

Central Government Employees Diwali Bonus: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. केंद्रीय वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देण्यास अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयांतर्गत सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या पगाराएवढा बोनस दिला जाणार असून, त्याची कमाल मर्यादा 6908 रुपये निश्चित करण्यात आली. या संदर्भात वित्त मंत्रालयाने 15 ऑक्टोबर रोजी अधिकृत पत्रक जारी करुन राष्ट्रपतींच्या मंजुरीची माहिती सार्वजनिक केली. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळाला.
सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा केंद्र सरकारच्या सर्व ग्रुप C मधील कर्मचाऱ्यांना होणार आहे, जे कोणत्याही इतर प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस योजनेत समाविष्ट नाहीत. याशिवाय, ज्या अराजपत्रित ग्रुप B कर्मचाऱ्यांना कोणताही वेगळा PLB बोनस मिळत नाही, तेसुद्धा या बोनससाठी पूर्णपणे पात्र ठरणार आहेत.
इतकेच नव्हे तर सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कॅज्युअल लेबर्सनाही निश्चित कामाच्या दिवसांची अट पूर्ण केल्यास या बोनसचा लाभ मिळणार आहे. मात्र, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसची वेगळी व्यवस्था असल्याने त्यांचा बोनस या योजनेपेक्षा वेगळा आणि स्वतंत्रपणे निश्चित केला जातो.
बोनस मिळवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्याने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान किमान 6 महिने सतत सेवा पूर्ण केलेली असावी. तसेच, 31 मार्च 2026 पर्यंत सेवेत असणे अनिवार्य आहे, तर 6 महिने ते 1 वर्षाच्या दरम्यान सेवेत असलेल्यांना प्रो-राटा (Pro-rata) तत्त्वावर बोनस दिला जाईल. जर एखादा कर्मचारी 31 मार्च 2026 पूर्वी सेवानिवृत्त झाला असेल किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असेल, तरीही त्याने वर्षात 6 महिने सेवा दिली असल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला बोनसचा लाभ मिळेल. बोनसची गणना करण्यासाठी महिन्याच्या पगाराची कमाल मर्यादा 7000 रुपये ठेवण्यात आली असून, त्या गणितानुसार जास्तीत जास्त 6908 रुपये बोनस खात्यात जमा होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.