रमाकांत खलप यांचे चवथीच्या चंद्रासारखे असणेही गोव्याला सुखद वाटते

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री (Deputy CM of Goa) आणि माजी केंद्रीय कायदामंत्री नामदार रमाकांत खलप (Ramakant Khalap) पंचाहत्तर वर्षांचे झाले असे त्यांना ओळखणारी माणसे सहजगत्या म्हणू शकतील, पण रमाकांत खलप वार्धक्याकडे झुकले आहेत, असे मात्र म्हणता येणार नाही.
Ramakant Khalap, Deputy CM of Goa
Ramakant Khalap, Deputy CM of GoaTwitter
Published on
Updated on

काही माणसे चिरतारुण्याचे वरदान घेऊन आलेली असतात. त्यांचा उत्साह अमाप असतो आणि समष्टीसाठी काही तरी करावे अशा तीव्र इच्छा त्यांच्या देहबोलीतून जणू पाझरत असते. उलटणारे वय त्यांच्या कायेवर आपल्या अस्तित्वखुणा उमटवत असते, पण दुर्दम्य उत्साहापुढे मात्र त्याची मात्रा चालत नाही. रमाकांत खलप नामक चैतन्यमूर्तीकडे पाहाताना याचा प्रत्यय येतो. गोव्याच्या समाजजीवनाला विस्मृतीची जुनाट व्याधी व्यापून आहे, चलनात नसलेली माणसे पटकन विस्मृतीच्या वाळवंटात ढकलली जातात. खलप यानी चलनात राहाण्यासाठी फाजील धडपड कधी केली नाही, आपला आब सांभाळूनच ते राहिले. पण त्यांचे हे चवथीच्या चंद्रासारखे असणेही गोव्याला सुखद वाटते.

Ramakant Khalap, Deputy CM of Goa
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

आजही त्यांच्या उपस्थितीने सोहळे आनंदाचे होतात, त्याना गर्भश्रीमंतीचे तेज चढते. गोव्यातल्या राजकीय जीवनात आज जी काही अवघीच संपन्न व्यक्तिमत्वे राहिली आहेत, त्यातले एक रमाकांत खलप. त्यांच्या अमृतमहोत्सवाची पर्वणी म्हणूनच राजकारणविरहित होऊन अनुभवायची.

बारदेसबाहेरील गोव्याला साडेचार दशकापूर्वी खलप परिचित झाले ते राजकारणी म्हणून आणि आजही ते कॉंग्रेसच्या उजाड खोपट्याच्या काही कामट्या धरून त्याला घरपण देण्याचा यत्न करताना दिसतात. हा प्रवास असंख्य वळणांचा आणि खाचखळग्यांचा होता. आज देशाचे राजकारण पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांच्या भोवती फिरण्याची शक्यता निर्माण झालेली असताना प्रादेशिक पक्षामधूनच राजकारणाचा ओनामा गिरवणाऱ्या खलपांचे कॉंग्रेसमधले उपरेपण खटकते. तशा त्यांच्याबाबतीत खटकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातली बांडगुळे कॉंग्रेसवासी होऊन लाल दिव्यामुळे येणारी सुखे उपभोगत असताना त्यानाच कशी बस चुकली? महाराष्ट्रवादाला गोव्याने दिलेली मूठमाती कॉंग्रेसच्या सलग निर्विवाद विजयांनी अधोरेखित केल्यानंतरही पक्षाच्या नावांत ते परावलंबित्वाचे द्योतक ठेवण्याची गरज काय होती? भाजपाच्या तत्कालिन नेतृत्त्वाचा गनिमी कावा स्पष्ट दिसत असतानाही उजव्या कर्मठांचा हात धरण्यामागे केवळ सत्तेचीच प्रेरणा होती का? अशा अनेक प्रश्नांची मांदियाळी खलप यांच्या राजकारणाभोवती फेर धरून आहे.

Ramakant Khalap, Deputy CM of Goa
Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

राजकारणात अचूक मुहुर्त साधणे फार महत्त्वाचे असते. पदरी मूठभरसुद्धा खासदार नसताना देशाचे पंतप्रधान झालेले हरदनहळ्ळी देवेगौडा हे गोरज मुहुर्तांचे दर्दी जाणकार. त्यांच्या मंत्रिमंडळांत मगो पक्षाचे एकमेव खासदार असलेल्या खलप याना विधीमंत्री पदाचा सन्मान लाभला. पण गौडांच्या सहवासाने मुहूर्त साधण्याची कला त्याना साध्य करता आली नाही, याचे आश्चर्य वाटते. कदाचित गौडांच्या अन्य कला पाहून त्यानी त्यांची धास्ती घेतली असावी. सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वांचा सार्वकालीन अभाव असलेल्या गोमंतकीय राजकारणात खलप यांच्या वकुब आणि कौशल्याची कदर झाली नाही, हे सतत जिव्हारी लागणारे शल्य आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातला खलपांचा उत्कर्षकाल हाच या पक्षाच्या राजकीय परिघाबाहेर फेकले जाण्याचाही काळ होता. स्थानिक पक्षाच्या वाढीला गोव्यासारख्या छोट्या राज्यांत अनेक मर्यादा असतात. गोव्यातल्या अल्पसंख्याकांना आपल्याभोवती राजकारण फिरते ठेवण्याची युक्ती कळली आणि त्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाला मगो पक्षापेक्षा कॉंग्रेसमधली अतार्किक समीकरणे आकर्षक वाटू लागली. याच काळात राजकारणात पैसाही धोधो वाहू लागला. निवडणुकीच्या वेळी खलप आणि त्यांच्या साथीदारांनी विश्वासाने माणसे निवडून उमेदवारी द्यावी आणि निवडून आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस हाऊजसमोर गोंडा घोळवत उभे राहावे, हे नित्याचेच झाले. शेवटी तर ही संधी साधून घेण्याची वृत्ती मतदारांतही झिरपली आणि राजकारणाला सटोडियांच्या व्यवहाराचे रूप आले. ही अवनती मुक्याने पाहाण्यावाचून आणि नवख्या अननुभवींकडून पराभूत होण्याशिवाय खलपांकडेही पर्याय नव्हता.

एरवीच्या बैठकीत राजकारण शुचिर्भूत करण्याच्या शालीन ताना आळवणारे पाठ फिरताच जलशांमधून हमखास शिट्ट्या मिळवून देणाऱ्या थिल्लरपणाकडे वळायचे. खलपाना तो बाज जमला नाही, हे एका अर्थी गोव्याचे सुदैव म्हणायचे; अन्यथा आज त्यांच्या अमृतमहोत्सवामुळे जो उत्स्फूर्त आनंद होतो आहे तो झाला नसता. राजकारणाला शरपंजरी पडताना पाहून ज्यांच्या तोंडावरली माशीदेखील हलली नाही. त्यांचा उदोउदो करण्याच्या या काळात खलपांच्या सभ्य राजकारणाची उपेक्षा खटकते, तरीही समाधान याचेच की त्यांची आजवरची वाट काटेरी व पडझडीची असली तरी कलंकविरहितच राहिली. खलपांचे कर्तृत्व राजकारणाबरोबरच शिक्षण आणि बँकिंगच्या क्षेत्रातही चमकलें. दोन्ही क्षेत्रांत सामूहिक योगदानाला महत्त्व असते याचे भान त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना आपल्याला ठेवावे लागेल. सूडाचे राजकारण त्यांच्या बँकिंगमधल्या कारकिर्दीला कसा अपशकून करून गेले, हा इतिहास कधी तरी समोर येईलच.

खलप यांच्यात एका उत्कृष्ट साहित्यिकाला लागणारी सर्व गुणवैशिष्ट्ये आणि मुख्य म्हणजे संवेदनशील मन आहे. या प्रांताची मुशाफरी त्यानी काहीशी सक्तीनेच केलेली दिसते. उस्फूर्तपणे मांड ठोकून बसले तर ते गेल्या सहा दशकात आमूलाग्र बदललेल्या गोव्यावरला अधिकारी दस्तावेज सहज सुफळ करू शकतील. उत्कृष्ट असा ललित लेखक त्यांच्यात दडलेला आहे. आता, अमृतमहोत्सवाचा योग साधून त्यानी सकस लेखनाचे प्रयोजन ठेवावे. रमाकांत खलप या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे असणे गोव्याच्या राजकारणाला प्रतिष्ठा प्रदान करते. त्याना उत्तम आरोग्य लाभावे, ही तर तमाम गोमंतकीयांची सदिच्छा. खलप यांचा शतकमहोत्सवी वाढदिवसही गोव्याला साजरा करायचा आहे. तो दिवस दिसावा आणि तेव्हाही ते असेच भर यौवनात असावेत, याच शुभेच्छा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com