नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हिमालयन योगी असल्याचं सांगणाऱ्या कथित व्यक्तीसोबत माहिती शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 2013 पासून NSE चे प्रमुख असलेल्या चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) (59) यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 24 फेब्रुवारी रोजी बाजारातील हेराफेरी आणि घोटाळ्यांबाबत चौकशी केल्यानंतर अटक केली होती.
वास्तविक, 2018 मध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांनी काही दलालांना फायदा देण्यासाठी निर्णय घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सी आता मार्केट एक्स्चेंजच्या कंप्यूटर सर्व्हरवरुन स्टॉक ब्रोकर्सपर्यंत माहिती लीक झाल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे, ज्याला "सह-स्थान घोटाळा" म्हणून ओळखले जाते.
दरम्यान, एजन्सी यापुढे आपली कोठडी मागू शकत नाही, असे सांगत चित्रा रामकृष्ण यांनी जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु सीबीआयने या याचिकेस विरोध केला आहे. त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलयं की, ''त्या एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांचा परदेश प्रवास आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास अद्याप सुरु आहे. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यावे."
तसेच, न्यायालयाने (Court) त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. मात्र घरगुती जेवण आणि इतर सुविधांसाठी त्यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले, "प्रत्येक कैदी सारखाच असतो. कारण ती व्हीआयपी कैदी असू शकत नाही. नियम बदलता येत नाहीत." मात्र, न्यायालयाने त्यांना प्रार्थनापुस्तक, हनुमान चालिसा आणि भगवद्गीतेची पुस्तिका आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.