अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर देशात अराजकतेचे वातावरण पसरले. त्यानंतर तालिबान सरकारने (Taliban Government) अफगाण नागरिकांवर बंधने घालण्यास सुरुवात केली. निरपराध लोकांवर गोळीबारही करण्यात आला. महिलांना शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यास प्रतिबंधही तालिबान्यांनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये अश्लिलता दाखविण्यात येत असल्याचे सांगत अफगाणिस्तानमध्ये आयपीएलला बॅन करण्यात आले. या पाश्वभूमीवर अफगाण क्रिकेट संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2021) अफगाण खेळाडू यूएईला पोहोचले आहेत. अफगाण संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने यावेळी विश्वास व्यक्त केला की, आम्ही अफगाणिस्तानसाठी संघ म्हणून उत्तम कामगिरी करु. त्याचबरोबर संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करु.
10 ऑक्टोबर रोजी नबीला अफगाणिस्तान संघाचे कर्णधार बनवण्यात आले. तत्पूर्वी स्टार अष्टपैलू राशिद खानने कर्णधार होण्यास नकार दिला. वर्ल्डकपसाठी संघाची निवड करण्यापूर्वी रशिदचे मत विचारात घेतले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 36 वर्षीय नबी 2013 ते 2015 दरम्यान संघाचे कर्णधारही राहिला आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या टी -20 विश्वचषकाआधी त्याने माध्यमांशी एका कॉन्फरन्स कॉलमध्ये म्हटले होते की, 'कर्णधारपद ही खूप कठीण जबाबदारी आहे. या स्पर्धेत संघ आपली कामगिरी उत्तमरित्या करेल. कर्णधार म्हणून अफगाण संघाचे नेतृत्व करत खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. भारत (India), पाकिस्तान, न्यूझीलंड आणि क्वालिफायरसह गट दोनमध्ये अफगाणिस्तानला स्थान देण्यात आले आहे.
नबीला तालिबानवर प्रश्न विचारण्यात आला
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत असूनही अफगाण संघाने टी -20 विश्वचषकामध्ये स्थान मिळवले आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात मोठ्याप्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला. नबीने या विषयावर बोलण्यास नकार दिला, मात्र त्याने फक्त व्हिसा समस्यांचा उल्लेख केला. तो म्हणाला, 'टीम गेल्या दीड महिन्यांपासून तयारी करत आहे. व्हिसा प्रकरणात काही समस्या होत्या, ज्यामुळे खेळाडू लवकर यूएईला पोहोचू शकले नाहीत. तत्पूर्वी आमचा संघ कतारमध्ये सराव करत होता. झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हे अफगाणिस्तानचे फलंदाजीसाठीचे सल्लागार असतील, तर दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लसनर हे मुख्य प्रशिक्षक असतील आणि ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट गोलंदाजीसाठी प्रशिक्षक असतील.
टी 20 विश्वचषक 2021 साठी अफगाणिस्तान संघ - मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्लाह झाझाई, उस्मान गनी, मोहम्मद शहजाद, रहमानुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह शाहिदी, असगर अफगान, गुलबदीन नायब, नजीबुल्लाह झाद्रान, करीम जन्नत, रशीद खान, मुजीब उर रहमान, हमीद हसन, फरीद अहमद आणि नवीन-उल-हक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.