Mumbai-Goa Train Update: तुम्ही मुंबई-गोवा दरम्यान तेजस एक्सप्रेस किंवा जन शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमच्या प्रवासाच्या प्लॅनचा पुनर्विचार करावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरु असलेल्या प्लॅटफॉर्म अपग्रेडेशनमुळे या दोन्ही गाड्या तात्पुरत्या कालावधीसाठी सीएसएमटीऐवजी दादर येथे थांबणार आहेत.
दरम्यान, सीएसएमटी स्थानकामध्ये सुरु असलेले कामामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. स्टेशनवरील वाढत्या प्रवाशांच्या (Passenger) गर्दीला सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म 12 आणि 13च्या विस्ताराचे काम सुरु आहे.
सध्या, तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22120) आणि जन शताब्दी एक्सप्रेस (ट्रेन क्र. 12051), ज्या सीएसएमटी येथून प्रवास सुरु करतात आणि संपवतात त्यांचे अंतिम स्थानक काही कालावधीसाठी दादर असणार आहे. हा तात्पुरता बदल 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, गाड्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणाहून सुटतील आणि थांबतील. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची. याशिवाय, मुंबईत (Mumbai) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, जसे की लोकल ट्रेन, टॅक्सी किंवा इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागेल.
दादर स्थानक जे आधीच जास्त गर्दीसाठी ओळखले जाते, या काळात येथे आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आश्वासन दिले आहे की, गर्दीचे योग्यरित्या व्यवस्थापन केले जाईल. दादर येथे वाढत्या वाहतुकीमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांना ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा तपासण्याचे आणि संभाव्य विलंबासाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, कोणत्याही समस्यांसाठी रेल्वे कर्मचारी आणि हेल्पलाइन मदतीसाठी उपलब्ध आहेत, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
तात्पुरत्या बदलामुळे अल्पकालीन आव्हाने निर्माण होऊ शकतात, परंतु मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमध्ये दीर्घकालीन सुधारणांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. प्रवाशांना आशा आहे की, काम लवकर पूर्ण होईल आणि लवकरच सामान्य सेवा पूर्ववत होईल. दरम्यान, तेजस एक्सप्रेस आणि जन शताब्दी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियोजन करावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.