Mohit Sharma Dismissed Suryakumar Yadav: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात गुजरातने 62 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. गुजरातच्या या विजयात मोहित शर्माने महत्त्वाची कामगिरी बजावली.
दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. गुजरातने दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या.
गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटके गोलंदाजी करताना 10 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. विषेश म्हणजे तो ज्यावेळी गोलंदाजीला आला होता, त्यावेळी सामना रोमांचक वळणावर होता. पण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोहितला अगदी 15 व्या षटकात गोलंदाजी दिली.
मुंबई इंडियन्सने 14 षटकापर्यंत 4 विकेट्स गमावल्या होत्या, तसेच 149 धावा केल्या होत्या. तसेच त्यावेळी सूर्यकुमार यादव वेगवान खेळत अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच तो धोकादायक वाटत होता. दुसऱ्या बाजूने त्याला विष्णू विनोद चांगली साथ देत होता.
पण, याच मोक्याच्या क्षणी हार्दिकने मोहितकडे चेंडू सोपवला. मोहितनेही हा विश्वास सार्थ ठरवला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात म्हणजेच डावाच्या 15 व्या षटकात तिसरा चेंडू फुल लेंथला टाकत सूर्यकुमारला त्रिफळाचीत केले.
ही विकेट गुजरातसाठी महत्त्वाची ठरली. कारण सूर्यकुमार चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. सूर्यकुमारने 38 चेंडूत 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
सूर्यकुमारला बाद केल्यानंतर याच षटकात 6 व्या चेंडूवर मोहितने विष्णू विनोदलाही चूक करण्यास भाग पाडले. त्याचा झेल हार्दिक पंड्याने कव्हरच्या क्षेत्रात घेतला. विष्णू विनोदने 5 धावा केल्या. या षटकानंतर मात्र मुंबई इंडियन्सचा डाव गडगडला.
मोहितने सूर्यकुमार आणि विष्णूला एकाच षटकात बाद केल्यानंतर 17 व्या षटकातही दोन विकेट्स घेतल्या. त्याने ख्रिस जॉर्डन आणि पीयुष चावला यांना स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने कुमार कार्तिकेयला बाद करत मुंबईचा डाव संपवला.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. गुजरातकडून गिलने साई सुदर्शनबरोबर 138 धावांची भागीदारी केली. सुदर्शन 43 धावा करून रिटायर्ड आऊट झाला.
त्यानंतर हार्दिक पंड्याने नाबाद 28 धावांची खेळी केली, तर राशीद खान 5 धावांवर नाबाद राहिला. तसेच वृद्धिमान साहाने 18 धावांची खेळी केली. त्यामुळे गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.