Credit Suisse Bank Crisis: अमेरिकेतील बँका दिवाळखोर होत असतानाच आता युरोपातूनही एक बँक दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
क्रेडिट सुईस (CSGN.S) असे या बँकेचे नाव असून बुधवारी बँकेच्या मुल्यात एक चतुर्थांश घट होऊन ते नीचांकी पातळीवर आले आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
क्रेडिट सुईस (CSGN.S) बँकेतील सर्वात मोठा गुंतवणूकदाराने या स्विस बँकेला जास्त आर्थिक मदत देऊ शकत नाही, असे सांगितल्याने बुधवारी या बँकेच्या मुल्यात एक चतुर्थांश घट झाली.
सौदी नॅशनल बँकेचे अध्यक्ष अममार अल खुदैरी म्हणाले की, आम्ही करू शकत नाही, कारण आम्ही 10 टक्क्यांच्या वर जाऊ शकत नाही. ही नियामक बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
सौदी बँकेने गेल्या वर्षी क्रेडिट सुईस बँकेच्या भांडवल उभारणी योजनेत भाग घेतला होता आणि सुमारे 10 टक्के भागभांडवल विकत घेतले होते. यासह बँकेने 1.5 बिलियन डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचे वचन दिले होते.
दरम्यान, खुदैरी यांच्या वक्तव्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. क्रेडिट सुईसच्या मूल्यात 24 टक्क्यांच्या घसरणीमुळे सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर झाल्यानंतर जागतिक बँकिंग प्रणालीच्या ताकदीबद्दल गुंतवणूकदारांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
बुधवारी मॉर्गन स्टॅन्लेच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिस्पर्धी स्विस बँक यूबीएसचे मुख्य कार्यकारी राल्फ हॅमर्स म्हणाले की, अलीकडील बाजारातील अस्थिरतेचा बँकेला फायदा झाला आहे आणि पैशाचा ओघ वाढला आहे.
हॅमर्स म्हणाले की, गेल्या काही दिवसांत तुमच्या अपेक्षेप्रमाणे गुंतवणूक येत असल्याचे आम्ही पाहिले आहे. लोकांना सुरक्षा हवी आहे, असे स्पष्टपणे दिसते. पण तीन दिवसात कोणताही ट्रेंड तयार होत नाही.
क्रेडिट सुइसने मंगळवारी त्यांचा 2022 चा वार्षिक अहवाल प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बँकेने आर्थिक अहवालातील प्रमुख कमकुवत बाबी ओळखल्या आहेत. तरीही ग्राहकांचा ओघ कमी झालेला नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसात कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक बंद झाली. कॅलिफोर्नियाच्या आर्थिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.
त्यानंतर अमेरिकेतील सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच जागतिक बँकिंग व्यवस्थेवर आरिष्ट येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.