Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Bits pilani student death: सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुशाग्र जैन (वय २० वर्षे) हा शनिवारी आपल्या खोलीतील पलंगावर मृतावस्थेत आढळला.
bits pilani student death
bits pilani student deathDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुशाग्र जैन (वय २० वर्षे) हा शनिवारी आपल्या खोलीतील पलंगावर मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला असून प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले. मात्र, याप्रकरणी सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला आहे.

शवचिकित्सानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. यापूर्वी डिसेंबर २०२४ ते मे २०२५ यादरम्यान बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण कॅम्पस हादरून गेला होता.

त्यावेळी तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या प्रकरणांचा अहवाल मागितला होता. त्यानंतर बिट्स पिलानी व्यवस्थापक मंडळाने कॅम्पसमध्ये बऱ्याच सुविधा व सुधारणा केल्या होत्या. याप्रकरणी वेर्णा पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

नातेवाईक गोव्यात दाखल

काहींच्या मते, कुशाग्रचे वडील शुक्रवारी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुशाग्र याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना कळविल्यावर काही नातेवाईक गोव्यात पोचले आहेत.

उपाययोजना करूनही प्रकार सुरूच

तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनंतर बिटस पिलानी कॅम्पसच्या व्यवस्थापनाने काही पाऊले उचलीत आहेत. जे विद्यार्थी तणावाखाली असतील, त्यांना परीक्षा नंतर देण्याची मुभा दिली होती. अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचीही घोषणा केली होती. विद्यार्थीविषयक उपाययोजनही हाती घेतल्या होत्या.

विविध शैक्षणिक सामग्री सुव्यवस्थित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक मानसशास्त्रांसह विस्तारीत समुपदेशन सेवा, २४ x ७ हेल्पलाईन, मानसिक आरोग्य प्रथमोपचारात प्रमाणित प्रशिक्षित प्राध्यापक व वॉर्डन यांचा समावेश, समवयस्क आणि प्राध्यापक समर्थन गट, विद्यार्थ्यांची काळजी, चिंता दूर करण्यासाठी प्राध्यापकांशी थेट संवाद, सुधारित क्रीडा सुविधा, व्यायाम, वसतीगृहातील कॉमन रुममध्ये वातानुकूलीत सुविधा,

२४ x७ वाचन कक्ष, विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पाठिंबा, परिषदा व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे, शैक्षणिक व वैयक्तिक समस्या ऐकण्यासाठी मंडळ यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यासंबंधी पाऊले उचलण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

यापैकी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करण्यात आल्याचे समजते. समवयस्क गट स्थापल्याने विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले होते. त्यांच्याविषयी माहिती मिळू लागली होती. सीसीटीव्हीची सोय केल्याने पोलिसांनाही तपास करण्यास मदत होणार आहे.

तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे गूढ

डिसेंबर २०२४ मध्ये ओम प्रिया सिंग नावाच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याने  आत्महत्या केली  होती. ओम हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो बीई कॉम्प्युटर सायन्स आणि एमएससी केमिस्ट्रीमध्ये दुहेरी पदवी घेत होता.

मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई या २० वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. अथर्व थर्ड इयरचा विद्यार्थी होता आणि दुहेरी पदवी घेत होता.

मे २०२५ मध्ये वीस वर्षीय कृष्णा कासेरा याचा मृतदेह हॉस्टेलच्या खोलीच्या खिडकीला लटकलेला आढळला. तो सेकंड इयरचा विद्यार्थी होता. या तीन आत्महत्यांनंतर बिट्स पिलानी व्यवस्थापक मंडळाने काही महत्त्वाची पावले उचलली होती. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

...असा झाला घटनेचा उलगडा

१ बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये यापूर्वी झालेल्या तीन आत्महत्या प्रकरणांमुळे व्यवस्थापन मंडळाने प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा समावेश असलेले समवयस्क गट निर्माण केले आहेत. या गटाचा प्रमुख तसेच इतर एकमेकांच्या संपर्कात असतात.

२शनिवारी (ता. १६) सकाळी कुशाग्र नजरेस न पडल्याने तसेच त्याच्याकडून मोबाईलवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना माहिती दिली. त्यानंतर तेथे धावपळ सुरू झाली.

३ त्याच्या खोलीचे दार ठोठावले; परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कोणीतरी व्हेंटिलेटरच्या झडपेतून डोकावून पाहिले असता, कुशाग्र आपल्या पलंगावर निपचित पडल्याचे दिसून आले.

४ त्यावेळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. सोबत असलेल्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, तो मृत झाल्याचे दिसून आले.

नावाप्रमाणेच होता ‘कुशाग्र’

कुशाग्र जैन हा मूळचा लखनौचा (उत्तर प्रदेश) होता. कॅम्पसमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारा कुशाग्र हा नावाप्रमाणे बुद्धीने कुशाग्र होता. त्याला मागील सेमिस्टरमध्ये चांगले गुण मिळाले होते, असे सांगण्यात आले. लवकरच पुढील सेमिस्टरचे वर्ग सुरू होणार असल्याने तो कॅम्पसमध्ये परतला होता. अद्याप वर्ग सुरू न झाल्याने अभ्यासाचा वा मानसिक तणावाचा प्रश्न नव्हता. हॉस्टेलच्या खोलीत राहणारा कुशाग्र हा शुक्रवारी रात्री बराच वेळ जागा होता, अशी माहिती मिळाली.

bits pilani student death
BITS Pilani: परीक्षेच्या तोंडावर 3 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन, 'बिट्स पिलानी' प्रकरणी राज्यपाल पिल्लईंनी मागितला अहवाल

व्यवस्थापनाकडून चौकशीस सहकार्य

बिट्स पिलानी, के. के. बिर्ला गोवा कॅम्पसने या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. कुशाग्रच्या मृत्यूविषयी पोलिसांना कळविले आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. एका तरुणाचे निधन ही कधीही भरून न येणारी दुर्घटना असून संपूर्ण कॅम्पस समुदायाला धक्का बसला आहे. कुशाग्रच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

bits pilani student death
BITS Pilani: 3 विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्यावर ‘बिट्स पिलानी’चे व्यवस्थापन नरमले!अभ्यासक्रमात होणार सुधारणा, परीक्षेत सवलत

अभ्यासक्रमाचा फेरविचार करा : युरी

अभ्यासाच्या दडपणामुळे गेल्या तीन वर्षांत राज्यात नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्य सरकारने अभ्यासक्रमाचा फेरविचार करून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. या संस्थेव्यतिरिक्त राज्यात आणखी पाच घटना घडल्या आहेत, याकडेही आलेमाव यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com