
India Detects ₹1.88 Lakh Crore GST Tax Evasion in 2024
कर चोरी करणाऱ्यांविरोधात सरकार वेळोवेळी कठोर पाऊले उचलते. मात्र, करचोरी थांबवण्यासाठी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते करणारे त्यांच्या सवयी सोडत नाहीत. सोमवारी (10 फेब्रुवारी) जाहीर झालेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्टपणे दिसून आले. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांना एप्रिल-डिसेंबर 2024 दरम्यान 1.88 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी चोरी आढळून आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.
वृत्तानुसार, एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 72,393 प्रकरणांमध्ये आयटीसी फसवणूकीसह जीएसटी चोरी 1.88 लाख कोटी रुपये होती. या कालावधीत 132 जणांना अटक करण्यात आली तर 20,128 कोटी रुपये जप्त करण्यात आले. 2023-24 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी अधिकाऱ्यांना 20,582 प्रकरणांमध्ये 2.30 लाख कोटी रुपयांची जीएसटी (GST) चोरी आढळून आली. तर 31,758 कोटी रुपये वसूल करण्यात आले. यादरम्यान 223 लोकांना अटक करण्यात आली. 2022-23 आणि 2021-22 मध्ये, सीजीएसटी अधिकाऱ्यांना अनुक्रमे 1.32 लाख कोटी रुपये आणि 73,238 कोटी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत, 5, 12 18 आणि 28 टक्के अशा चार मुख्य स्लॅबमध्ये कर आकारणी केली जाते. सोने, चांदी, हिरे, पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर आणि रफ हिऱ्यांवर अनुक्रमे 3 टक्के, 1.5 टक्के आणि 0.25 टक्के असे तीन विशेष दर लागू आहेत. स्वतंत्रपणे, GST उपकर फक्त तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने, शीतपेये आणि वाहने इत्यादींवर वेगवेगळ्या दरांनी लागू आहे.
दरम्यान, बनावट नोंदणी शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी 2023 मध्ये मे ते ऑगस्ट आणि 2024 मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत दोन विशेष मोहिमा राबवल्या. बनावट नोंदणींविरुद्धच्या पहिल्या मोहिमेत 21,808 अस्तित्वात नसलेले GSTIN आढळले. तर 24,357 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या मोहिमेत 68,393 अस्तित्वात नसलेले GSTIN आढळले आणि 25,346 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली. यादरम्यान 19 जणांना अटक (Arrested) करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.