राजेंद्र पां. केरकर
चांद्र कालगणनेतला पहिला महिना चैत्र, वसंत ऋतूच्या काळात येत असल्याने, भारतीय लोकमानसाला आपल्या परिसरातल्या वृक्षवेलींवरती नवपालवी आणि रंगीबेरंगी पुष्पांचा बहर पाहून आनंदोत्सवाची प्रचिती आली.
धरित्री सुजलाम,सुफलाम असेल तरच मानवी जीवनात सुख समृद्धीचे आगमन होत असते. आणि त्यासाठी निसर्गातल्या दिव्यत्वाला त्यांनी सनातन काळापासून देवत्व प्रदान करून, सण उत्सवांची लोकपरंपरा निर्माण केली.
चैत्र महिन्यातल्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि त्यामुळे नववर्षातला पहिला दिवस गुढ्या, तोरणे, पताका उभारून साजरा करण्याला, ‘गुढी पाडव्या’ला महत्त्व प्राप्त झाले.
चैत्रातल्या शुद्ध तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत रोज सकाळी चैत्रांगण रांगोळीचा आविष्कार भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांच्या माध्यमातून केला जातो.
भारतीय लोकमानसाला वृक्षवेलींच्या फुलाफळांचे रंग, गंध भावले आणि त्यामुळे रांगोळीतून त्यांनी आपल्या कलात्मकतेचा आविष्कार घडवला.
चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असल्याने, चांद्र कालगणनेतल्या या पहिल्या महिन्याला चैत्र नाव प्राप्त झालेले असून निसर्गातल्या नव पल्लव आणि पुष्पांच्या आविष्काराला जणू काही स्थान देण्यासाठी चैत्रांगण रांगोळीची परंपरा निर्माण झाली.
गोवा - महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर सण - उत्सवांच्या प्रसंगी रांगोळी घातली जाते ते मांगल्यपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने.
गोव्यात पूर्वीपासून विविध हिंदू जाती जमातीत सणाच्या दिवशी रांगोळी घालण्याची परंपरा असून चैत्रमास हा आनंदोत्सवाचा कालखंड असल्याने काही ठिकाणी महिनाभर, तर काही ठिकाणी चैत्र प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत जेव्हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतो तेव्हा चैत्रांगणाची रांगोळी घातली जाते.
देवी पार्वती हे पृथ्वीमातेचे रूप मानलेले असून तिचे पूजन गौरी म्हणून भाद्रपद महिन्यातल्या गणेश चतुर्थीच्या काळात केले जाते, तर चैत्रात प्रतिपदा ते शुद्ध नवमीपर्यंतच्या नवरात्रात माहेरवाशीण चैत्रगौरीची प्रार्थना करून, तिच्या आगमनाखातर रांगोळ्या घालतात.
घरासमोर पूर्वी गाईच्या शेणाने सारवलेल्या अंगणात स्त्रिया रांगोळ्या काढायच्या. त्यावेळी सूर्य, चंद्र, तारे यांच्या विविध प्रतीकांबरोबर संस्कृतीने वंदनीय मानलेल्या प्रतीकांचा अत्यंत कल्पकतेने रांगोळीद्वारे आविष्कार घडवला जातो.
चैत्र महिन्यात गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, चैत्रगौर आदी सण उत्सवांचे आयोजन होत असले तरी या महिन्यातच वर्षा ऋतूचे रंग लावण्य आणि गंध मोहिनीचा आविष्कार विविध वृक्षवेलींवरती उत्स्फूर्तपणे होत असतो.
त्यासाठी चैत्रांगण रांगोळीचे प्रयोजन याच काळात केलेले आहे. भारतातल्या लोकमानसाला विविध कलागुणांची पूर्वापार अभिरुची असून, रांगोळीच्या आविष्कारातून निसर्ग आणि पर्यावरणातल्या संचितांचे दर्शन होत असते.
लग्न करून दिलेली गौरी चैत्रात माहेरी येते अशी लोकश्रद्धा रूढ असल्याकारणाने गोवा-कोकणातल्या ब्राह्मण स्त्रियांत विशेषतः नवविवाहितांत चैत्रगौर साजरी करण्याची परंपरा आहे.
माहेरी आलेल्या आपल्या सुवासिनी मुलीला गौरीचे रूप मानून, आई तिचे गोडधोड करून कौतुक करते आणि याच काळात शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रांगण रांगोळी घातली जाते.
चैत्रांगणातल्या रांगोळीत 51 शुभ आणि मंगलदायी प्रतीकांचा उपयोग केला जातो. भारतीय संस्कृतीत पल्लवांनी युक्त आम्रवृक्ष समृद्धीचे प्रतीक मानलेला असल्याने चैत्रांगण रांगोळीत वरच्या बाजूला आम्रपल्लवांनी युक्त तोरण काढून त्याच्याखाली शिव-पार्वती, लक्ष्मी -नारायण किंवा राम - सीता यांना प्रतीकात्मक देव घर चित्रित करून बसवतात.
हत्ती हे पर्जन्यवृष्टीचे, घोडा हे गतीचे, नागयुगुल हे सृजनत्वाचे प्रतीक म्हणून रांगोळीत येतात. कासव हे श्रीविष्णूच्या कूर्मावताराचे प्रतीक असले तरी निसर्गाच्या अन्न साखळीत त्याची भूमिका महत्त्वपूर्ण मानलेली आहे.
बासरीचे स्वर आणि सूर बाळकृष्णाची स्मृती जाणवते. गरुड हे श्रीविष्णूचे वाहन असले तरी पक्षी सृष्टीत त्याला राजाचा किताब लाभलेला आहे. स्वस्तिकाला भारतीय संस्कृतीत आदर सन्मान लाभलेला आहे.
त्रिशूळ, धनुष्यबाणाद्वारे रिपूमर्दन झालेले आहे. आणि त्यामुळे या प्रतीकांचे कलात्मक रेखाटन चैत्रांगणाचा रांगोळीत करण्यात आले आहे. कमळपुष्प पावित्र्याचे, कलश सृजनाचे संचित मानलेले आहे.
आंबा, केळी यासारख्या माधूर्यपूर्ण अशा फळांचा गोडवा भारतीय लोकमानसाला पूर्वापार भावलेला असून त्यासाठी त्यांना रांगोळीत स्थान लाभलेले आहे. डमरू हे वाद्य शिवाचे आवडते असून, सनई चौघड्याचे वादन मंगल प्रसंगी केले जाते.
या वसंत ऋतूतल्या चैत्र महिन्यात आपल्या आणि कुटुंबाच्याच नव्हे तर सर्वांच्या जीवनात मांगल्याचे, समृद्धीचे आगमन व्हावे याची मनीषा चैत्रांगणातल्या रांगोळीतून अभिव्यक्त केली जाते.
दिवसरात्र प्रकाश देण्याचे कार्य करणारे सूर्य आणि चंद्र असो, अथवा विजयाप्रीत्यर्थ उभारली जाणारी गुढी असो, अथवा शंख, चक्र, गदा, पद्म,ऊँकार यांसारखी शुभचिन्हे या साऱ्या घटकांना रांगोळीतून समूर्त करण्याची किमया स्त्रीमधील कलाकार चैत्रांगणात करत असतो.
चैत्रांगण रांगोळीत ज्या प्रतीकांचा वापर केला जातो त्यांचे स्थान मानवी समाजात असल्याने सूर्यापासून प्रकाशाबरोबर ऊर्जा लाभावी, चंद्राची शीतलता येऊन जीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे.
सौभाग्याचे अलंकार म्हणून सुवासिनी स्त्रिया ज्या करंडा, फणी, मंगळसूत्राचा उपयोग करतात, त्यांचा वापर रांगोळीत करण्यात येतो. पाळणा हे जन्मोत्सवाचे प्रतीक असल्याने त्यासाठी त्याचाही उपयोग करण्यात आलेला आहे.
तुळस ही सासुरवाशिणीची सनातन काळापासून सखी मानलेली असून, स्त्रिया आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगात तिला सामावून घेतात आणि त्यामुळे तुळशी वृंदावनाचे प्रतीक या परंपरेत दृष्टीस पडते.
धरित्री हा खरे तर समस्त सजीव सृष्टीच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण आधार असून तिला आपल्या भारतीय संस्कृतीने सृजन, सर्जनाचे प्रतीक मानलेले आहे. तिच्या मातीत पेरलेले बी अंकुरते आणि त्यामुळेच अन्नधान्यांची पैदास शक्य होते.
त्यासाठी धरित्री ही अन्नपूर्णा मानलेली असून ती म्हणजेच देवी पार्वती, गौरीचे रूप आहे. तिचे आगमन होत असल्याने धनधान्याची प्राप्ती व्हावी, अशी आशा असते आणि त्यासाठी तिला प्रसन्न करण्यासाठी चैत्रांगण रांगोळीच्या संकल्पनेचा उदय झालेला असावा.
गोव्यात चैत्रांगण रांगोळीचा आविष्कार गुढी पाडवा ते अक्षय तृतीया या कालखंडात पाहायला मिळतो. गुढी पाडव्याच्या दिवशी हिरव्यागार वृक्षवेली आणि कुळागराच्या सान्निध्यात वसलेल्या अंत्रुज महालातल्या केरी गावातल्या विजयादुर्गा देवीसमोरच्या अंगणात रांगोळीद्वारे समूर्त झालेली चैत्रांगणाची परंपरा भारतीय संस्कृतीच्या सुंदर आणि विलोभनीय आविष्काराचे दर्शन घडवत असते.
ग्रीष्माचे रखरखते ऊन आल्हाददायक करण्यासाठी मानवी मनात चैत्रांगण रांगोळीचा उद्गम हा खरे तर भारतीय संस्कृतीची मांगल्याच्या आणि समृद्धीच्या दिशेने चाललेल्या प्रवासाचे द्योतक आहे. मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्यापूर्वी ग्रीष्म काळात अंगाची लाही लाही होत असते.
हिरवळ आणि पाणी जेथे दिसेल तेथे मन धाव घेण्यात सिद्ध होत असते. त्यामुळे चैत्रांगण रांगोळीत शुभदायक आणि आनंदवर्धक सुचिन्हे कल्पकतेने वापरली जातात. रांगोळी ही भारताची पूर्वापार सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध लोककला आहे.
त्यातून सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी होत असते. गणेश चतुर्थी, दिवाळी, चातुर्मास आदी सण उत्सवांत अशुभनिवारक आणि सुखसमृद्धीवर्धक रांगोळीला स्थान लाभलेले असून चैत्रांगण रांगोळी हासुद्धा आपल्या सांस्कृतिक समृद्धीचा आविष्कार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.