छत्रपतींचे हिंदू राज्य

Chhatrapati Shivaji Maharaj : पणजी येथे जे जुने सचिवालय किंवा गोवा राज्य वस्तुसंग्रहालय आहे, तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेचा एक दगडी शिलालेख उपलब्ध आहे.
Chhatrapati Shiavaji Maharaj
Chhatrapati Shiavaji Maharaj google image
Published on
Updated on

छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेचा हिंदुस्थानात एकमेव दगडी शिलालेख उपलब्ध आहे, तो गोव्यातील बाणस्तारीचा सन १६८८ मधला शिलालेख आहे.

पणजी येथे जे जुने सचिवालय किंवा गोवा राज्य वस्तुसंग्रहालय आहे, तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेचा एक दगडी शिलालेख उपलब्ध आहे.

शिलालेखाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिलालेखावर छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेने कोरून ठेवले आहे की, छत्रपतींचे गोवा राज्य हे हिंदू राज्य झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेचा हिंदुस्थानात एकमेव दगडी शिलालेख उपलब्ध आहे, तो गोव्यातील बाणस्तारीचा सन १६८८ मधला शिलालेख.

अशा या शूर हिंदू हृदयसम्राट राज्यकर्त्याचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य आजच्या गोव्यातील आठ तालुक्यांत होते. पोर्तुगिजांनी पुरावे पुसून टाकण्याचे प्रयत्न करूनसुद्धा या लोकप्रिय छत्रपतींना गोव्याचे लोक विसरू शकलेले नाहीत.

संभाजी महाराजांचा हा शिलालेख बाणस्तारीजवळील अडकोण येथे शांतादुर्गा मंदिराच्या बाजूला चौथऱ्यावर होता. सन १६६४ पासून पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतले.

पुढे १६७५ मध्ये फोंडा, सांगे, धारबांदोडा, केपे, काणकोणसह कारवार, अंकोला हा भाग शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. या काळात गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य फक्त बार्देश, तिसवाडी, मुरगाव व सासष्टी या तालुक्यांपुरते मर्यादित होते.

हा शिलालेख आगभाडे नावाचा कर दोन ठिकाणच्या नदीवरच्या येण्या-जाण्याचे पैसे माफ‌ केल्याच्या आज्ञेचा आहे. शिलालेखाचा मूळ तपशील पुढीलप्रमाणे :

|| श्रीगणेशायनम: ||

श्री लक्ष्मी प्रसन्न || स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके ||

१६१० वर्ष | वर्तमान विभव नाम संवत्सर चैत्र शुद्ध

प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतऊर्जे देश

क्षत्रिय कुळावतंस राजा शंभु छत्रपती यांचे आज्ञानुवतीं

राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रांत मामले

फोंडा याप्रती तिम नायकाचे पुत्र सोम नायक याही विनंती केली जे पूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये तारी अनंतऊर्जेसी लोकास आगभाडे घेत नव्हते. तेणेकरून व्यावहारीक लोके सुखे येत. तेणेकरून राजगृहि हासिल होय. आता हे हिंदू राज्य जाहाले पासोन आगभाडें घेऊ लागले, तेणेकरूनी राज्यगृहि हासिलासी धक्का बैसला.

त्यासि ते कृपाळू होउन आगभाडे उरपासि जाव दुडुवा अर्धकोसी चौदादुडु घेत आहे ति मना करावे पण काही

राजागृहि आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि तेप्रमाण

जाणुन भानस्तरि व पारगावि व मांदुस कुंडै येथिल आगभाडे सोडीले. पुढे या प्रमाणे सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाशकरुनये करतिल त्यासि महापातक आहे.

|| श्लोक || श्वकृत वा परेणापी धर्मकृत्यं कृतं नरः ||

यो नाशसती पापात्मा स यति नरकानू बहुन ||१||

लोभान्मत्सरतो वापि धर्मकारस्य दुस्यकः || यो नरःस महापापी विष्ठायां जायते कृमि || २ || दानपाळनयोर्मध्ये दानातू स्तेयोनुपाळनं || दानातृ स्वर्गवमाण्नोति पाळणादच्युतं पदं || या धर्मकार्या समस्ति मान देवावे.

शिलालेखाचा आशय पुढीलप्रमाणे :

||श्रीगणेशायनम: || श्री लक्ष्मी प्रसन्न "शालीवाहन शक वर्षे १६१०, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुरवारी गोमंतकातील अनंतऊर्जे देशात क्षत्रिय कुळावंतस राजा शंभू छत्रपति यांचा आज्ञापालन करणारा राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य अधिकारी प्रांत माम‌ले, फोंडा याच्याकडे तिम नायक व त्याचा मुलगा सोम नायक यांनी विनंती केली की पूर्वी मुसल‌मानाच्या राज्यामध्ये अनंतऊर्जे म्हणजे फोंडा महालातील नदीच्या तीरावर आगभाडे नावाचा कर घेत नव्हते.

त्यामुळे व्यवहारीक व व्यापारीक सुखी होते. राजाला व्यवस्थित इतर कर मिळत होता. आता हे राज्य म्हणजे संभाजी महाराजांचे हिंदू राज्य झाल्यापासून आगभाडे नावाचा कर घेऊ लागले. तेव्हापासून राजगृहाच्या करप्राप्तीला धक्का बसला.

तेव्हा कृपाळू होऊन आगभाडे नावाचा कर हा चौदा दुडु घेत होते, त्यास मनाई केली म्हणजे माफ केला. बाणस्तरी, वरगाव (आजचे माशेल) मंदुर, कुन्डई येथील आगभाडे कर माफ केला. आज्ञा पुढे सर्वांनी चालवावी."

पुढील लेखात ही आज्ञा मोडणाऱ्यांसाठी संस्कृत श्लोक स्वरूपात शापवाणी कोरलेली आहे.

या शिलालेखाची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. एकूण २२ ओळींचा हा शिलालेख आहे. खाली डाव्या व उजव्या बाजूस गाईची चित्रे काढली आहेत. त्याच्यामध्ये ‘शुभं भवतु’ ही अक्षरे खोदले‌ली आहेत. या शिलालेखातील लेखावरून छत्रपतीचे राज्य गोव्यातील फोंडा महालावर कसे होते, हे कळते. छत्रपतींचे अधिकारी या प्रजेला जाचक वाटणारे कर माफ करत होते. आता हे राज्य म्हणजे छत्रपतींचे राज्य हे हिंदू राज्य झाले, असे फोंडा महालातील एक प्रतिष्ठीत नागरिक तिम नायक आणि त्याचा मुलगा सोम नायक म्हणतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com