साखळी: गोव्यात सुमारे २५० डायलिसिस युनिट असणे ही चिंताजनक बाब आहे. आपल्यावर डायलिसिसची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोव्यात सुमारे २५० डायलिसिस केंद्रे असूनही डायलिसिस रुग्णांना प्रतीक्षेत रहावे लागत आहे. त्यावरूनच या आजाराचे रुग्ण किती प्रमाणात झपाट्याने वाढत आहे याची जाणीव येते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवताना व्यायामही करावा. आरोग्याच्या काळजीबाबत आज युवापिढीबरोबर ज्येष्ठ नागरिकही गंभीर नसल्याने असे आजार वाढत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे सांगितले.
साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. डायलिसीस युनिटचे उद्घाटन ही आनंददायी बाब असली तरी डायलिसीस रुग्णांची वाढ ही चिंताजनक बाब आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, आरोग्य संचालिका डॉ. वंदना धुमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम देसाई, साखळीचे आरोग्याधिकारी डॉ. अतुल पै बीर, अपेक्स किडनी सेंटरचे अधिकारी डॉ. शीतल लिंगड, कुडणेचे सरपंच बाबला मळीक आदींची उपस्थिती होती.स्वागत डॉ. अतुल पै बीर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैभवी बर्वे यांनी केले.
गेल्या दहा वर्षांपूर्वी गोमेकॉत एकच डायलिसिस युनिट होते व त्यातून मोजकेच दहा लोक डायलिसिस घेत होते. परंतु आज प्रत्येक तालुक्यात डायलिसिस युनिट सुरू करावे लागत आहे. आपला या डायलिसिस युनिटवर क्रमांक लागू नये यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी आपले आरोग्य सांभाळताना आपणास आजार होऊ नये यासाठी आमच्या सरकारी इस्पितळातील वेलनेस क्लिनिकमधून आपल्या दिनचर्येचे मार्गदर्शन घ्यावे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
अती खाणे व व्यायाम नाही, याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. एकदा आपले मूत्रपिंड निकामी झाले, तर पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाही. नंतर केवळ डायलिसिस हा एकच उपाय. मधुमेह हे आज वयोमानाप्रमाणे जास्तच वाढू लागले आहे. त्यामुळेच मूत्रपिंड विकार वाढू लागले आहेत. लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपल्यावर मधुमेह व नंतर मूत्रपिंड विकारामुळे डायलिसिसची वेळ येऊ नये यासाठी गंभीर व्हावे, असे आरोग्य संचालिका डॉ. वंदना धुमे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.