Vinesh Phogat Going PMO Return Medal: कुस्ती विश्वात सुरु असलेली 'दंगल' थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनेही आपला सन्मान परत केला. सन्मान परत करण्यासाठी पीएमओकडे जात असताना पोलिसांनी विनेशला कर्तव्य पथावर रोखलं. त्यामुळे विनेशने आपला अर्जुन पुरस्कार कर्तव्य पथावरच ठेवला. विनेशच्या आधी बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. पुरस्कार परत करण्यापूर्वी विनेश म्हणाली की, ''हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत.''
दरम्यान, 22 डिसेंबर रोजी बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. विशेष म्हणजे, बजरंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे त्याने आपल्या पत्रात म्हटले होते. याआगोदर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला.
वास्तविक, बृजभूषणशरण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघा (WFI) ची निवडणूक जिंकली. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू याबद्दल नाराज होते. हे कुस्तीपटू बृजभूषण यांच्या विरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद महिलेकडे असावी, अशी या सर्वांची मागणी होती. मात्र, संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले. मंत्रालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, WFI ने विद्यमान नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. क्रीडा मंत्रालयाने पुढे म्हटले की, राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि यामध्ये योग्य प्रक्रियेचे पालन केले गेले नाही.
क्रीडा मंत्रालयाने उद्धृत केले की, कुस्ती संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी 21 डिसेंबर रोजी जाहीर केले की, कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या वर्षाच्या समाप्तीपूर्वी सुरु होतील. मात्र, मंत्रालयाने तपशीलवार स्पष्ट केले की हे नियमांच्या विरुद्ध आहे - स्पर्धेच्या घोषणेपूर्वी किमान 15 दिवसांची सूचना आवश्यक आहे जेणेकरुन कुस्तीपटू तयारी करु शकतील. हा निर्णय एकट्या अध्यक्षाने घेतलेला नसून कुस्तीगीर संघटनेच्या कार्यकारिणीने घेतला असून, त्यासाठी एक तृतीयांश सदस्यांची संमती आवश्यक आहे. कार्यकारी समितीच्या तातडीच्या बैठकीसाठी 1/3 प्रतिनिधींची संमती आणि किमान 7 दिवसांचा सूचना कालावधी आवश्यक असतो.
दरम्यान, संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकने सर्वप्रथम निवृत्तीची घोषणा केली. साक्षीने अश्रू ढाळत सांगितले की, ''आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो. यादरम्यान देशाच्या अनेक भागातून लाखो लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. यामध्ये वृद्ध महिलाही आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. परंतु आम्ही जिंकलो नाही, पण तुम्हा सर्वांचे आभार.'' ती पुढे म्हणाली की, ''आम्ही मनापासून लढलो, परंतु WFI च्या निवडणुकीत ब्रिजभूषणशरण सिंह यांचे निकटवर्तीय सहकारी संजय सिंह निवडून आले. त्यामुळे मी माझी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला.'' यादरम्यान साक्षीने तिचे शूज प्रेस कॉन्फरन्सदरम्यान टेबलावर ठेवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.