PPBL Layoffs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली आहे. ही बंदी 15 मार्च नंतर पूर्णपणे लागू केली जाणार आहे, याच्या एक दिवस आधी पेटीएम पेमेंट्स बँकेने 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. रेग्युलेटरी नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने जानेवारीच्या अखेरीस पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली होती. मात्र, कोट्यवधी ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुरुवातीला 29 फेब्रुवारीपर्यंत सूट देण्यात आली होती, मात्र नंतर ती 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली.
दरम्यान, पेटीएम म्हणजेच One97 कम्युनिकेशन्सने पेटीएम पेमेंट्स बँक युनिटमधील 20 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या या युनिटमध्ये सुमारे 2,775 कर्मचारी काम करतात. त्यानुसार या टाळेबंदीमुळे 553 लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेला आरबीआयच्या बंदीतून 15 मार्चपर्यंत सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत 16 मार्चपासून जवळपास सर्व सेवा बंद होतील. याचा अर्थ पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक 16 मार्चपासून त्यांच्या खात्यात कोणतेही नवीन पैसे जमा करु शकणार नाहीत. याशिवाय, खात्यांशी संबंधित फास्टॅग, बिल पेमेंट आदींवरही बंदी घालण्यात येणार आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेली त्यांची प्रीपेड कार्डे किंवा डिजिटल वॉलेट्स देखील यापुढे उपयोगात येणार नाहीत.
तथापि, लोकांना त्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम हस्तांतरित करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. याशिवाय आरबीआयने उर्वरित रक्कम संपेपर्यंत फास्टॅग वापरण्यास दिलासा दिला आहे, परंतु NHAI ने 15 मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या फास्टॅगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि लोकांना तो इतर कोणत्याही बँकेतून घ्यावा लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.