ज्ञानगंगा यावी घरोघरी

एक अतिशय कौतुक वाटण्यासारखी गोष्ट मुलांनी तयार केली ती जंगलातून आईवडिलांना कावाडीतून तीर्थयात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाच्या गोष्टीला केंद्रबिंदू करून तयार केलेली गेम.
Digital
DigitalDainik Gomantak

संगीता नाईक

गो ष्ट आहे अगदी गेल्या आठवड्यातील, उत्तर प्रदेशमधल्या बस्ती जिल्ह्यातली. १३ वर्षाची निकिता आपल्या बहिणीच्या घरी तिच्या दीड- दोन वर्षाच्या मुलीशी खेळत होती.

तेवढ्यात, कुणीतरी गेट खुली ठेवल्याने, त्यांच्या खोलीच्या बाजूच्या किचनमध्ये माकडांची टोळीच घुसली. माकडं घरातलं सामान इकडे तिकडे फेकू लागली. ते बघून छोटी मोठ्यानं रडू लागली आणि माकडं अधिकच चेकाळली.

मुलांच्या अंगावर यायला लागली. निकिता घाबरली, तिनं घरच्यांना आवाज द्यायला सुरवात केली पण जवळपास कोणीच नव्हतं. एवढ्यात तिची नजर टेबलवर ठेवलेल्या अलेक्सा उपकरणाकडे गेली.

नजर टेबलवर ठेवलेल्या अलेक्सा उपकरणाकडे गेली. आणि तिचे डोळे चकाकले! "अलेक्सा, कुत्र्यांचा आवाज काढ." तिनं सूचना दिल्याबरोबर दोन तीन कुत्रे बरोबर भुंकतायत असा आवाज अलेक्सामधून येऊ लागला.

तो ऐकून माकडं पाठीला पाय लावून पळून गेली. प्रसारमाध्यमांत ह्या घटनेची बातमी बघून महिंन्द्रा आणि महिंन्द्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी निकिताच्या पटकन निर्णय घेऊन, तंत्रज्ञानाचा वापर करून समस्येवर तोडगा काढण्याच्या क्षमतेचं सोशल मीडियावर कौतुक केलं.

एवढंच नव्हे तर मोठी झाल्यावर तिची इच्छा असल्यास आपली कंपनी तिला नोकरी करण्यासाठी गळ घालणार असल्याचं जाहीरपण करून टाकलं! तिचं कौतुक करताना महिंद्रानी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर छान भाष्य केलं, “आपण तंत्रज्ञानाचे गुलाम बनणार की स्वामी बनणार हा आपल्या काळातील प्रमुख प्रश्न आहे.

या मुलीच्या कथेतून हा दिलासा मिळतो की तंत्रज्ञान नेहमीच मानवी कल्पकतेला सक्षम बनवण्याचं काम करेलच." लेखाच्या मूळ मुद्याला पुढं नेण्याआधी अलेक्साविषयी थोडंसं. तुमच्यातील बहुतेक जणांनी ह्या उपकरणाचा वापर केला असेल किंवा होताना बघितला तरी असेल.

एआय सॉफ्टवेअर च्या माध्यमातून माणसाने आवाजाद्वारे दिल्या गेलेल्या सूचना ऐकून त्या बरहुकूम माहिती इंटरनेटवरून शोधून काढली जाते.

Digital
Goa Today's News Wrap: लोकसभा निवडणूक, गुन्हे, पर्यटन विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

नि मग स्पीच सिंथेसायझरद्वारे ह्या माहितीचं माणसाला कळेल अशा भाषेत आणि आवाजात रूपांतर करून स्पीकरवरती तुम्हाला ऐकवलं जातं. आदेश दिल्याबरोबर माहिती सांगणं, गाणी वाजवणं, हिशोब करणं, पुस्तक वाचून दाखवणं, अशा हजारो गोष्टी मालकांसाठी करणारी आभासी स्वीय सहाय्यकच जणू.

तर मुद्दा असा आहे की, आजची ही पिढी ''डिजिटल नेटिव्ह'' आहे. तंत्रज्ञानाचं बाळकडू त्यांना अगदी पाळण्यात असल्यापासून मिळालंय. त्यामुळे, संगणक वा मोबाईल ह्या यंत्रासंबंधीच्या अनभिद्यतेमुळं वा अज्ञानामुळं आधीच्या पिढीला या यंत्राविषयी वाटणाऱ्या भयाचा मागमूसही ह्या आजच्या पिढीमध्ये नाही.

त्यामुळं ही पिढी तंत्रज्ञानयुक्त उपकरणांचा उपयोग अतिशय सहजतेनं, समर्पकपणे आणि मेंटल ब्लॉक नसल्यानं कल्पकतेनंही करू शकते. इथं एक माझ्या अनुभवातलं एक उदाहरण मला मुद्दाम नमूद करायचंय.

मी गोवा आयटी प्रोफेशनल या संस्थेची सदस्य आहे. तर आम्ही काही वर्षांपूर्वी गोव्यातील काही खेडेगावातील शाळांतील मुलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठीचा एक प्रकल्प हाती घेतला होता. निसर्गरम्य पण अतिदुर्गम डोंगराळ भागातील मुलं जिथं शिकायला यायची ती गोकुळडे, केपे येथील शाळा त्या प्रकल्पाशी संलग्न होती.

गोव्याभर असलेल्या इतर शाळांप्रमाणेच इथंही कंम्प्युटर लॅबची परिस्थिती तशी बिकटच होती. यंत्र हाताळायला दिल्याशिवाय तंत्रज्ञानाची ओळख करणे ही तर अशक्य कोटीतील गोष्ट. मग शाळेच्या सर्व लॅबमधील कीबोर्ड, स्क्रीन, माऊस, केबल्स, प्रोसेसर इत्यादीमध्ये काय काय चालते हे पहिल्यांदा तपासलं गेलं.

तेव्हा लक्षात आलं की, बहुतेक सीपीयूमध्ये बिघाड आहे पण इतर उपकरण वापरता येऊ शकतील. मग रास्पबेरी पाय या त्यावेळी सुमारे तीन-चार हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या प्रोसेसरचा वापर सीपीयूच्या बदलात करून दहा संगणक मुलांच्या वापरासाठी तयार झाले.

पहिल्या टप्प्यात मुलं ह्या मशिनांवर त्यांच्या सिलॅबसमधील वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटसारखी सॉफ्टवेअर वापरू लागली. मग दुसऱ्या टप्प्यात त्यांना स्क्रॅच ह्या दृकश्राव्य माध्यमातून प्रोग्रामिंग करता येणाऱ्या संगणकीय भाषेची ओळख करून दिली.

अगदी पाण्यात ज्या सहजतेनं मासे पोहतात त्या सहजतेनं ही डिजिटल नेटिव्ह मुलं स्क्रॅचचा वापर करू लागली. अमुक करा अमुक करू नका असं न सांगता तुम्हाला भावतात ते विषय आणि प्रॉब्लेम्स घेऊन प्रोग्रॅम्स करा असं आम्ही मुलांना सांगितलं.

त्यातून अतिशय सुंदर गेम्स, रोजच्या वापरात येऊ शकणारी लहान लहान सॉफ्टवेअर इत्यादी तयार झाली. त्यातील एक मुलांच्या अवतीभवती उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतीसंबंधितही होतं.

आणखी एक अतिशय कौतुक वाटण्यासारखी गोष्ट मुलांनी तयार केली ती जंगलातून आईवडिलांना कावाडीतून तीर्थयात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाच्या गोष्टीला केंद्रबिंदू करून तयार केलेली गेम. जंगलातून, नि दऱ्याखोऱ्यातून फिरताना ह्या मुलांना येणारे अनुभव त्या अभिनव गेम मधून प्रतिबिंबित झाले होते.

कुठल्याही पूर्वग्रहाने दूषित नसलेली ही आजची मुलंच हा असा वस्तुस्थिती आणि तंत्रज्ञान यांची seamless सांगड घालण्याचा विचार सहजपणे करू शकतात.

योग्य ते तंत्रज्ञान योग्य त्या स्वरूपात ह्या पुढच्या पिढीच्या हातात सहजपणे येईल ह्याची सोय झाली तर त्याचा योग्य आणि समर्पक वापर ही मुलं अगदी खात्रीशीरपणे करतीलच करतील. आजच्या घडीस पालक, शिक्षक किंवा एकूण समाज म्हणून आमची जबाबदारी आहे ती ही तंत्रज्ञानासमृद्ध ज्ञानगंगा मुलांच्या सहज आवाक्यात आणण्याची.

हे जर आपण योग्य प्रकारे करू शकलो तर मुलांचंच नव्हे तर समाज म्हणून आमचं भविष्यही उज्ज्वल करण्याचा तो एक राजमार्ग ठरेल. नव्या शैक्षणिक धोरणात हे असे बदल अपेक्षित आहेत. पण डोळ्यात तेल घालून पहारा द्यायला हवा तो योग्य अंमलबजावणीवर.

योग्य तंत्रज्ञान, अॅपस्, सॉफ्टवेअर्स, वेबसाईट्स यांच्याशी मुलांची ओळख करण्यासाठी सुट्टीसारखी चांगली संधी नाही. म्हणूनच मी पुढच्या लेखात अशाच काही मुलं आवडीनं वापरतील आणि नवं काहीतरी शिकतील अशा तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टींविषयी लिहिणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com