बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने मुंबईतील धावपळीचं आयुष्य सोडून गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे पाच वर्षांपूर्वी ती आपल्या कुटुंबासह गोव्यात राहायला गेली. मुंबईची झगमगती दुनिया मागे सोडून तिने निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन जगण्याला पसंती दिली. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या गोव्यातील घराची आणि हिरव्यागार बागेची झलक दाखवत असते. अलीकडेच अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनीही आपल्या कुटुंबासह समीरा हिच्या घरी भेट दिली होती. यावेळी त्यांनी तिच्या घराचा होम टूर केला. घराभोवती असलेली हिरवळ आणि फळांनी लगडलेली झाडं पाहून अर्चना आणि त्यांचं कुटुंबही भारावून गेलं.
समीरा रेड्डीचं गोव्यातील घर सुमारे ४ हजार स्क्वेअर फूट परिसरात वसलेलं आहे. या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आजूबाजूला असलेली दाट हिरवळ आणि विविध प्रकारची झाडं.
बागेत नारळ, काजू, चिकू, केळी, बांबू, कडुलिंब आणि अॅव्होकॅडोची झाडं आहेत. या बागेत उगवणाऱ्या फळांचा आणि इतर गोष्टींचा समीरा वापरही करते. अर्चना पूरण सिंह यांच्याशी संवाद साधताना तिने सांगितलं की, सुरुवातीला ती केवळ दहा दिवसांसाठी गोव्याला आली होती. मात्र, इथलं वातावरण आणि जीवनशैली इतकी आवडली की तिने मुंबईत परत न जाण्याचा निर्णय घेतला आणि गोव्यालाच आपलं घर बनवलं.
गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीचे दिवस समीरासाठी थोडे आव्हानात्मक होते. शहरात राहण्याची सवय असल्यामुळे आजूबाजूला फारशी वस्ती नसलेल्या परिसरात जुळवून घेणं तिला कठीण गेलं. घराच्या आसपास दूरपर्यंत इमारती किंवा शहरासारखी गजबज नव्हती.
एवढंच नाही, तर या घरात राहायला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला साप दिसला होता. त्यामुळे ती घाबरली होती. मात्र, हळूहळू तिला या निसर्गरम्य वातावरणाची सवय झाली. गोव्यात आल्यानंतर तिच्या जीवनशैलीतही बदल झाला. पूर्वी घरातील कामांबाबत फारसे कष्ट न घेणाऱ्या समीराने झाडू-पोछा करण्यापासून घरातील विविध कामं स्वतः करणं शिकून घेतलं. शहरातील आरामदायी जीवनापेक्षा साधेपणा आणि निसर्गाच्या जवळ राहणं तिला अधिक आवडू लागलं.
समीरा रेड्डीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती यावर्षी १५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आखिरी सवाल’ या चित्रपटात दिसली होती. संजय दत्त प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात नमाशी चक्रवर्ती, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांच्याही भूमिका आहेत. अभिजीत मोहन वारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हा चित्रपट राजकीय विषयावर आधारित असून, त्यात संजय दत्त यांनी प्राध्यापक गोपाल नाडकर्णी यांची भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच समीरा सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या गोव्यातील घराची आणि निसर्गरम्य जीवनशैलीची झलक चाहत्यांना आवडत असून, शहरातील धावपळ सोडून शांत जीवन जगण्याचा तिचा निर्णय अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.