Drama  Dainik Gomantak
मनोरंजन

‘सौ’ : यमुनाबाई सावरकरांच्या अंतर्मनाचा उलगडा करणारे नाट्य

दैनिक गोमन्तक

माईंचे लग्न होऊन ती सावरकरांच्या देशभक्तीने ओथंबून वाहणाऱ्या घरात राहायला येते. घरात दोन दीर आणि मोठ्या भावजयी समवेत ती देशभक्तीचे धडे घेऊ लागते. सावरकर पुण्याला शिक्षणासाठी (Education) जातात. पुढे उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याचे ठरते. मुलगा प्रभाकरचा जन्म होतो. विनायकराव सावरकर स्वातंत्र्य संग्रामातील ब्रिटिश (British) विरोधी कारवायांमुळे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगतात.

मुलगा प्रभाकरचा अंत आणि पती दूर असल्यामुळे वैयक्तिक जीवनात अंधार असलेल्या माई, कुटुंब सावरण्यात आणि देशभक्तीच्या कार्यात झोकून देतात. त्यांच्या कुटुंबातील दीर, भावजय यांचे निधन झाल्यावर सुद्धा त्या देशभक्ती पासून दूर हटत नाहीत. त्यांच्या अंतर्मनात पतीबद्दल अत्यंत प्रेम व जिव्हाळा असतो. विनायक सावरकर (Savarkar) अंदमानातून आल्यानंतर त्यांच्याबरोबर अल्प काळाचे सहजीवन जगून त्या जगाचा निरोप घेतात.

सावरकर घराण्याच्या देशभक्तीचे यथार्थ दर्शन नाटकात (Drama) घडविण्यास लेखक स्मिता जांभळे आणि आदित्य जांभळे यशस्वी झाले आहेत. मानवी मनांचे कंगोरे, मानवी प्रवृत्ती तसेच मानवी विकृतींचे पण दर्शन नाटकात झाले आहे. सावरकर कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, उद्भवणारे प्रश्न, वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या मांडण्यात ‘लेखक’ आदित्य जांभळेना दिग्दर्शक आदित्य जांभळे यांची अचूक साथ लाभली आहे. स्वतःचे कुटुंब सावरताना सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या वैयक्तिक चित्रणाबरोबर, त्यांच्या ठायी भरभरून वाहणारे देशप्रेम नाटकात मांडण्यास दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.

सावरकर कुटुंबातील सदस्यांमधील स्फुट-अस्फुट संघर्ष, नातेसंबंध, परिस्थिती, सावरकर कुटुंबाप्रति असलेले समाज मन आणि माईंच्या अंतरमनातील प्रव्रुती वेगवेगळ्या प्रसंगातून त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यातून ठळकपणे मांडल्या आहेत. नाटक यशस्वी करण्यासाठी त्यांनी माईच्या आयुष्यातील दुर्दैवी प्रसंगांचे आणि संकटांचे दर्शन घडवून अचूक नाट्योपरोध साधल्याचे दिसून आले. प्रेक्षकांच्या मनाला पटणारे घटना-प्रसंग रचून त्यांची उत्कंठा आणि विस्मय प्रयोगाच्या सादरीकरणात जपल्याचे दिसते.

‘सौ’ या नाटकाच्या कथानकाची रचना उत्कर्ष प्रधान असल्यामुळे सोफक्लीजच्या ‘ इडीपस रेक्स’ नाटकाप्रमाणे सुरुवात नाटकाच्या उत्कर्षबिंदूच्या जवळ, सावरकरांच्या माईंच्या संदूकातील हस्तलिखिताचे वाचन करताना होते आणि भूतकाळातल्या, माईना पाहायला तिच्या घरी गेलेल्या प्रसंगापासूनच्या घटनांचा उलगडा होत जातो.

नाटकात निवडलेल्या प्रसंगावरून नाटक अपेक्षित परिणाम साधत असताना ते अधिक सोपे करून सांगण्याच्या निवेदनांची गरज नव्हती असे वाटते. तसेच भुतपूर्व काळातून वर्तमान काळात परत परत न आल्यास उत्कर्ष प्रधानतेच्या रचनेत अधिकच भर पडली असती. शेवटच्या प्रसंगात सावरकरांना प्रेक्षागृहात बसवून त्यांच्या सोबत एक स्त्री ‘फोलो स्पॉट’ मध्ये दाखवण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. तसेच नाटकाच्या ‘क्लायमॅक्स’ नंतर घडलेल्या घटनांची परिणती होऊन नाटक पूर्णत्वाला पोहोचल्यानंतर सुद्धा, सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी योजलेले नाटकाचे शेवटचे दृश्य अनावश्यक वाटले.

तात्यारावची भूमिका आदित्य जांभळे यांनी व्यक्तिरेखेतील बारकाव्यांनिशी सादर केली. त्यांची देहयष्टी पात्राला शोभून दिसली. धीरगंभीर नाटकातील, देशभक्ती वरील मूल्यात्मक चिंतन, विशिष्ट प्रसंगातील निर्णय व कृती, त्यांच्या अभिनयातून अचूकपणे व्यक्त झाल्या. माईची मध्यवर्ती भूमिका तन्वी देसाई जांभळे यांनी समर्थपणे आणि समरसतेने साकारली. त्यांनी माईचा जीवनविषयक दृष्टिकोन, कौटुंबिक संबंध, स्वभावजन्य लकबी, इच्छा-आकांक्षा, आर्थिक, सामाजिक आणि देशभक्ती, या विषयांवर सखोल चिंतन करून अभिनयाची छाप पाडली.

स्मृती देसाई जांभळे यांनी येसू वहिनीच्या भूमिकेला न्याय देत, व्यक्तिरेखेला अपेक्षित कृती– उक्ती, देह रूपाचा तपशील, स्वभावविशेष, यांचा बारकाईने अभ्यास केल्याचे दिसून आले. विनायक सावरकरांच्या देशभक्तीला आणि क्रांतीला प्रोत्साहन देणारे व स्वतः क्रांतिकारक असलेल्या त्यांच्या मोठ्या भावाचे बाबारावांचे पात्र व्यंकटेश गावणेकर यांनी बारकाव्यानिशी उभे केले. तसेच या दोघाही भावांना अपेक्षित साथ देणाऱ्या बाळारावांची भूमिका सोहन शिकेरकर यांनी यशस्वीपणे सादर केली.

सुविधा तोरगल बखले शांताच्या भूमिकेत शोभून दिसल्या. नीता देसाई यांनी कस्तुरबाचे पात्र साकारले. कुणाल देसाई (अनंत कान्हेरे), सर्वेश जोशी (विश्वास), रघुनाथ साकोर्डेकर (भाऊराव), ममता टेंगसे (आई), अभिजीत जांभळे, गौतम बखले (पोलीस), गणेश भट (अण्णा शिधये) आणि इला जांभळे (बाल प्रभाकर) यांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका यशस्वीपणे सादर केल्या.

नाटकातील सहकलाकार होते डॉक्टर संतोष देसाई, दिलीप देसाई, काशिनाथ सराफ, दयानंद नाडकर्णी, रिया साकोर्डेकर, सोहा साकोर्डेकर, दीपा जांभळे आणि ऋचा उपाध्ये. नाटकाचे नेपथ्य अभिजित जांभळे आणि कुणाल देसाई यांनी बारकाव्यांनिशी उभारले. सावरकरांच्या घराच्या भल्यामोठ्या सेटवरून त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या प्रभावीपणाचे दर्शन झाले. खंडीत स्वरुपात दाखवलेले नेपथ्याचे भाग, खिडक्या, दारे, कैद तसेच नाटकात वापरलेल्या वस्तूंचा बारकाईने विचार केल्याचे दिसले.

श्रीनिवास उसगावकर यांची प्रकाश योजना अपवादात्मक प्रसंगात पात्रांच्या चेहऱ्यावरील काळोख वगळता ठीक होती. तरीही हाताळणीत दोष आढळले.प्रयोग चालू असताना ‘स्पॉट’ चालू करुन पाहण्याचा मोह आवरल्यास बरे झाले असते. अमोघ बर्वे यांनी पार्श्वसंगीतात काही ठिकाणी सावरकरांच्याच काव्याचा अणि नाट्यगीतांचा सुंदर उपयोग केला. पण बऱ्याच ठिकाणी पार्श्वसंगीत ‘लाउड’ झाल्याचे दिसले.

रंगभूषा- दास कवळेकर, वेशभूषा- नीता देसाई आणि निर्मिती प्रमुख दिलीप देसाई. सादरकर्ती संस्था - अथश्री, फोंडा.

- विकास कांदोळकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT