Turkey Football referee punched X
क्रीडा

Football referee punched: धक्कादायक! तुर्की फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांकडून रेफ्रीला लाईव्ह सामन्यात मारहाण, तिघांना अटक

Pranali Kodre

Turkey Football referee punched:

फुटबॉलच्या मैदानात अनेकदा अशा घटना घडत असतात, ज्यांची बऱ्याचदा चर्चा होते. बऱ्याचदा मैदानावर खेळाडूंमध्ये, तर स्टँड्समध्ये चाहत्यांमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

अनेकदा खेळाडू आणि रेफ्री यांच्यातही शाब्दिक चकमकी घडतात. पण नुकतेच एका तुर्की फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांनी रेफ्रीला भर मैदानात मारहाण केल्याने त्यांना अटक झाल्याची घटना घडली.

झाले असे की सोमवारी (11 डिसेंबर) एमकेई अंकारागुकू आणि कैकुर रिझस्पोर या दोन संघात सामना झाला. या सामन्यात अतिरिक्त वेळेत 97 व्या मिनिटाला रिझस्पोर संघाने गोल केल्याने सामना 1-1 बरोबरीत सुटला. त्यानंतर राग अनावर झाल्याने अंकारागुकूचे अध्यक्ष फारुक कोका हे मैदानात धावत आले आणि रेफ्री हलील उमट मेलर यांना मारहाण केली.

या घटनेनंतर कोका आणि अन्य दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती न्यायमंत्री यिलमाझ टंक यांनी दिली. तसेच तुर्कीश लीगही निलंबित करण्यात आली आहे.

या घटनेबद्दल फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांनी सांगितले की ही घटना पूर्णपणे अस्वीकार्य आहे. तसेच हिंसेला क्रीडा क्षेत्रात आणि समाजात जागा नाही. त्यांनी असेही म्हटले की सामनाधिकाऱ्यांशिवाय फुटबॉल होऊ शकत नाही. रेफ्री, खेळाडू, चाहते आणि स्टाफ सर्व सुरक्षित राहायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

टंक यांनी सांगितले की कोका आणि अन्य दोघांना सरकारी वकिलांनी स्टेटमेंट घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य तीन संशयितांवरही न्यायालयीन निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास चालू असल्याचेही सांगितले.

सुपर लीगमधील या सामन्यात 14 व्या मिनिटालाच अंकारागुकूच्या मोरुसा ऑलिंपियाने गोल केला होता. त्यानंतर 50 व्या मिनिटाला अंकारागुकूच्या अली सोवला, तर अतिरिक्त वेळेत 95 व्या मिनिटाला रिझस्पोरच्या मिरहान तोप्चूला रेड कार्ड दाखवण्यात आले.

पण यानंतरही रिझस्पोरच्या अडोल्फो गाईचने 97 व्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेनंतर लगेचच मेलर यांना एसिबाडेम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांना गंभीर जखम झालेली नाही. तसेच डॉक्टर मेहमेट योरुबुलुत यांनी सांगितले की मेलर यांना बुधवारपर्यंत डिस्चार्ज मिळू शकेल. दरम्यान, मेलर यांच्या डोळ्याच्या खाली छोटे फ्रॅक्टर झाले आहे.

मेलर यांनी यापूर्वी फिफासाठी देखील अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून काम केले आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर फुटबॉल विश्वातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अंकारागुकू क्लबने त्यांच्या अध्यक्षांच्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच रिझस्पोर क्लबनेही निराशा व्यक्त केली असून ते संपूर्ण रेफ्री कम्युनिटीबरोबर असल्याचे सांगितले आहे.

तुर्की फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मेहमेट बुयुकेक्सी म्हटले की 'अनिश्चित काळासाठी सर्व लीग सामने स्थगित करण्यात आले आहेत. हे आक्रमण तुर्की फुटबॉलसाठी शरमेची गोष्ट आहे.'

मेहमेट बुयुकेक्सी यांनी मेलर यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटही घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT