

IRDAI Draft Proposal Insurance Commission Cap 2026: जेव्हा आपण हेल्थ किंवा मोटर इन्शुरन्स खरेदी करतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण भरत असलेला संपूर्ण प्रीमियम आपल्या सुरक्षिततेसाठी खर्च होत आहे. परंतु, या शुल्काचा मोठा हिस्सा एजंट आणि डीलर्सच्या कमिशनपोटी लाटला जातो. याच कमिशनच्या खेळाला लगाम घालण्यासाठी आणि ग्राहकांसाठी इन्शुरन्स स्वस्त करण्यासाठी भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच 'इरडा' (IRDAI) ने एक मोठा आणि महत्त्वाचा मसुदा तयार केला.
हेल्थ इन्शुरन्सच्या क्षेत्रात पहिल्या वर्षाच्या प्रीमियमचा मोठा भाग एजंट आणि डिब्युटरच्या खिशात जातो, जिथे आधी डिब्युटरला 40 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळायचे. मात्र, आता इरडाने हे कमिशन थेट 15 टक्के आणि एजंटचे कमिशन 10 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जीएसटी (GST) कमी झाल्यानंतरही कंपन्यांनी प्रीमियम वाढवले होते, परंतु आता कमिशन घटल्यामुळे ग्राहकांना थेट सवलत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला, मोटर इन्शुरन्समध्ये कार डीलर्सची मनमानी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. नवीन कार खरेदी करताना शोरुममधून मिळणाऱ्या इन्शुरन्समध्ये छुप्या पद्धतीने कमीशन वसूल केले जाते, ज्याची आकडेवारी पाहता आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपये केवळ कमिशनमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. आता डीलर्सचे कमिशन जास्तीत जास्त 15 टक्क्यांपर्यंत सीमित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच शोरुममध्ये 'विमा सुगम पोर्टल'चा क्यूआर कोड लावणे बंधनकारक केले जाईल, जेणेकरुन ग्राहक स्वतः स्कॅन करुन थर्ड-पार्टी इन्शुरन्स खरेदी करु शकतील.
बँकेतून होम, कार किंवा पर्सनल लोन घेताना ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने मारल्या जाणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसींवरही पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात येणार आहे. या सर्व प्रस्तावांवर इरडाने 25 ऑक्टोबरपर्यंत संबंधितांकडून आणि जनतेकडून सूचना मागवल्या असून, या निर्णयामुळे इन्शुरन्स ग्राहकांसाठी अधिक सुलभ व स्वस्त होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.