

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ (PF) संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे जुन्या कंपन्यांमधील पीएफ खाते बंद पडलेले असते. काही खात्यांमध्ये तर अनेक वर्षांपासून ५०० ते १,००० रुपयांपर्यंतची रक्कम पडून असते. ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेकदा कागदपत्रांची पूर्तता आणि कार्यालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते. मात्र, आता अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपला ७४ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्ताने केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पीएफ खातेधारकांसाठी दोन महत्त्वाच्या डिजिटल सुविधांची घोषणा केली आहे. यामध्ये WhatsApp च्या माध्यमातून पीएफशी संबंधित सेवा मिळवणे आणि कमी शिल्लक असलेल्या निष्क्रिय खात्यांचे स्वयंचलित सेटलमेंट करणे, या सुविधांचा समावेश आहे.
पीएफ खातेधारकांना यापुढे प्रत्येक छोट्या कामासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची किंवा वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची गरज भासणार नाही. WhatsApp च्या माध्यमातून पीएफशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी खातेधारकांना अधिकृत WhatsApp क्रमांकावर Hi असा संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर उपलब्ध सुविधांच्या माध्यमातून पीएफ खात्याची माहिती मिळवता येईल. यामध्ये पीएफ बॅलन्स तपासणे, ईपीएफ पासबुक डाउनलोड करणे आणि UAN क्रमांक सक्रिय आहे की नाही, हे पाहणे अशा सुविधांचा समावेश असेल.
नवीन सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना त्यांच्या क्लेमची सद्यस्थिती तपासता येणार आहे. तसेच e-KYC पूर्ण झाले आहे की नाही, याची माहितीही WhatsApp वर मिळवता येईल. त्यामुळे पीएफशी संबंधित सामान्य कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
मात्र, या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या UAN खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. EPFO कडून अधिकृत WhatsApp क्रमांक लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही अनधिकृत क्रमांकावर वैयक्तिक माहिती किंवा OTP शेअर करू नये.
या घोषणेतील दुसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे निष्क्रिय पीएफ खात्यांमधील कमी रकमेचे स्वयंचलित सेटलमेंट. अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपन्यांमधील पीएफ खात्यांकडे लक्ष दिलेले नसते. परिणामी, अशा खात्यांमध्ये ५०० किंवा १,००० रुपयांपर्यंतची रक्कम वर्षानुवर्षे पडून राहते.
ही छोटी रक्कम काढण्यासाठी स्वतंत्र क्लेम करण्याची प्रक्रिया अनेकदा कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरते. आता पात्र निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये १,००० रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या रकमेचे स्वयंचलित निपटारा करण्याची सुविधा आणली जाणार आहे.
नवीन व्यवस्थेनुसार पात्र निष्क्रिय खात्यांमधील शिल्लक रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या लिंक असलेल्या बँक खात्यात किंवा सध्याच्या सक्रिय पीएफ खात्यात जमा केली जाऊ शकते. त्यामुळे अशा छोट्या रकमेचा दावा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
मात्र, या प्रक्रियेसाठी कोणती खाती पात्र असतील आणि पैसे जमा करण्याची नेमकी कार्यपद्धती काय असेल, याबाबत EPFO कडून अधिकृत मार्गदर्शक सूचना पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
EPFO च्या या डिजिटल सुविधांमुळे देशातील नोकरदार वर्गाला पीएफशी संबंधित कामे अधिक सुलभपणे करता येऊ शकतील. विशेषतः नोकरी बदललेले कर्मचारी, जुन्या खात्यांमध्ये पैसे शिल्लक असलेले खातेधारक आणि डिजिटल सेवांचा वापर करणाऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
WhatsApp सेवा आणि ऑटो-सेटलमेंट या दोन्ही सुविधांमुळे पीएफ व्यवस्थापन अधिक सोपे करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. आता या सुविधांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीपासून सुरू होते आणि त्यासाठी कोणते नियम लागू असतील, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.