Yashasvi Jaiswal set replace Ruturaj Gaikwad in Team India: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील राखीव खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वालची ऋतुराज गायकवाडऐवजी निवड होऊ शकते.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ऋतुराजने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे की तो ३-४ जून रोजी लग्न करणार असल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला लगेच जाऊ शकणार नाही.
त्याचमुळे भारतीय संघव्यवस्थापनाने जयस्वालला लाल चेंडूने सराव करण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. जयस्वाल गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून शानदार कामगिरी बजावली आहे.
त्याने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून ६२५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ५ सामन्यांमध्ये ४०४ धावा केल्या होत्या.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे की 'गायकवाडने आम्हाला सांगितले आहे की तो त्याच्या लग्नामुळे येऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्या जागेवर जयस्वाल संघात दाखल होईल.'
'गायकवाड ५ जूननंतर संघात दाखल होऊ शकतो. पण प्रशिक्षक राहुल द्रविडने निर्णय घेतला असून त्याने निवड समीतीकडे बदली खेळाडूची मागणी केली आहे. त्यामुळे जयस्वाल लवकरच लंडनला जाईल.'
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघात निवड झालेले काही खेळाडू सपोर्ट स्टाफसह आधीच इंग्लंडला पोहचले आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे खेळाडू २८ मे रोजी इंग्लंडला जातील.
त्याचबरोबर आयपीएल २०२३ अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळणारे शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा रविंद्र जडेजा ३० मे रोजी इंग्लंडला जाऊ शकतात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील द ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार असून हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.