्रामसंस्था अस्तित्वात होत्या त्यात कासावली गावाचा समावेश होता. कासावलीतील मंदिरांचा विध्वंस केल्यावर त्या जागी भव्य अशी ख्रिस्ती प्रार्थना मंदिरे उभारण्यात आली. कासावलीच्या या डोंगरावर सातेरी मातेचे मंदिर होते आणि त्या मंदिरातील देवीवर इथल्या क्षात्रकुळातील लोकांची अपरिमित श्रद्धा होती. नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती होती. या मंदिराची तोडफोड करून त्या जागेवर ख्रिस्ती प्रार्थनामंदिर उभारले, असे लोक मानतात आणि त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यापूर्वी संपन्न होणाऱ्या जत्रेची संवेदना कायम असल्याने 6 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या फेस्तात ख्रिस्ती भाविकांबरोबर टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांतील हिंदू लोक पूर्वाश्रमीच्या धर्मश्रध्देने रेमेत सायबिणीच्या फेस्तात सहभागी होतात.

1599 साली या टेकडीवर अवर लेडी ऑफ सांता रेमेदिअशची स्थापना करण्यात आली. पूर्वी आम्रवृक्षांच्या छायेत असलेले हे छोटेखानी कपेल फेस्तावेळी भाविकांनी ओसंडून जायचे. अवर लेडी ऑफ सांता रेमेदिअशमुळे इथली टेकडी रेमेंती डोंगर म्हणून नावारूपाला आली. मराठी - कोकणीतले ख्यातनाम लेखक आणि संपादक चंद्रकांत केणी यांनी आपल्या एका लेखात या आगळ्या वेगळ्या फेस्तासंदर्भात लिहिलेले आहे. त्यात ते लिहितात, ''6 जानेवारीच्या मुख्य दिवशी हिंदू मेणबत्ती लावतात व पूजन करतात.

Feast
Goa BJP: बदलत्या भाजपची ही भुमिका कितपत योग्य?

कांसारपाली (कासावली) आरशी, कुवेली व पाळी गावातले लोकसमूह त्यात सहभागी होतात. शरीराचे आगीमुळे भाजलेले अवयव रेमेत सायबिणीला नवस केल्यावर बरे होताच मेणापासून बनविलेल्या त्यांच्या प्रतिकृती देवीला अर्पण करतात. 5 जानेवारीला हिंदूची जत्रा तर दुसऱ्या दिवशी ख्रिश्चनांचे फेस्त झाल्यावर सूर्यास्त होण्यापूर्वी डोंगर माथ्यावरील सारा व्यवहार गुंडाळला जातो. रात्रीच्या वेळी तेथे भुतांची जत्रा भरते, असा येथील लोकांचा समज आहे. आज रेमेत सायबिणीचे हे फेस्त थ्री किंग्सचे फेस्त म्हणूनही ओळखले जाते. थ्री किंग्स हे देवाचे दूत मानलेले असून, त्यांना घोड्यावर आरूढ करून वाजत गाजत रेमेत टेकडीवर आणले जाते. डोक्यावर विशिष्ट मुकुट, अंगावर भरजरी पोषाख अशा साजात तिन्ही देवदूतांचा मानसन्मान केला जातो.

त्यांच्या डोक्यावर घातल्या जाणाऱ्या मुकुटाचा स्पर्श आपल्या डोक्याला व्हावा, त्यांचे आशीर्वचन आपणाला मिळावे म्हणून भाविकांची विशेष धडपड असते. फेस्तातल्या या तीन देवदूतांचा सन्मान कासावली, कुवेली आणि आरोशी या गावातील गावकर कुळानाच आहे. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मुर्डी गावात फेस्ताच्या दिवशी प्रत्येक ख्रिश्चनाबरोबर हिंदूच्या घरीही गोडधोड पदार्थ करण्याची परंपरा होती. मूर्डी गावाची सीमा जिथून सुरू होते तेथून डोंगरावरचा हा रस्ता वळणावळणाने कपेलापर्यंत जातो. आज इथे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. परंतु पूर्वीच्या काळी रेमेत टेकडीवर जाण्यासाठी चिरेबंदी पायऱ्यांच्या बांधकामाने युक्त मुख्य तीन बाजूंना मार्ग होते.

तेथील एका मुख्य पारंपरिक मार्गाचा स्वीकार करून वाद्य संगीताच्या निनादात तिन्ही देवदूताची निरोपाची मिरवणूक पहाण्यासाठी हिंदू- ख्रिश्चन भाविक गर्दी करतात. नवसफेड करण्यासाठी भाविक मेणाचे अवयव, शेवंतीच्या फुलांच्या माळा घेऊन येतात. कपेलात असलेल्या सायबिणीच्या मुख्य मूर्तीसमोर बाल जेजूची प्रतिमा असून, भाविक त्यांचे दर्शन घेतात. रेमेंत सायबिणीच्या उत्सवमूर्तीला बुत्यंवाच्या जांभळ्या फुलांचा गजरा अर्पण केला जातो. या फेस्तांत वायंगण शेतकामासाठी आवश्यक असणारी अवजारे, बांबूच्या टोपल्या आणि अन्य साहित्याबरोबर कणग्या, रताळी, आमसुले, कोकमाची सोले आदी वस्तू तसेच चणे फुटाणे, मिठाईची दुकाने असतात. गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक पेलूंचे दर्शन घडवणारे हे फेस्त समाजशास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे.

राजेंद्र पां. केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com