Australia Women Team
Australia Women Team Dainik Gomantak
क्रीडा

WT20 WC, INDW vs AUSW: टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पराभूत! ऑस्ट्रेलिया विक्रमी सातव्यांदा फायनलमध्ये

Pranali Kodre

India Women vs Australia Women: गुरुवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकात 8 बाद 167 धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाला या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला.

भारताची 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली नव्हती. भारताची सलामी जोडी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना पहिल्या तीन षटकातच बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका भाटिया देखील स्वस्तात धावबाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 28 धावा अशी झाली होती.

मात्र, त्यानंतर जेमिमाह रोड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरताना भारताला पुनरागमनही करून दिले. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. मात्र, या दोघींची खेळपट्टीवर स्थिरावलेली जोडी 11 व्या षटकात डार्सी ब्राऊनने तोडली. तिने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करणाऱ्या जेमिमाहला एलिसा हेलीच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे जेमिमाह आणि हरमनप्रीत यांच्यातील 69 धावांची भागीदारीही तुटली.

पण, यानंतरही हरमनप्रीतने ऋचा घोषला साथीला घेत डाव पुढे नेला होता. त्यांचीही जोडी चांगली जमली होती. पण याचदरम्यान 15 व्या षटकात तिच्यात आणि ऋचामध्ये धाव घेताना गडबड झाली. त्यामुळे अर्धशतकी खेळी केलेल्या हरमनप्रीत कौरला धावबाद व्हावे लागले. तिला ऍश्ले गार्डनर आणि हेलीने मिळून 52 धावांवर धावबाद केले. तिने 34 चेंडूत ही खेळी करताना 6 चौकार आणि 1 षटकार मारला.

ती बाद झाल्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाने हळुहळू वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. पण तरीही भारतीय फलंदाजांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. हरमनप्रीतनंतर ऋचा 14 धावांवर बाद झाली. स्नेह राणा (11) आणि दीप्ती शर्मा यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही विजय मिळवून देता आला नाही. अखेरच्या षटकात 16 धावांची भारतीय संघाला गरज होती. पण भारताला 10 धावाच काढता आल्या. दीप्ती 20 धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि डार्सी ब्राऊन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट आणि जेस जोनासनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने योग्य ठरवत चांगली सुरुवात दिली. एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी 52 धावांची भागीदारी रचली. त्यांची जोडी 8 व्या षटकात राधा यादवने तोडली. तिने टाकलेल्या चेंडूवर हेलीला 25 धावांवर असताना यष्टीरक्षक ऋचा घोषने यष्टीचीत केले. पण

त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने लय कायम ठेवली. मुनीने कर्णधार मेग लेनिंगला साथीला घेतले. या दरम्यान, मुनीने अर्धशतकही पूर्ण केले. तिला एकदा जीवदानही मिळाले होते. अखेर तिला 12 व्या षटकात शिखा पांडेने शफाली वर्माच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. तिने 37 चेंडूत 54 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 1 षटकार मारला.

मुनी बाद झाल्यानंतर मेग लेनिंग आणि ऍश्ले गार्डनर यांच्यातही अर्धशतकी भागीदारी झाली. त्यांनी 36 चेंडूतच 53 धावांची भागीदारी केली. त्यामुळे 18 व्या षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाने 140 धावांचा आकडा पार केला होता. अखेरच्या दोन षटकात मेग लेनिंगने आक्रमक खेळ केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 बाद 172 धावा उभारल्या. लेनिंग 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावा करून नाबाद राहिली. तसेच गार्डनरने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

भारताकडून शिखा पांडेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया सातव्यांदा अंतिम सामन्यात

यापूर्वी ऑस्ट्रेलिया महिला संघाने 2010, 2012, 2014, 2016, 2018 आणि 2020 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना खेळला आहे. म्हणजेच केवळ सर्वात पहिला 2009 साली झालेला महिला टी20 वर्ल्डकपमधील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने खेळला नव्हता. त्यानंतर प्रत्येक टी20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघ अंतिम सामना खेळला आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने गेल्या 6 महिला टी20 वर्ल्डकपचे अंतिम सामने खेळताना 5 वेळा विजय मिळवत विजेतेपदही जिंकले आहे. त्यांना केवळ 2016 साली उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता त्यांना दुसऱ्यांदा वर्ल्डकप विजेतेपदाची हॅट्रिक करण्याची संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City : जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

Pernem Accident : धारगळमधील ‘तो’ अपघात की खून? तरुणाचा मृत्यू

Water Scarcity : पाणी टंचाईबाबत बेतोडावासीय आक्रमक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

OCI Card Issue : ‘ओसीआय’प्रकरणी जनतेची फसवणूक : आमदार कार्लुस फेरेरा

Fire Brigade : अग्निशमनचे ‘मल्टिटास्क युनिट’; रायकर यांची माहिती

SCROLL FOR NEXT