

Central Government DA Hike 3 Percent Diwali Gift: दिवाळीपूर्वी मोदी सरकारने देशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली. बुधवारी (28 ऑक्टोबर) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला, ज्यामध्ये महागाई भत्त्यातील वाढीचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा होता. सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची घसघशीत वाढ करत 10,016 कोटी रुपयांच्या भत्त्याला मंजुरी दिली.
सरकारच्या या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60 टक्क्यांवरुन वाढून थेट 63 टक्क्यांवर पोहोचला. हा वाढलेला डीए 1 जुलै 2026 पासून लागू मानला जाईल, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होऊन त्यांना मोठी आर्थिक मजबूती मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या (Inflation) काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हा भत्ता मूळ वेतनाच्या ठराविक टक्केवारीनुसार दिला जातो.
कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत एकूण चार मोठे आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले. यातील पहिले दोन निर्णय देशातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला अधिक मजबूत करणारे आहेत. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि उत्पादनाला चालना मिळाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळेल.
विशेषतः आज कंटेनर निर्मितीच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याशिवाय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने खेळणी व खेळाचे साहित्य तयार करण्याची एक विशेष योजना देखील मंजूर केली.
या मालिकेतील तिसरा महत्त्वाचा निर्णय ग्रामीण भागातील क्षमता विकासावर केंद्रित असून, त्याचा मुख्य उद्देश स्थानिक पातळीवरील नियोजनाद्वारे विकास साधणे, स्थानिक समस्यांवर मात करणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे हा आहे. 'पंतप्रधान विकसित ग्राम स्वराज योजना' तळागाळातील वास्तववादी गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली. देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय गेम चेंजर ठरणार असून, याद्वारे स्थानिक संसाधने आणि आव्हाने ओळखून विकासाचे आराखडे तयार केले जातील.
ही पाच वर्षांची योजना असून यासाठी 7,395 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जाईल. तसेच, या योजनेच्या कक्षेत सुमारे 2.78 लाख ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था येतील. याशिवाय, अनेक आदिवासी क्षेत्रांमधील पारंपारिक स्थानिक निकषांनाही या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. चौथा आणि अंतिम निर्णय हा थेट 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांसाठी दिवाळीची खास भेट ठरला, ज्या अंतर्गत त्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत घसघशीत वाढ करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.