Will Power: ...हे आपल्याला शक्य आहे; गरज आहे ती केवळ प्रबळ इच्छाशक्तीची

Will Power: मोठमोठ्याने मोबाइलवर बोलणे अशा लहानसहान गोष्टी आपण ठरवले तर निश्चितच बदलू किंवा टाळू शकतो.
Will Power
Will PowerDainik Gomantak
Published on
Updated on

Will Power: जेव्हा जेव्हा मी समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा मुक्तांगण या डॉक्टर अनिल अवचट यांच्या संस्थेची प्रार्थना सर्वांत आधी माझ्या मनात येते. ती अशी,

जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया

जे शक्य साध्य आहे ,निर्धार दे कराया

मज काय शक्य आहे ,आहे अशक्य काय

माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया.

म्हणूनच मनस्वी वाटते की, हो माझ्या मनातल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आपल्या सर्वांना सहज शक्य आहे. गरज आहे ती केवळ प्रबळ इच्छाशक्तीची.

एकीकडे आपण प्रगत देशांच्या यादीत लवकर समाविष्ट होण्याची स्वप्ने बघत आहोत. तर मग, जसे त्या देशांतील नागरिक काही नियम स्वतःहून पाळतात, सार्वजनिक स्वच्छतेबद्दल सतर्क, जागरूक असतात, तसे वागायलाही हवे ना आपण सर्वांनी! केवळ पाश्चात्त्य भाषा आत्मसात करून किंवा तसा आहार-पेहराव करून आपली स्वप्नपूर्ती होईल का?

आपल्या समाजस्वास्थ्याला घातक अशा चुकीच्या सवयी बदलणे,स्वतःहून नियम पाळणे,सार्वजनिक ठिकाणी शिस्त लावून घेणे हे आपल्याला अशक्य मुळीच नाही. आवश्यकता आहे ती बेदरकार वृत्ती झिडकारण्याची, ‘मला काय त्याचं’ किंवा ‘सब कुछ चलता है’ ही मानसिकता बदलण्याची.

आपल्याला जर आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम, आपल्या देशाच्या आणि पर्यायाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत आपले प्राण देण्यासाठी अहोरात्र देशाची सेवा करणाऱ्या जवानांबद्दल कृतज्ञता वाटत असेल, तर या क्षणापासून आपण खालील गोष्टी आचरणात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया.

Will Power
Inflation: महागाईच्या झळा राजकारण्यांनाही बसू द्या!

’मी एकट्याने करून काय उपयोग?’ किंवा ‘दुसरा का नाही करत?’ हा विचार दूर करून स्वतःपासून सुरुवात करूया. जमल्यास चुकीचे वागणाऱ्यालाही प्रेमाने,नम्रपणे त्याला तसे वागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करूया.

माझ्या कुठल्याही कृतीचा, वागण्याचा त्रास, हानी समाजातील दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही याची काळजी मी घ्यायला हवी ना? जसे की, रस्त्यात कुठेही वाहन लावणे,वाहनांचे भोंगे कर्कशपणे वाजवणे, सिग्नलपाशी थोडासाही संयम न दाखवणे, येता जाता मोठमोठ्याने मोबाइलवर बोलणे, मोठ्याने ध्वनिक्षेपक लावणे वगैरे वगैरे लहानसहान गोष्टी आपण ठरवले तर निश्चितच बदलू किंवा टाळू शकतो.

आजकाल कुठेही जा,‘संगीत’ खरे तर गोंगाट हा हवाच. वाचकांना कदाचित गंमत वाटेल पण आमच्या परिसरात जो घरचा कचरा गोळा करायला यायचा तो इतक्या मोठमोठ्याने गाणी गात (?) यायचा की त्याची चाहूल लागली रे लागली की आसपासची सर्व भटकी कुत्रीसुद्धा कर्कश भुंकायला सुरुवात करायची.

चारचौघांनी त्याला ‘तू गात येऊ नकोस’ म्हणून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचे म्हणणे एकच की, मी गात गात नाही आलो तर कचरा गोळा करायचे काम नाही करू शकणार. तो ऐकेना तेव्हा कंत्राटदाराने त्याला कामावरून काही दिवसांत काढून टाकले. कधी कधी वाटते मौज मज्जा याची संकल्पनाच या विभक्त कुटुंबपद्धतीत बदलली आहे.

मौजमज्जा म्हणजे ध्वनिक्षेपकावरील कर्कश संगीत, ज्याचे शब्द किती जणांना कळतात, अर्थ असेलच तर त्याच्याशी काही देणेघेणे असते का, आणि असे हे केकाटणे कुणी खरेच ऐकते का हा मला प्रश्न असतो, अक्राळविक्राळ अंगविक्षेपरूपी नृत्य, आणि मद्याने भरलेला ग्लास हवाच अशी सर्वांची दृढ समजूत झाली आहे.

‘कानाला फेस’ आणणाऱ्या ध्वनिक्षेपकामुळे लोकांचा संवाद हा आपापसांत न राहता एक कोलाहल झालेला असतो. माझ्या घरासमोर एक लहान मुलांची कीडझी शाळा आहे. तिथे रोज सकाळी अर्धा तास फिल्मी पंजाबी रॅप संगीत लावतात. का तर म्हणे ह्या २-४ वयोगटातील मुलांना शाळेत आल्यावर नाचता येते आणि ती रडत नाहीत. माझ्यासारखे केवळ ‘कालाय तस्मै नमः असे म्हणून सहन करतात.

Will Power
PM Narendra Modi: विजयाचे गुजरात मॉडेल अन् मोदींचा डंका!

काल तर हद्दच झाली. हॉटेल आणि मॉलमध्ये ध्वनिक्षेपक येऊन बराच काळ लोटला, पण काल पेट्रोल पंपावरही जोरात गाणी लावली होती. मला तिथून केव्हा बाहेर पडते असे झाले. ८-१० तास तिथे रोज काम करणाऱ्या त्या तरुण कर्मचारी वर्गाची कीव करावीशी वाटली. काही काही ‘पोदेर’, पाववालेही तसेच.

पिसाळलेले कुत्रे चावल्यासारखे भोंगा वाजवत सुटतात. हे सायकलभोंग्याचे लोण आता मुंबई पुण्यातही पसरले आहे. पण ते पाव न विकता, इडली ,वडे वगैरे विकतात. कितीही मान्य केले की ‘पोदेर’ही गोव्याची ओळख आहे ,परंपरा आहे .

पण आपण सर्वच परंपरा जपल्या आहेत का? काही परंपरांमध्ये बदल केलाच ना? पाववाल्याचा भोंगा वाजला की भटक्या कुत्र्यांनाही चेव येतो. कितीतरी पाववाल्यांना मी आवाज प्रदूषण आणि त्याचा सर्व वातावरण, प्राणिमात्र यावर कसा विपरीत परिणाम होतो याबद्दल चार भाषांत छापलेली पत्रके ही वाटली आहेत आणि अजूनही वाटते.

अशा सततच्या मोठ्या आवाजाने खरच करमणूक होते का, या सततच्या कानावर मोठ्याने आदळणाऱ्या ध्वनी लहरींचा त्यांच्या श्रवण क्षमतेवर काही वर्षांनी काय परिणाम होतो याचा खरेच अभ्यास केला पाहिजे.

आपल्याला खरोखरच जर प्रगत देशांबरोबर बसायचे असेल तर अशा कितीतरी गोष्टी बदलायला हव्यात. आजकाल उत्सव म्हटले की सर्वसाधारण शांतताप्रिय माणसाला धडकीच भरते. तरुणाईचा जोश बघून जरी आनंद झाला, तरी तो ज्या प्रकारे व्यक्त होतो ते बघून वाटते उत्सव, सण साजरे करण्याची खरेच का ही अशी ‘आपली’ संस्कृती किंवा रीत आहे ?

दृक्श्राव्य माध्यमांमुळे जेव्हा परदेशात, सुधारलेल्या, पुढारलेल्या देशांत हा धांगडधिंगाण पहिला जातो तेव्हा आजही त्यांनाच नाही तर काही वर्षांपूर्वी परदेशस्थ झालेल्या आपल्या भारतीयांनाही इंडिया म्हणजे रानटी लोकांचा,असंस्कृत लोकांचा ,साप नाग,अराजकता यांचा देश वाटला तर त्यांना दोष कशाला द्यायचा?

आमच्यासारख्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या जवळपास जन्मलेल्या, म्हणजेच आज साठी सत्तरी ओलांडलेल्या पिढीला हे उत्सवांच्या जल्लोषाचे, दिवसेंदिवस अधिकच बीभत्स होत असलेले स्वरूप पाहिले की वाटते, कधीतरी आपण सुसंस्कृत नागरिक घडणार/घडवणार आहोत का? कधीतरी आपण सामाजिक स्वास्थ्याचा, इतरांना होणाऱ्या त्रासाचा, असुविधेचा विचार करायला शिकणार आहोत की नाही?

प्रगत देशात एखादा जर आपली गाडी मागे घेत असेल तर मागून येणारा आपणहून शांतपणे थांबून अप्रत्यक्षपणे त्याचे सहकार्य करतो, एवढेच नाही तर पार्क केलेली गाडी जर बाहेर काढत असेल आणि दुसरे कोणी पार्क करण्यासाठी तिथे थांबले असेल तर उगीच वेळकाढू पणा न करता किंवा ‘मला काय त्याचं’ अशी वृत्ती न ठेवता जितके होईल तितके पटकन आपले वाहन पार्किंगमधून बाहेर काढून थांबलेल्याला जागा मोकळी करतो.

अशा साधी रांग लावण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी आपल्या जबाबदारीपर्यंत कैक गोष्टी आहेत की, ज्यांचे आपण एक सुसंस्कृत ,जागरूक नागरिक म्हणून प्रगत देशातील नागरिकांचे अनुकरण करू शकू.

पण, ज्या देशातील नागरिक सर्व काही सरकारची जबाबदारी आहे असे म्हणून आपली जबाबदारी विसरतात, किंवा ‘मला काय त्याचं’ किंवा ‘मीच का’ असाच विचार करतात तो देश प्रगत देशांत कसा स्थानापन्न होणार? नुसती स्वप्न बघून काय उपयोग? ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपआपला खारीचा वाटा उचलायला हवा ना?

नुसत्या ‘आत्मनिर्भर भारत ,स्वच्छ भारत ,महान भारत’ अशा पोकळ वल्गना किंवा तांत्रिक प्रगती, पाश्चिमात्य वेशभूषा, खाणे, भाषा या सर्व गोष्टींनी आपल्याला प्रगत देशांत स्थान मिळवून देणे केवळ अशक्यच. मग, चला तर ‘शुभस्य शीघ्रम्’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com