

Gold Price Crash Historical Monthly Drop 2026: जागतिक आणि देशांतर्गत सराफा बाजारातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. सोन्याच्या दरातील घसरण सुरुच असून, सोन्याने तब्बल 18 वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली. ऑक्टोबर 2008 मधील जागतिक आर्थिक मंदीनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीत एवढी मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात 1 जुलै रोजी कॉमेक्सवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली, ज्यामुळे सोने आणखी स्वस्त झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर आज प्रति औंस 22 डॉलरपेक्षा जास्त घसरले असून, सोन्याची किंमत 3985 डॉलर प्रति औंसवर आली. आज बाजाराची सुरुवात 4005.69 डॉलरवर झाली होती, परंतु त्यानंतर किमती झपाट्याने खाली आल्या आणि सोन्याने चार हजार डॉलरची महत्त्वाची पातळी ओलांडून खाली धाव घेतली.
देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर वर्षाच्या सुरुवातीला एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.92 लाख रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली होती. मात्र, केवळ जून 2026 या एकाच महिन्यात सोन्याच्या किमतीत तब्बल 19 हजार 700 रुपयांची प्रचंड घसरण झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला 1.60 लाख दराने विकले जाणारे सोने 30 जूनपर्यंत थेट 1.40 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीत ही अभूतपूर्व घसरण झाली असून 29 जानेवारीपासून सोने सातत्याने घसरत आहे. सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च रेकॉर्ड पातळीवरुन सुमारे 20 टक्क्यांनी स्वस्त झाले.
सोन्याच्या (Gold) किमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीमागे जागतिक पातळीवरील काही महत्त्वाची आर्थिक कारणे आहेत. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात महागाई वाढली. या वाढत्या महागाईमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक म्हणजेच 'फेडरल रिझर्व्ह' व्याजदरात मोठी वाढ करण्याची दाट शक्यता निर्माण झाली. फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष केविन वॉर्श हे व्याजदरांबाबत अत्यंत कडक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.
व्याजदर वाढण्याच्या याच भीतीने गुंतवणूकदार सोन्याची विक्री करत आहेत. यासोबतच डॉलरची झालेली मजबुती गुंतवणूकदारांना सोन्यापासून दूर करत आहे. जागतिक विकासदराची मंदावलेली गती आणि महागाईमुळे शेअर बाजारातील वातावरण कमकुवत झाले असून, गुंतवणूकदार शेअर बाजारातील आपला तोटा भरुन काढण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक काढून घेत आहेत. यामुळे सोन्याच्या बाजाराला या मोठ्या पडझडीचा सामना करावा लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.