RBI New Rules: सायबर चोरट्यांना बसणार मोठा दणका! बँकिंग अ‍ॅपमध्ये येणार 'स्टॉप स्विच' बटण, एका क्लिकवर रोखता येणार सर्व ऑनलाइन व्यवहार

Banking App Stop Switch Button: ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत.
RBI New Rules Banking App Stop Switch Button
RBI New Rules Banking App Stop Switch ButtonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) महत्त्वाचे बदल प्रस्तावित करत आहे. नव्या प्रस्तावानुसार, बँकेच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये ‘स्टॉप स्विच’ नावाचे आपत्कालीन बटण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. खाते हॅक झाल्याचा किंवा ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास ग्राहकाला एका क्लिकवर पुढील डेबिट व्यवहार थांबवता येऊ शकतील. याशिवाय, पैसे पाठवण्याची मर्यादा स्वतः ठरवणे आणि मोठ्या व्यवहारांसाठी विश्वासू व्यक्तीची अतिरिक्त मंजुरी घेणे असे पर्यायही प्रस्तावित आहेत.

फसवणुकीचा संशय येताच ‘स्टॉप स्विच’चा वापर

RBI च्या प्रस्तावातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे ‘स्टॉप स्विच’. हे बँकिंग अ‍ॅपमधील आपत्कालीन सुविधेसारखे काम करेल. खाते, पासवर्ड किंवा डिजिटल पेमेंटशी संबंधित माहिती चोरीला गेल्याचा संशय आल्यास ग्राहकाला बँकेच्या हेल्पलाइनवर फोन करण्याची वाट पाहावी लागणार नाही. अ‍ॅपमधील हे बटण सुरू केल्यास खात्यातून होणारे ग्राहक-प्रेरित पुढील डेबिट व्यवहार थांबवता येतील.

यामध्ये नवीन पेमेंट, नवीन ऑटो-डेबिट आणि नव्या अ‍ॅपवर UPI नोंदणी यांसारख्या सुविधांवर निर्बंध येतील. मात्र, खात्यात पैसे जमा होणे किंवा आधीपासून सुरू असलेले काही नियमित व्यवहार यावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी प्रस्तावित तरतूद आहे. आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला ही सुविधा पुन्हा बंद करता येईल.

RBI New Rules Banking App Stop Switch Button
Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

पेमेंटची मर्यादा ग्राहक स्वतः ठरवू शकणार

सध्या अनेक ग्राहकांना बँक किंवा पेमेंट अ‍ॅपने निश्चित केलेल्या व्यवहार मर्यादांवर अवलंबून राहावे लागते. नव्या प्रस्तावानुसार, ग्राहकांना स्वतःच्या गरजेनुसार व्यवहारांची मर्यादा ठरवता येऊ शकते. एका व्यवहारात किती पैसे पाठवायचे, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किती रक्कम पाठवता येईल किंवा दिवसभरातील एकूण व्यवहारांची मर्यादा किती असावी, हे ग्राहक ठरवू शकतील.

उदाहरणार्थ, बँकेने मोठी व्यवहार मर्यादा दिली असली तरी ग्राहक एखाद्या व्यक्तीसाठी २० हजार रुपये किंवा विशिष्ट अ‍ॅपसाठी दिवसाला १० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करू शकतो. तसेच, दिवसातील ठरावीक वेळेत काही पेमेंट सुविधा बंद ठेवण्याचाही पर्याय प्रस्तावित आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्डसाठीही अशा नियंत्रणांची तरतूद असू शकते. नवीन खाते उघडल्यानंतर डिजिटल पेमेंट सुविधा सुरुवातीला बंद ठेवून ग्राहकाच्या संमतीनंतरच सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

मोठ्या व्यवहारांसाठी ‘ट्रस्टेड पर्सन’ची मंजुरी

मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी RBI ने ‘ट्रस्टेड पर्सन मेकॅनिझम’ (TPM) प्रस्तावित केले आहे. या सुविधेत ग्राहक १८ वर्षांवरील एखाद्या विश्वासू व्यक्तीची निवड करू शकतो. ग्राहकाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास त्या व्यक्तीला व्यवहाराची माहिती पाठवली जाईल.

संबंधित व्यक्तीला व्यवहाराला मंजुरी देण्यासाठी किंवा नकार देण्यासाठी एक तासाचा कालावधी मिळेल. तिने व्यवहार नाकारल्यास किंवा निर्धारित वेळेत प्रतिसाद न दिल्यास तो व्यवहार पूर्ण होणार नाही. ही सुविधा ऐच्छिक असेल आणि ग्राहकासह विश्वासू व्यक्तीची संमती आवश्यक असेल. सुविधा सक्रिय होण्यापूर्वी २४ तासांचा कूलिंग-ऑफ कालावधीही असेल. महत्त्वाचे म्हणजे, या व्यक्तीला ग्राहकाच्या बँक खात्यातील शिल्लक, मुदत ठेवी, गुंतवणूक किंवा विम्याची माहिती मिळणार नाही. तसेच ती व्यक्ती स्वतःहून खात्यातून पैसे पाठवू शकणार नाही. UPI व्यवहार, व्यापाऱ्यांना केलेली पेमेंट आणि नियमित ऑटो-डेबिट व्यवहार या यंत्रणेच्या कक्षेत येणार नाहीत.

RBI New Rules Banking App Stop Switch Button
Goa Economic Growth: "गोव्याला सिंगापूर बनवायचे नाही, तर गोवाच ठेवून चमकवायचे आहे"; ‘सागर मंथन 5.0’मध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यं

बँकांच्या निष्काळजीपणाची व्याख्याही बदलणार

डिजिटल फसवणूक झाल्यास बँकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठीही RBI ने महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. व्यवहारासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था न करणे, अनिवार्य अलर्ट न पाठवणे, फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी २४ तास सुविधा उपलब्ध न करणे किंवा तक्रार मिळाल्यानंतर तातडीने कारवाई न करणे, अशा बाबी बँकेची निष्काळजीपणा म्हणून गणल्या जाऊ शकतात.

बँकेच्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाड, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी किंवा बँक कर्मचारी अथवा बँकेशी संबंधित तृतीय पक्षाच्या संगनमतामुळे फसवणूक झाल्यासही बँकेची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.

नियम कधी लागू होणार? RBI ने मागवल्या सूचना

RBI ने हे नियम अद्याप अंतिम केलेले नाहीत. सध्या ते मसुदा स्वरूपात असून, बँका, ग्राहक आणि संबंधित घटकांकडून १४ डिसेंबर २०२६ पर्यंत सूचना व अभिप्राय मागवण्यात आले आहेत. अंतिम मंजुरीनंतर ग्राहकांसाठीचे ‘स्टॉप स्विच’, व्यवहार मर्यादा आणि ‘ट्रस्टेड पर्सन’ यांसारखे प्रस्तावित बदल १ जुलै २०२७ पासून लागू होऊ शकतात. बँकेच्या निष्काळजीपणाशी संबंधित काही तरतुदी १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

हे नियम लागू झाल्यास डिजिटल व्यवहारांवर ग्राहकांचे नियंत्रण वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, अंतिम नियम जाहीर होईपर्यंत या सुविधा बँकिंग अ‍ॅपमध्ये उपलब्ध होणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.