मागील काही काळात भारतीयांचे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. हातात मोबाईल असलेला प्रत्येक व्यक्ती काही मिनिटांत स्टॉक मार्केटमध्ये (stock market) गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सोपी झाली असली तरी, त्यातील धोका मात्र कायम आहे. ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी बरेच अॅप्स उपलब्ध आहेत. कमी वेळात जास्त परतावा मिळवण्याच्या मोहात लोक आपलं आर्थिक नुकसान करून घेतात. गुंतवणूक करताना फसवेगिरी आणि आर्थिक नुकसानापासून बचावासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
1. स्वत:ची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूक करा
प्रत्येकाची नुकसान सहन करण्याची शक्ती वेगवेगळी असते. म्हणून स्वतःच्या कुवतीचा अंदाज घ्या आणि मग गुंतवणूक (Investment) करा. गुंतवणूक करताना स्वत:ची कुणाबरोबरही तुलना करू नका. तुमच्या मित्राने किंवा नातेवाईकाने 'इतक्या' रुपयांची गुंतवणूक केली म्हणून तुम्ही सुद्धा तेवढ्याच रकमेची गुंतवणूक करावी, असे नाही. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते.
2. गुंतवणुकीचे 'प्लॅनिंग' करा
कुठल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची, किती पैसे गुंतवायचे, किती कालावधीसाठी गुंतवायचे, या सर्व प्रश्नांचा बारकाईने विचार करा. या क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तींचा सल्ला घ्या. याच बरोबर, तुमच्या बाकीच्या खर्चाचाही विचार करा.
3. विचारपूर्वक जोखीम घ्या
जोखीम जेवढी जास्त, नफा कमवण्याची संधी तेवढी मोठी, या सिद्धांतावर विश्वास ठेऊन लोक स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक करतात. जोखीम घेताना स्वत:ला काही प्रश्न विचारा. जर तोटा झाला तर किती होऊ शकतो? तो तोटा मी सहन करू शकतो का?
4. तज्ज्ञांचा सल्ला घ्या
आर्थिक सल्लागारांना आर्थिक व्यवहाराबाबत घेतलेला सल्ला बऱ्याचवेळा फायदेशीर ठरतो. तज्ज्ञांचा (Expert) सल्ला घेण्यासोबतच तुम्ही इंटरनेट (Internet) वरून किंवा वर्तमानपत्रातूनही बरीच माहिती मिळवू शकता.
5. काही प्रमाणात नुकसान होणार हे गृहीत धरा
गुंतवणूक केली म्हणजे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. या नुकसानासाठी तयार राहणे गरजेचे आहे. तुमची संपूर्ण रक्कम एकाच प्रकारच्या माध्यमात गुंतवू नका. संपूर्ण रक्कम फक्त स्टॉकमध्ये न गुंतवता थोडी रक्कम सरकारी बॉण्ड्स किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवा. काही प्रमाणात पैसे बचत सुद्धा करा.
6. गुंतवणुकीकडे लक्ष ठेवा
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर त्याचा रोज आढावा घेणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये रोज होणारे बदल बघणे गरजेचे आहे. या बदलांच्या नुसार गुंतवणुकीत बदल करावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.