गोव्यातील अपघातांचे वाढते प्रमाण; चिंता आणि चिंतन

एकंदर अपघातांचा मागोवा घेतला, तर रस्ते हे एक कारण असले तरी ते दुय्यम आहे असेच जाणवते. कारण गोव्यात हल्लीच्या काळात रुंद व चारपदरी रस्त्यांवर अधिक भीषण अपघात झाल्याचे व त्यात मोठी जीवितहानी झाल्याचे आढळून येते
Goa Accident Deaths
Goa Accident DeathsDainik Gomantak

प्रमोद प्रभुगावकर

गेल्या आठवड्यात गोव्यात सलग झालेले अपघात व त्यात गेलेले मानवी बळी पाहून एका माजी नायब राज्यपालाने गोव्याला दिलेल्या ‘किलर स्टेट’ या उपाधीची आठवण कोणालाही झाल्याशिवाय राहणार नाही.

चिमुकल्या गोव्यात नववर्षात म्हणजे गेल्या जानेवारीपासून रस्ता अपघातांचे् प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले व त्यात अपरिमित बळी गेले हे खरेच, पण त्याबद्दल चिंता वा दुखवटा व्यक्त करण्यापलीकडे विशेष काही झालेले नाही असेच खेदाने म्हणावे लागते. खरे तर अपघात हा अपघात असतो, तो कोणी जाणूनबुजून करत नाही.

असे असले तरी अपघाताचे परिणाम अनेकांना अनेक पद्धतीने भोगावे लागतात. काही कुटुंबांना तर ते आयुष्यभरासाठी भोगावे लागतात व म्हणून अपघात टाळण्यासाठी पावले उचलण्याची, उपाय योजण्याची नितांत गरज आहे. पण ती तत्परता संबंधित यंत्रणांमध्ये दिसत नाही. (Goa Accidents Deaths)

Goa Accident Deaths
जेसुइट्स आशियातील सर्वांत मोठी पांथिक व्यवस्था

अपघात का होतात हा वेगळा मुद्दा आहे, काही जण त्याचा सारा ठपका अरुंद व वळणावळणाचे रस्ते, त्यांच्यावरील खड्डे यांच्यावर ढकलताना दिसतात. पण एकंदर अपघातांचा मागोवा घेतला, तर रस्ते हे एक कारण असले तरी ते दुय्यम आहे असेच जाणवते.

कारण गोव्यात हल्लीच्या काळात रुंद व चारपदरी रस्त्यांवर अधिक भीषण अपघात झाल्याचे व त्यात मोठी जीवितहानी झाल्याचे आढळून येते व म्हणून मानवी बेदरकारपणा, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष यातून अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येईल.

वास्तविक दरवर्षी गोव्यात रस्तासुरक्षा तसेच वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो त्यानिमित्त शाळांत तसेच अन्यत्रही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात पण तरीही आवश्यक ती जागृती दिसून येत नाही. खरे तर रस्ता वाहतुकीशी पोलीस, वाहतूक खाते तसेच सार्वजनिक बांधकाम या खात्यांचा संबंध येतो पण त्यांचा साराच कारभार स्वतंत्रपणे चालू असतो त्यांच्यामधील नसलेल्या समन्वयाचाच तर हा परिपाक नव्हे ना, असा संशय त्यामुळे अनेकदा येतो.

गेल्या आठवड्यात अस्नोडा व नंतर कुंडई येथे झालेले अपघात पाहिले तर वाहनचालकांना संबंधित यंत्रणेची काहीच फिकीर नसल्याचे दिसून येते. विशेषतः कुंडईत दुकानात घुसलेला मालट्रक संबंधित यंत्रणांना बरेच काही शिकविणारा आहे. हा ट्रक मासळी घेऊन कर्नाटकातून आला होता व महाराष्ट्रात जात होता.

त्याला ठरावीक वेळेत पोहोचणे आवश्यक होते अन्यथा मासळी कुजण्याचा धोका होता व म्हणून तो भरधाव जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६(कारवार- मडगाव)वर नेहमीच भरधाव जाणारी मालवाहने आढळतात. तो वेग येथील रस्त्यांच्या आकाराशी सुसंगत नसतो व त्यातून अपघात होतात.

केवळ मासळीवाहू ट्रकच नव्हे तर कुमठा- होनावरमधून केळी व अन्य फळे,फुले घेऊन येणारी वाहनेही अशी भरधाव पिटाळली जातात व अपघातग्रस्त झालेली आढळतात. त्यात संबंधित चालक तर जायबंदी होतातच पण रस्त्यातील निरपराध्यांंनाही त्याचा फटका बसतो.

मग हे अपघात टाळण्यासाठी पावले उचलायची की, अरुंद व वळणांनी भरलेल्या रस्त्यांकडे बोट दाखवून स्वस्थ बसायचे असा प्रश्न पडतो. सध्या गोव्यातील संबंधित यंत्रणांचे तेच चाललेले आहे. सीमा नाक्यावर या यंत्रणांचे नाके आहेत, तेथे तपासणी करून व शुल्क घेऊन वाहने आत सोडली जातात. पण ते करताना अजस्र ट्रॉल्या, टँकर वगैरे येथील रस्त्यांवरून व्यवस्थित जाऊ शकतील का हेदेखील पाहिले जात नाही, नंतर अशी वाहने अडकून पडली की धावपळ सुरू होते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरटीओवाले तर कुठेच दिसत नाहीत. कधीमधी उगवतात ते इंटरसेप्टर घेऊन .त्यामुळे दंडातून सरकारी तिजोरीत रक्कम जमा होते खरी पण एकंदर वाहतूक व्यवस्थेत शिस्त येते का याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

आता खरे तर प्रत्येक तालुक्यात आरटीओ कार्यालये उघडली गेली आहेत, पण वाहतूक व्यवस्था सुधारली आहे का, त्यात शिस्त आली आहे का असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर नकारार्थीच येईल. तसे नसते तर सरसकट सर्वच शहरांत वाहनांच्या रांगा लागल्या नसत्या.

त्याचबरोबर हेही खरे की सर्वसाधारणपणे प्रत्येक नागरिकावरही काही जबाबदाऱ्या वाहतुकीसंदर्भात असतात पण त्याचे पालन करण्याची कोणाचीच तयारी नसते व त्यामुळेच वाटेल तेथे वाटेल तसे वाहन उभे करणे, वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे, ‘तालांव’ मिळाल्यानंतर सरकारला शिव्या घालणे हे प्रकारही दिसून येतात.

आता ‘रस्ता-शिस्त’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला जात असून त्यातून काही तरी आशादायी चित्र भविष्यात साकारेल अशी आशा करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com