
India Forex Growth: देशाच्या परकीय चलन साठ्याबाबत एक आनंदाची बातमी आली आहे. 7आठवड्यांनंतर, देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. विक्रमी उच्चांकावरुन जवळजवळ $81 अब्ज गमावल्यानंतर, भारताच्या परकीय चलन साठ्यात $5 अब्जपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तथापि, मधल्या एका आठवड्यात निश्चितच वाढ दिसून आली होती. पण त्यानंतर, सतत घसरण दिसून आली होती. दरम्यान, आताची ही वाढ खूप महत्त्वाची मानली जात आहे कारण डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली आहे. आरबीआय रुपया स्टेबल करण्यासाठी डॉलरचा सातत्याने वापर करत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात घट झाली आहे. पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात तब्बल $76 दशलक्षची घट झाली.
शुक्रवारी माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले की, 24 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 5.574 अब्ज अमेरिकन डॉलरने वाढून 629.557 अब्ज अमेरिकन डॉलर झाला. मागील अहवाल आठवड्यात, परकीय चलन साठा 1.888 अब्ज अमेरिकन डॉलरने घसरुन 623.983 अब्ज अमेरिकन डॉलरवर आला होता. गेल्या काही आठवड्यांपासून फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये घसरण होत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस परकीय चलन साठा 704.885 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून, त्यात सुमारे $81 अब्जची घट झाली आहे.
आरबीआयच्या (RBI) आकडेवारीनुसार, 24 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात फॉरेन करन्सी असेट्स 4.758 अमेरिकन डॉलर्सने वाढून 537.891 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यात सोन्याचा साठा 704 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सने वाढून 69.651 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. दुसरीकडे, एसडीआरमध्ये 79 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊन ते 17.861अब्ज अमेरिकन डॉलर्स झाले आहेत. भारताच्या (India) आयएमएफमधील फॉरेक्स रिझर्व्हमध्ये (आयएमएफ) 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊन तो 4.154 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला, असे शिखर बँकेच्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे.
दरम्यान, आधीच कंगालीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) च्या परकीय चलन साठ्यात आठवड्याला $76 दशलक्षची घट झाली. त्यानंतर 24 जानेवारीपर्यंत पाकिस्तानचा परकीय चलन साठा एकूण 11.37 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. आता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, परकीय जलन साठ्यात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे परदेशी कर्जांचे पेमेंट आहे. देशाचा एकूण परकीय चलन साठा $16.05 अब्ज आहे, तर कमर्शियल बँकांकडे $4.68 अब्ज निव्वळ साठा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.