PM Modi : शिर्डी, ‘महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते अनेक वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होते. ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले?,’ असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.
त्यांच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते, तर आमचे सरकार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांत वेळेवर पैसे जमा करते, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.
भाजपच्या वतीने शिर्डीजवळील काकडी येथे आयोजित विविध सरकारी योजनांचे लाभार्थी व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मोदी बोलत होते.
पंतप्रधानांनी त्यांच्या या दौऱ्यात निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ यासह १४ हजार कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले.
यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. तत्पूर्वी मोदी यांनी शिर्डी येथील साई मंदिरात जात दर्शन घेत पूजाही केली.
मोदी म्हणाले, ‘‘राज्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी व्यक्तिगत सन्मान करतो. ते बरीच वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांच्या काळात ‘एमएसपी’चे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते.
त्यांच्या काळात शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांची हमी भावाने धान्य खरेदी झाली होती. आम्ही केवळ नऊ वर्षांत तब्बल साडेतेरा लाख कोटी रुपयांची हमीभावाने धान्य खरेदी केली. त्यांचे सरकार शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नव्हते. आमचे सरकार वेळेवर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करते.’’
महाराष्ट्रात अपार सामर्थ्य असल्याचे सांगत मोदी म्हणाले,‘‘महाराष्ट्र विकसित होईल, तसा देश विकसित होत जाईल. २०४७ साली भारत महासत्ता होईल. जनतेला गरिबीतून मुक्ती मिळाली हाच खरा सामाजिक न्याय आहे. आमचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ करत आहे.
वाढत्या अर्थव्यवस्थेबरोबरच गरिबांच्या कल्याणकारी योजनांवरचा खर्च देखील वाढवत आहोत. पूर्वी लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ऐकावे लागायचे. आमच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपये विकास कामांवर खर्च होत आहेत.’’
या कामांचे लोकार्पण
श्री साईबाबा संस्थानच्या नवीन दर्शनबारीचे लोकार्पण
निळवंडे धरणाचे लोकार्पण, जलपूजन
नगरच्या आयुष मंत्रालयाचे लोकार्पण
इंडियन ऑईलच्या टर्मिनलचे लोकार्पण
माता शिशू हॉस्पिटलचे उद्घाटन
जळगाव ते भुसावळ रेल्वे लाइनचे उद्घाटन
सांगली-सोलापूर रस्त्याचे उद्घाटन
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ
आयुष कार्डचा प्रारंभ व प्रातिनिधीक स्वरूपात तीन जणांना वाटप
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.