
Bitcoin Price Today
अमेरिका: क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी सुरुच असून गुरुवारी (०५ नोव्हेंबर) बिटकॉइनने ऐतिहासिक उच्चांक गाठला. बिटकॉइन पहिल्यांदाच एक लाखांच्या पुढे गेला आहे. बिटकॉईनचा दर सध्या १०१, ४१९ डॉलर्सवर पोहोचला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात बिटकॉईनचा दर ८९,१७४ डॉलर्सवर पोहोचला होता. इथेरियमची किंमतही ७% ने वाढून ३,३७१.७९ डॉलर्स ऐवढी झाली होती. त्यानंतर जवळपास एका महिन्यातच बिटकॉईनने एक लाखाचा दर पार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत डिजिटल करन्सीसाठी अनुकूल नियम लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसाठी चांगले दिवस आल्याचे बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक रॅलीत क्रिप्टोकरन्सी नियमन आणि क्रिप्टो-अनुकूल प्रशासन बदलाचे आश्वासन दिले होते. ट्रम्प यांच्या अजेंड्यात यूएस बिटकॉइन रिझर्व्ह तयार करणे आणि देशांतर्गत क्रिप्टो मायनिंग वाढवणे यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या बदललेल्या रणनीतीचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला शिवाय त्यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरु झालेली तेजी अद्याप सुरुच असल्याचे दिसते.
भारतीय चलनात बोलायचे तर बिटकॉइनची किंमत ८७ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये झपाट्याने वाढ होत असून तिच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका परदेशी अहवालानुसार यूएस राष्ट्राध्यक्षांची सोशल मीडिया कंपनी क्रिप्टो ट्रेडिंग बक्कट खरेदी करण्याची तयारी करत आहे.
बिटकॉइन काय आहे? What Is Bitcoin
बिटकॉइन ही जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. करन्सी वर्षानुवर्षे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकत आहे. हे डिजिटल चलन 2008 मध्ये तयार करण्यात आले होते आणि 2009 मध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते. बिटकॉइन तयार करणारी व्यक्ती किंवा ग्रुप सातोशी नाकामोटो म्हणून ओळखला जातो. हे डिजिटल चलन वस्तू आणि सेवांच्या विनिमय मूल्यासाठी देखील वापरले जाते आणि हे चलन ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर कार्य करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.