Environment: टाकाऊ मालापासून पर्यावरणस्नेही रस्ते

टाकाऊ पदार्थ वेगवेगळ्या रस्ता बांधकामात कसा वापरावेत याचे मानक बनवून यशस्वीरीत्या हे टाकाऊ पदार्थ सध्या रस्ता बांधकामात परिणामपूर्वक वापरले जात आहेत.
Goa News|Road
Goa News|Road Dainik Gomantak

प्रसाद पाणंदीकर

जैवअपघटनीय (बायोनॉनडीग्रेडेबल) नसलेल्या पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पर्यावरणाचे अतोनात नुकसान व्हायला लागले. या कारणास्तव जगभर याची तीव्रता कमी करण्यास चांगले उपयोगी संशोधन व्हायला लागले व ते टाकाऊ पदार्थ वेगवेगळ्या रस्ता बांधकामात कसा वापरावेत याचे मानक बनवून यशस्वीरीत्या हे टाकाऊ पदार्थ सध्या रस्ता बांधकामात परिणामपूर्वक वापरले जात आहेत.

संपूर्ण जगात व आपल्या देशात दररोज हजारो नवे रस्ते बांधले, दुरुस्त केले जातात किंवा त्यांचे नूतनीकरण केले जाते. आपल्या देशापुरता विचार केला तर दिवसाला सरासरी 20 ते 40 किमी नवे राष्ट्रीय महामार्ग बांधून तयार होतात.

‘राष्ट्रीय महामार्ग विकास योजना’, ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’सारख्या कित्येक केंद्रीय देशव्यापी योजना आहेत ज्यांच्या अंतर्गत अनेक प्रकारचे रस्ते सतत बांधले जातात. याचप्रमाणे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या स्थानीय योजनांखाली तसेच सरकारी कार्यक्रम व उपक्रमांखाली रस्ते बांधणी, दुरुस्ती व नूतनीकरण सतत चालू असते.

अनायासे अशा रस्ता बांधणीस प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक कच्चा माल लागतो. माती, पाषाणी दगड, खडी, डांबर, सिमेंट, रेती, लोखंड, पाणी इत्यादी. अशा नैसर्गिक सामग्रीचे सतत मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते.

पण सर्वांगीण विकास साधण्यासाठी व वाढणाऱ्या लोकसंख्येनुरूप पायाभूत क्षेत्रांत सोयीसुविधा करण्यासाठी रस्त्यांचे नवनिर्माण, दुरुस्ती व नूतनीकरण पूर्णपणे अपरिहार्य ठरते, जे टाळले जाऊ शकत नाही.

म्हणून असा क्रियाकलाप हातात घेताना पर्यावरणाचे न्यूनतम नुकसान कसे होईल व त्यासाठी दुसरा पर्यायी कच्चा माल वापरून रस्ते प्रकल्प पर्यावरणस्नेही व टिकाऊ कसे केले जाऊ शकतात याचा आढावा घेऊ.

Goa News|Road
जेसुइट्स आशियातील सर्वांत मोठी पांथिक व्यवस्था

प्लास्टिक कचरा

सध्या प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांची चलती असल्याने, प्लास्टिक कचरा प्रचंड प्रमाणात तयार होतो. त्यामुळे तो साठवण्याची व विल्हेवाट लावण्याची समस्या एकदम गंभीर व भेडसावणारी अशी होऊन जाते. जमीन, समुद्र, नद्या,नाले इथे सगळीकडे प्लास्टिक प्रदूषण व्हायला लागते.

एका संशोधनाप्रमाणे साळावली जलाशयातसुद्धा सूक्ष्म प्लास्टिक सापडले आहे. पश्चिम घाटाच्या संपूर्ण नैसर्गिक स्रोतांवर व पावसावर अवलंबून असलेल्या या जलाशयात प्लास्टिक कुठून आले, हा एक वेगळा गहन संशोधनाचा विषय आहे.

प्लास्टिक कचऱ्यावर संशोधन करण्यात आले व त्याचे डांबरांत मिश्रण केल्यास रस्त्याचे तांत्रिकी गुणधर्म पुष्कळ सुधारले जातात व रस्त्यांची कामगिरी व आयुष्यमान अत्यंत वाढीस लागते असे लक्षात आले. त्या कारणामुळे भारतीय रस्ता काँग्रेस (आयआरसी) या निमसरकारी संस्थेने पुढाकार घेऊन ‘आयआरसी-एसपी-98’ हा खास मानक बनवला.

Goa News|Road
गोव्यातील अपघातांचे वाढते प्रमाण; चिंता आणि चिंतन

जो काही प्लास्टिक कचरा असतो तो यंत्रात (श्रेडिंग मशीन) घालून त्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर जो डांबरखडी मिश्रण कारखाना (हॉटमिक्स प्लांट) असतो त्याच्यात चालू यंत्रावर 6 ते 8% प्रमाणात ते टाकले जातात.

अद्ययावत कारखान्यात हे टाकायला खास व्यवस्था असते. प्लास्टिक कचरा वापरल्याने दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे अशा कचऱ्याची विल्हेवाट लागून जाते, दुसरे डांबरी मिश्रणाचे गुणधर्म सुधारतात व रस्त्यांचे आयुष्मान वाढून ते टिकाऊ होऊन जातात.

बांधकाम कचरा

हा कचरा (कन्स्ट्रक्शन डेब्री) इमारती बांधताना तसेच मोडताना तयार होतो. त्याची विल्हेवाट सहजासहजी लावली जाऊ शकत नाही. त्यामुळे गोव्यात हा कचरा हमखास रस्त्याच्या कडेला टाकून दिलेला आढळून येतो.

अशा या विल्हेवाटीची उच्च न्यायालयाने दखल घेऊन सरकारला असला कचरा टाकण्याच्या जागा ठरवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे अनेक अशा जागा सरकारने कायम केलेल्या आहेत.

Goa News|Road
Blog : स्त्रीला किमान माणूस तरी समजा

हा कचरा सुरुवातीला वेड्यावाकड्या व लहानमोठ्या आकाराचा आणि वेगवेगळ्या सामग्रीचा असतो. त्यामध्ये कसलेही बांधकाम साहित्य असू शकते. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते व एकदम बारीक तुकडे बनवले जातात.

रस्त्यांच्या माती भरावात तो शंभर टक्के वापरला जाऊ शकतो. पाहिजे असेल तर मोडलेल्या जुन्या काँक्रीट किंवा रस्त्यातून पाषाणी खडी वेगळी काढून इमारत किंवा रस्ता बांधकामात तिचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. याला ‘आयआरसी-121’ हा खास मानक उपलब्ध आहे.

स्लॅग ( लोखंडाची भुकटी)

हा लोखंड उत्पादन करताना तयार झालेला माल. लोखंड उत्पादकाला तो टाकाऊ असतो. पण हा स्लॅग सिमेंटमध्ये 70% मिश्रित करून काँक्रीटमध्ये वापरण्याचे एक आविष्कारी संशोधन झाले व एक क्रांतीच घडून आली.

पण स्लॅगचे उत्पादन इतके जास्त असते की सिमेंटमध्ये वापरूनसुद्धा तो इतका राहून जातो की त्याची विल्हेवाट लावली जाऊ शकत नाही. त्याला तसे चांगल्यापैकी भौतिक तसेच रासायनिक गुणधर्म असल्याने तो रस्त्याच्या भरावात मातीऐवजी वापरला जाऊ शकतो. तसाच तो प्रत्यक्ष रस्त्याच्या बांधकामात व डांबरीकरणात वापरला जाऊ शकतो.

याचा गोव्यात जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा स्थानिक लोकांनी त्याचा निर्बुद्धपणे विरोध केला होता व सरकारवर खटले ठोकले होते. त्यात रासायनिक हानी व प्रदूषण करण्यासारखे गुणधर्म असत नाहीत. याला ‘आयआरसी-एसपी-121’ हा खास मानक उपलब्ध आहे.

कोळशाची राख (फ्लाय अ‍ॅश)

ही कोळशाची राख म्हणजे औष्णिक विद्युत कारखान्यात कोळसा जळाल्यानंतर उरलेली राख. तिचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर होते. ती साठवणे पुष्कळ कठीण असते कारण हलकी असल्याने वाऱ्याने उडून सगळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित करू शकते.

स्लॅगप्रमाणे फ्लाय अ‍ॅशही सिमेंटात 35% मिश्रित केली जाऊ शकते. पण हिचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने, पर्यायी उपयोग कुठे केला जाऊ शकतो याच्यावर संशोधन सतत चालू असते. स्लॅगप्रमाणे रस्त्याच्या भरावांत किंवा धरणे-बंधारे यात वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे.

याला चिकटपणा (कोहेजन) नसल्यामुळे ती भरावाच्या आतच वापरली जाते. दोन्ही बाजूला व वरून तिला मातीचे आवरण देण्यात येते. याला ‘आयआरसी-एसपी-058’ हा खास मानक उपलब्ध आहे

काचेची भुकटी

जगात प्रचंड प्रमाणावर काचेचे उत्पादन होते. काच एकदम कडक असते व लवचिकता असत नाही. म्हणून काच फुटली की तिचा कचरा होतो. ज्याची विल्हेवाट लावली जाऊ शकत नाही. डांबरात मिश्रित करणे हा एकमेव पर्याय राहून जातो, ज्यामुळे रस्त्याचे गुणधर्म सुधारित होत असल्याचे वृत्त आहे. डांबरात काचेची भुकटी न्यूनतम 15% वापरली जाऊ शकते. याला अजून भारतीय मानक उपलब्ध नाही.

Goa News|Road
Language: मातृभाषा : संस्कृती, संवाद अन् संघर्ष

रबराचा चुरा

जगात लाखो, कोट्यवधी वाहने रस्त्यांवर सतत धावत असतात. त्यांचे झिजलेले टायर सतत बदलावे लागतात. त्यामुळे जुने टायर साठवणे. व त्यांची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यांना जागा पुष्कळ लागते.

म्हणून असल्या जुन्या झिजलेल्या टायरचे त्याचे बारीक तुकडे व चुरा करून डांबराच्या थरात वापरले जातात. त्यामुळे रस्त्याच्या गुणधर्मात सुधारणा होऊन रस्त्यांचे आयुष्य वाढते. याला ‘आयआरसी-एसपी-107’ हा खास मानक उपलब्ध आहे.

याशिवाय प्रक्रिया केलेला कचरा हा एक पर्याय आहे, जो बिनमहत्त्वाच्या रस्त्यांवर किंवा मोठ्या जागांवर भरावासाठी वापरला जाऊ शकतो.

जगाचे जेव्हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले, त्यावेळेस मूलभूत असे लोखंड उत्पादन चालू झाले. सगळीकडे वीज पुरवायला कोळशावर चालणारी औष्णिक विद्युत कारखाने तयार झाले. वाहनांच्या संख्येत बेसुमार वृद्धी झाली.

मोठ्या प्रमाणावर बांधकामे व्हायला लागली. या सगळ्यांची फलश्रुती म्हणजे मोठ्या प्रमाणावर जैवअपघटनीय (बायोनॉनडीग्रेडेबल) नसलेले पदार्थ तयार होण्यात झाली. ते पदार्थ साठवायच्या समस्या तयार झाल्याने, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पर्यावरणाचे अतोनात नुकसान व्हायला लागले.

या कारणास्तव जगभर याची तीव्रता कमी करण्यास चांगले उपयोगी संशोधन व्हायला लागले व ते टाकाऊ पदार्थ वेगवेगळ्या रस्ता बांधकामात कसा वापरावेत याचे मानक बनवून यशस्वीरीत्या हे टाकाऊ पदार्थ सध्या रस्ता बांधकामात परिणामपूर्वक वापरले जात आहेत.

त्यामुळे एका बाजूला प्रदूषण कमी झालेले आहे व पर्यावरण सुधारत आहे, तर दुसऱ्या बाजूला एकदम भक्कम व टिकाऊ असे रस्ते उभे राहून त्याचा दुहेरी फायदा होत आहे. पर्यावरणाच्या दिशेने रस्ता बांधकाम क्षेत्रात हा एक घडून आलेला चांगले योगायोग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com