Why India use 9 Bowling Option against Netherlands in ICC ODI Cricket World Cup 2023?
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात अखेरचा साखळी सामना पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली, ते म्हणजे भारताकडून तब्बल 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यातील 6 जणांचा विकेट्सही मिळाल्या.
भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या पाच प्रमुख गोलंदाजांबरोबरच भारताकडून विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा या फलंदाजांनीही गोलंदाजी केली.
म्हणजेच फक्त यष्टीरक्षक केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे असे दोन खेळाडू होते, जे या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होते, पण त्यांनी गोलंदाजी केली नाही.
मात्र, 9 खेळाडूंनी गोलंदाजी का केली, याबद्दल सामन्यानंतर रोहितने खुलासा केला आहे. रोहित म्हणाला, 'आम्ही 9 गोलंदाजी पर्याय वापरले, हा असा सामना होता ज्यात आम्ही काही गोष्टींचे प्रयोग करू शकत होतो. वेगवान गोलंदाजांनी काही वाईड यॉर्कर्स टाकले, जे गरजेचे नव्हते, पण आम्हाला तसे करून पाहायचे होते.'
'गोलंदाजी फळी म्हणून आम्हाला वेगळ्या गोष्टी करून पाहायच्या होत्या आणि आम्ही काय त्यातून मिळवू शकतो, हे पाहायचे होते.'
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघाने या सामन्यापूर्वीच उपांत्य सामन्यात प्रवेश केलेला होता, तसेच नेदरलँड्सचेही आव्हान यापूर्वीच संपले होते.
त्यामुळे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याच्या निकालाने कोणताही परिणाम साधला जाणार नव्हता. त्याचमुळे भारतीय संघाने हा सामना प्रयोग करून पाहाण्यासाठी वापरला असल्याचे रोहितच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.
याशिवाय हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर गेल्याने भारताला प्रमुख 5 गोलंदाजांवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्याकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नव्हता. म्हणजेच एका चांगल्या अष्टपैलूची कमतरता भारतीय संघात आहे.
त्यामुळे जर पुढे गरज पडल्यास यासाठी कोण तयार होऊ शकतं, हे पाहाण्यासाठी नेदरलँड्सविरुद्धचा सामना योग्य होता. कारण हा स्पर्धेतील अखेरचा सामना होता आणि भारताने आधीच सर्व 8 साखळी सामने जिंकले होते.
विशेष म्हणजे स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ऑगस्टमध्ये जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी पार्टटाईम गोलंदाजाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी निवड समीती अध्यक्ष अजित अगरकर आणि रोहित यांनीही विराट आणि स्वत: रोहित गोलंदाजी करताना दिसू शकतो, असे म्हटले होते.
तसेच नंतर हार्दिक बाहेर गेल्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला ६ व्या गोलंदाजाच्या पर्यायाबद्दल विचारण्यात आले होते.
त्यावेळी त्याने 6 वा परिपूर्ण गोलंदाजी पर्याय नसल्याचे मान्य केले होते. पण याबरोबरच त्याने म्हटले होते की विराटचा पर्याय आहे आणि चाहत्यांकडूनही तशी मागणी होत आहे. त्याचबरोबर त्याने सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांचेही पर्याय असल्याचे म्हटले होते.
खरंतर गेल्या काही भारतीय सामन्यांमध्ये विराटला गोलंदाजी द्या असे स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांकडून मागणी केली जात होती. त्याचबद्दल द्रविडने उल्लेख केला होता. चाहत्यांची ही इच्छाही नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पूर्ण करण्यात आली.
इतकेच नाही, तर विराट आणि रोहित यांना प्रत्येकी 1 विकेटही मिळाली. रोहितने तब्बल 11 वर्षांनंतर, तर विराटने 9 वर्षांनंतर वनडेत विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.