K-Pop Artist Sriya: भारताच्या श्रेया लेंकाने अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि कठीण ऑडिशन्सनंतर अखेर इतिहास रचला आहे. 18 वर्षीय श्रेया दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध बँड 'ब्लॅकस्वान' ची पाचवी सदस्य बनली आहे. या विशेष कामगिरीबद्दल श्रेया म्हणाली, 'एक स्वप्न पूर्ण झाले आहे. ते खूप मोलाचे आहे.' (first k pop artist india sriya lenka has made history by becoming the fifth member of the popular south korean band blackswan)
दरम्यान, श्रेयाने अलीकडेच झूम कॉलद्वारे मीडियाशी संवाद साधला आहे. यादरम्यान तिने आपल्या रंजक प्रवासाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. प्रदीर्घ आणि कठीण ऑडिशननंतर श्रेयाची या बँडमध्ये निवड झाली आहे. श्रेया ही पश्चिम ओडिशातील (Odisha) सुंदरगढ जिल्ह्यातील राउरकेलामधील आहे. गेल्या आठवड्यात तिची ब्राझीलच्या (Brazil) गॅब्रिएला डॅलसिनसोबत बँड करण्यासाठी निवड झाली आहे. बँडचे मूळ सदस्य यंगह्यून, फाटौ, जुडी आणि लेआ आहेत.
आयुष्याची दिशा बदलली
या विजयाबद्दल श्रेया म्हणाली, 'माझे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. निवड होणे हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे, त्यामुळे माझ्या आयुष्याचा मार्ग बदलला आहे. जागतिक व्यासपीठावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. सहा महिन्यांच्या ऑडिशननंतर लेंका आणि दलसिन यांची निवड झाली.'
बँडमध्ये एक रिकामी जागा होती
बँडमध्ये नवीन सदस्याचा समावेश करण्याची घोषणा गेल्या वर्षी हाईमी या सदस्यांपैकी एक सोडून गेल्यानंतर करण्यात आली होती. विशेष म्हणजे, श्रेया आणि दलसिन या दोघींनाही वाटले नव्हते की, बँडमध्ये एकच जागा शिल्लक असल्याने त्यांना एकत्र संधी मिळेल. झूम कॉलवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रेया म्हणाली की, पूर्वी आम्हाला फक्त एकच जागा रिक्त आहे हे माहित होते, त्यामुळे आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. श्रेया पुढे म्हणाली की, आमची मैत्री झाल्यामुळे दलसिनशी स्पर्धा करणे खरोखरच कठीण होते. श्रेया म्हणाली, 'आम्ही एकत्र राहतो, एकत्र जेवतो आणि सराव करतो. ती माझ्या कुटुंबातील सदस्यासारखी आहे. त्यावेळीही फक्त आम्ही दोघीच एकमेकांसोबत होतो.'
मित्रांकडून माहिती मिळाली
श्रेया ही प्रशिक्षित नर्तक आहे. काही वर्षांपूर्वी तिला तिच्या मित्रांकडून के-पॉपबद्दल माहिती मिळाली. श्रेया म्हणते की, मी बँडच्या गायन आणि नृत्य शैलीच्या लगेच प्रेमात पडली. 2020 मध्ये, जेव्हा समजले की, कोविड-19 (Covid-19) महामारीमुळे ऑनलाइन ऑडिशन सुरु आहेत, तेव्हा मी ऑडिशन देण्याचा निर्णय घेतला. श्रेया पुढे म्हणाली, 'हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल आणि इतके सेलिब्रिटी माझ्याबद्दल पोस्ट करतील, असे कधीच वाटले नव्हते.'
पप्पांनी उत्साह वाढवला
श्रेया आणि दलसिन यांचे प्रशिक्षण डिसेंबरमध्ये सोलमध्ये सुरु झाले होते. के-पॉप सदस्य होण्यासाठी प्रत्येक पैलू परिपूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. यादरम्यान श्रेयाला कोरियन भाषा, नृत्य, गाणे, रॅपिंग आणि प्रत्येक बाबतीत स्वत:ला बळकट करावे लागले. श्रेया म्हणते, 'हे सर्व कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे घडले. या संपूर्ण प्रक्रियेत पप्पांचे खूप सहकार्य होते. ते नेहमी माझ्या चुका सांगायचे. नेहमी म्हणायचे, 'स्वतःवर आणि तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेव. वाईट वेळ आली तर चांगली वेळ नक्कीच येईल.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.