Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

Mumbai Goa Highway: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर आता एका मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने उपहासात्मक व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आहे. त्याच्या व्हिडिओने आणि गाण्याने लाखो लोकांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

देशात एका बाजूला बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहिले जात असताना आणि एक्सप्रेस वेचे जाळे विणले जात असताना, दुसरीकडे गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम का रखडले आहे, असा सवाल त्याने या व्हिडिओतून विचारला आहे. महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य, कंत्राटदारांची संथ गती, वाहतूक कोंडी आणि विशेषतः पावसाळ्यात होणारी दुरवस्था याकडे त्याने थेट आणि प्रभावी भाषेत लक्ष वेधले आहे.

खड्ड्यांवर उपहासात्मक गाणे आणि ‘चंद्रा’ची उपमा

दरम्यान, या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएन्सरने महामार्गाच्या दुर्दशेवर उपहासात्मक गाणे तयार केले आहे. त्या गाण्याचे शब्द लोकांच्या काळजाला भिडणारे आहेत. तो म्हणतो, “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं, याला कंत्राटदार हसतो कसा कोकणकर पडला गं…”. या गाण्यातील ‘चंद्रावाणी’ या शब्दाचा वापर करुन त्याने महामार्गावरील खड्ड्यांना चंद्रावरील खड्ड्यांची उपमा दिली आहे. यामुळे रस्त्याची भयानक अवस्था किती वाईट आहे, हे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

हे गाणे केवळ मनोरंजक नाही, तर ते कोकणवासीयांच्या वर्षानुवर्षांच्या वेदना आणि उपहासात्मक संतापाचे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी, सणासुदीच्या काळात, लाखो लोक याच महामार्गावरुन प्रवास करतात आणि याच खड्ड्यांचा सामना करतात. या प्रश्नावर सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, पण परिस्थिती तशीच राहते, ज्यामुळे लोकांचा संताप वाढला आहे.

‘यांनी कमावलं, म्हणून रस्ता झाला नाही…’

व्हिडिओमध्ये इन्फ्लुएन्सरने या समस्येसाठी थेट कंत्राटदार आणि राजकारण्यांवर आरोप केले आहेत. “ज्यांच्यामुळे हा महामार्ग रखडला आहे, ते कमवत आहेत. कंत्राटदार कमवत आहेत,” असे तो ठामपणे सांगतो. त्याच्या मते, महामार्ग पूर्ण न होण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येते. अनेक कंत्राटदारांनी अर्धवट कामे सोडून दिली, निधीचा गैरवापर झाला आणि त्याबद्दल कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनाच यातून फायदा झाला असावा, अशी शंका तो व्यक्त करतो.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम हे केवळ वाहतुकीची समस्या नाही, तर ते कोकणच्या विकासाला मिळालेला एक मोठा अडसर आहे. शेतीमाल, पर्यटन (Tourism) आणि स्थानिक उद्योगांना यामुळे मोठा फटका बसत आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा महामार्ग जलमय होतो, खड्ड्यांनी भरतो आणि प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे कोकणवासीयांना केवळ कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही, तर त्यांचे आरोग्य आणि सुरक्षाही धोक्यात येते.

"आणखी 50 वर्षे रस्ता झाला नाही, तर नक्कीच अमेरिकेला टक्कर देऊ"

तसेच, या व्हिडिओचा शेवटचा भाग सर्वाधिक उपहासात्मक आणि मार्मिक आहे. महामार्गाचे काम 15 वर्षांपासून पूर्ण झाले नसतानाही भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने चालला आहे, यावर तो जोरदार टीका करतो. उपहासात्मकपणे तो म्हणतो, “गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग बनला नाही, तेव्हा कुठे आपला देश महासत्ता बनायला चालला आहे. पण, आणखी 50 वर्षे रस्ता झाला नाही ना, तर नक्कीच अमेरिकेला टक्कर देऊ.”

त्याच्या या विधानाने अनेकांना हसू आवरता आले नाही, पण त्याचवेळी या वाक्यामागील वेदना सर्वांना समजली. हा विनोद केवळ विनोद नसून, तो एका मोठ्या निराशेचा आणि प्रश्नाचा भाग आहे. जर देशात मूलभूत सोयीसुविधांचे कामही 15 वर्षांत पूर्ण होत नसेल, तर इतर मोठ्या स्वप्नांची पूर्तता कशी होईल, हा सवाल त्याने विचारला आहे. इन्फ्लुएन्सरचा हा व्हिडिओ एक मोठी सार्वजनिक चर्चा सुरू करणारा ठरला आहे. आता तरी सरकार आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT