अहिल्यानगर: दृष्टिहीन महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताने विजयाची पताका फडकावली; पण या सुवर्णक्षणाच्या मागे सोलापूरच्या एका शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची अथक मेहनत, चिकाटी अन् हृदयाने खेळलेली लढत दडलेली आहे.
sकोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताने नेपाळचा पराभव करत इतिहास रचला. या अविस्मरणीय विजयात गंगाने बजावलेली भूमिका केवळ मोलाची नाही, तर प्रेरणादायी आहे. दृष्टिहीन असूनही गंगाने केलेली कामगिरी हे सिद्ध करते, की इच्छाशक्तीसमोर कोणतेही ‘अंधार’ टिकत नाही.
गंगाचा प्रवास मात्र इतका सरळ नव्हता. शेतकरी कुटुंबातील परिस्थिती, मर्यादा आणि दृष्टीची अडचण; पण हाका देत राहिली तिची जिद्द. पहाटेची वेळ, थंडी, उन्हाची पर्वा नाही, पावणे सहाला जामश्री क्रिकेट अकादमीच्या मैदानावर तिचा निर्धार दिसत असे. प्रशिक्षक अनिल सांब्राणी यांनी तिच्यातील क्षमतेची ज्योत ओळखली आणि तिच्यासाठी ६ ते ७.३० ही खास वेळ राखून ठेवली. गंगा एकदाही मैदानावर उशिरा पोहोचली नाही, एकदाही सराव चुकवला नाही, तिची ही शिस्तच तिचा पाया ठरली.
तिच्या सरावात चट्टे कुटुंबातील तीन मुले समृद्धी, शिवम आणि सृष्टी तिची छोटेखानी ‘टीम’ बनून दररोज मदतीला उभी राहत. रस्त्यावर व्यायाम, मग मैदानावर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी व फलंदाजीचे तासन्तास गिरवलेले धडे. गंगाला अधिक सामर्थ्य देत गेले. सांब्राणी स्वतः २०० चेंडू टाकत आणि म्हणत, गंगा एक दिवस शतक झळकावेल!, त्या शब्दांना गंगाने प्रत्यक्षात उतरवले आणि तिच्या त्या चमकदार क्षणांनी भारताच्या विजयाला उजाळा दिला.
टीम इंडियाच्या गौरवाबरोबरच गंगाच्या या प्रेरणादायी कामगिरीबद्दल उद्योजक राजेश दमाणी, भैरूरतन दमाणी दृष्टिहीन शाळेचे अध्यक्ष संतोष सपकाळ, सचिव संतोष भंडारी, मुख्याध्यापक दर्शनाळे यांनी तिच्या कार्याची मनापासून प्रशंसा केली. आज गंगा दमाणीनगर येथील इलिझियम क्लबमध्ये प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी उंच भरारीसाठी सराव करीत आहे.
गंगाचे आई-वडील शेतकरी. दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून गंगाला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमी तिच्या पाठीशी खंबीर राहिले. गंगा कुटुंबात आठवी मुलगी. आई-वडिलांचा तिच्यावर खूप विश्वास होता. तो तिने सार्थ करून दाखविला आहे. मी तिला नेहमी सांगायचो, तुला एक दिवस भारतीय संघात खेळायचे आहे. आज ते तिने सत्यात उतरवून दाखविले आहे. - अनिल सांब्राणी, गंगाचे प्रारंभीचे प्रशिक्षक
- अलताफ कडकाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.