karan johar virat kohli statement: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर त्याच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' मुळेही नेहमी चर्चेत असतो. या शोच्या सोफ्यावर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असली तरी, एका मोठ्या स्पोर्ट्स स्टारने या शोपासून नेहमी अंतर का ठेवले आणि ते का याचा खुलासा खुद्द करण जोहरने केलाय.
नुकत्याच सानिया मिर्झासोबतच्या एका मुलाखतीत बोलताना करणने स्पष्ट केले की, विराट कोहलीने आजवर 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी का लावली नाही. करण जोहरने सांगितले की, त्याने कधीही विराट कोहलीला शोमध्ये येण्यासाठी विचारणा केली नाही.
यामागील कारण सांगताना तो म्हणाला, "मी कधीही विराटला विचारले नाही आणि आता तर, हार्दिक आणि केएल राहुलसोबत जे काही झाले, त्यानंतर मी कोणत्याही क्रिकेटपटूंना विचारत नाहीये." करणने पुढे जोडले की, अनेक स्पोर्ट्स स्टार्स आहेत ज्यांना विचारले तरी ते येणार नाहीत, असे त्याला वाटले म्हणून त्याने त्यांना विचारलेच नाही.
२०१९ मध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दोघांनाही प्रचंड टीका आणि वादाचा सामना करावा लागला होता. हार्दिक पंड्याने महिलांबद्दल काही विवादास्पद आणि अनुचित टिप्पणी केली होती.
त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही किस्से शेअर केले होते, ज्यात महिलांशी असलेल्या संबंधांबद्दलची त्याची विधाने होती. विशेषतः 'वेस्ट इंडियन प्लेयर्स आणि ब्लॅक कल्चर' मधून महिलांशी कसे वागावे हे शिकल्याचे विधान त्याने केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
प्रकरण वाढल्यानंतर प्रशासकीय समितीने दोघांकडून स्पष्टीकरण मागवले. हार्दिकने इंस्टाग्रामवर माफी मागितली, पण बीसीसीआयने त्याची दखल घेतली नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार दोघांवर गैरवर्तन आणि गैरशिस्तीचा आरोप ठेवत त्यांना तात्पुरते निलंबित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून त्यांना वगळण्यात आले आणि दोघांनाही प्रत्येकी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
या संपूर्ण वादानंतर करण जोहरने आपण या सर्व परिणामांसाठी जबाबदार असल्याचे मान्य केले होते. करण जोहर म्हणाला होता, "मला हे सांगावेच लागेल की मी स्वतःला खूप जबाबदार मानतो, कारण तो माझा शो आणि माझे व्यासपीठ होते. मी त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते आणि त्यामुळे शोचे जे काही परिणाम झाले, त्याची जबाबदारी माझी आहे."
या सर्व प्रकारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करावी या विचाराने आपल्याला अनेक रात्री झोप लागली नाही, असेही करणने त्यावेळी सांगितले होते. याच कारणामुळे आता करण जोहर क्रिकेटर्सना शोमध्ये आमंत्रित करणे टाळत आहे, ज्यामुळे विराट कोहलीही या ग्लॅमरस 'कॉफी सोफा'पासून दूर राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.