

Small Savings Schemes Interest Rates: जर तुम्ही देखील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना किंवा किसान विकास पत्र यांसारख्या लोकप्रिय सरकारी लघु बचत योजनांमध्ये आपली कष्टाची कमाई गुंतवली असेल, तर 30 सप्टेंबर ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारकडून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी या सर्व लघु बचत योजनांवरील नवीन व्याजदरांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सध्या गुंतवणूकदारांच्या (Investors) मनात हाच मोठा प्रश्न आहे की, सरकार यावेळी व्याजदरांमध्ये वाढ करणार की जुनेच दर कायम ठेवणार? अर्थतज्ज्ञांच्या मते, सरकारी बॉन्डच्या यील्डमध्ये झालेल्या बदलांमुळे यावेळी व्याजात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर होणार आहे.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ देवेंद्र कुमार पंत यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, या तिमाहीत सरकारकडून व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही किंवा सद्यस्थिती कायम ठेवली जाऊ शकते, अथवा काही योजनांवर हलकीशी वाढदेखील पाहायला मिळू शकते. सरकार जेव्हा या लघु बचत योजनांवर व्याजदर ठरवते, तेव्हा प्रामुख्याने सरकारी बॉन्डच्या यील्डचा अभ्यास केला जातो. जून महिन्याच्या शेवटी 10 वर्षांच्या मुदतीच्या सरकारी बॉन्डचा यील्ड 6.74 टक्के होता, जो 22 सप्टेंबरपर्यंत वाढून 7.05 टक्क्यांवर पोहोचला.
यामध्ये जवळपास 31 बेसिस पॉईंट्सची वाढ नोंदवली गेली. बॉन्ड यील्डमध्ये आलेल्या या किंचित उशिरामुळे तज्ज्ञांचे असे मानणे आहे की, सरकार व्याजदर कमी करण्याचा कोणताही धोका पत्करणार नाही; उलट ते दर स्थिर ठेवू शकते किंवा त्यात काही प्रमाणात वाढ करु शकते. मागील तिमाहीत म्हणजेच 30 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत सरकारने कोणत्याही योजनेच्या व्याजदरात बदल केला नव्हता. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या योजना दीर्घ मुदतीच्या म्हणजे 15 ते 21 वर्षांच्या असतात, त्यामुळे यात जरी 0.10 किंवा 0.20 टक्क्यांची जरी वाढ झाली, तरी मॅच्युरिटीच्या वेळी मिळणाऱ्या फंडमध्ये हजारो ते लाखांपर्यंतचा फरक पडू शकतो.
किसान विकास पत्रामधील व्याजदर थेट तुमचे पैसे किती महिन्यांत दुप्पट होणार यावर अवलंबून असतात. त्यामुळे व्याजदर वाढल्यास पैसे दुप्पट होण्याचा कालावधी आणखी कमी होऊ शकतो. यासंदर्भातील अंतिम निर्णय आगामी 30 सप्टेंबर रोजी वित्त मंत्रालयाच्या वतीने अधिसूचना जारी झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, जर तुम्ही सध्या नवीन मुदत ठेवी किंवा लहान बचत योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर 30 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.