Air India Deal News: टाटा समूहाने आपल्या विमान कंपनीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. समूहाने एअर इंडियासाठी 250 विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. यामध्ये 40 मोठ्या आकाराच्या विमानांचा समावेश असेल. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
दरम्यान, विमान कंपनी आपले फ्लीट आणि ऑपरेशन्स वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या 17 वर्षांत एअर इंडिया विमान खरेदीची ऑर्डर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीखाली आल्यानंतर एअर इंडियाची ही पहिली ऑर्डर असेल.
टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन एअरबसकडून 40 मोठ्या आकाराची A350 आणि 210 लहान आकाराची विमाने खरेदी करणार आहे.
'ऑनलाइन' बैठकीत चंद्रशेखरन यांनी सांगितले की, या विमानांच्या खरेदीसाठी एअरबसशी करार पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
कंपनीने सांगितले की, 'मोठ्या आकाराचे विमान लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी वापरले जाईल.' 16 तासांपेक्षा जास्त कालावधीच्या फ्लाइटला लांब पल्ल्याच्या फ्लाइट्स म्हणतात.
टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीत एअर इंडियाचे अधिग्रहण केले. या अधिग्रहणानंतर टाटा समूह या एअर इंडियाला पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
एअरलाइन्सने 2005 मध्ये 111 विमानांच्या खरेदीसाठी शेवटची ऑर्डर दिली होती. त्यापैकी 68 विमाने बोईंगने आणि 43 एअरबसने मागवली होती. टाटा समूहाने 27 जानेवारी रोजी एअर इंडियाच्या अधिग्रहणाला एक वर्ष पूर्ण केले होते.
त्यावेळी, एअरलाइनने म्हटले होते की, भविष्यातील वाढीस चालना देण्यासाठी नवीन विमान खरेदीच्या ऐतिहासिक ऑर्डरला अंतिम रुप देत आहे. विमान कंपनीने Vihaan.AI अंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये परिवर्तनाचा रोडमॅप तयार केला आहे.
यावेळी, पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एअर इंडिया-एअरबस भागीदारी बैठकीला हजेरी लावली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे या मोठ्या करारासाठी अभिनंदन केले.
त्याचवेळी, मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना प्रिय नरेंद्र असे संबोधित केले आणि या नवीन भागीदारीच्या आमंत्रणासाठी त्यांचे आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.